आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, भारत आता नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशांसोबत रुपयामधून व्यवहार करणार आहे. त्यामुळे भारताची आणि त्यांच्या शेजारील राष्ट्रांची डॉलरवरील अवलंबित्व कमी होईल. यासाठी आरबीआयने तीन मार्ग निवडले आहेत.
शेजारील राष्ट्रांमध्ये रुपयामध्ये कर्ज उपलब्ध होईल
यापूर्वी नेपाळ, श्रीलंका आणि भूतानमधल्या कोणत्याही व्यावसायिकाला भारतासोबत व्यवहार करायचा असेल तर त्यांना त्यांचं चलन हे डॉलरमध्ये रुपांतरीत करुन मग भारतीय व्यापाराशी व्यवहार करावा लागत असे. या प्रक्रियेला खूप वेळही लागायचा आणि खर्चिक व्हायचे.
मात्र, आता आरबीआयच्या नव्या निर्णयामुळे या शेजारील राष्ट्रांतील व्यापाऱ्यांना भारतासोबत रुपयामध्येच व्यवहार करता येईल तसेच त्यांना रुपयामध्येच भारताकडून कर्ज उपलब्ध होईल.
चलनासाठी एक दर निश्चित केला जाईल
ज्यावेळी दोन देशांमध्ये एका देशाच्या चलनामधून व्यवहार केला जातो, त्यावेळी त्या दोन देशांमध्ये करन्सीचा रेट आधी ठरवावा लागतो. म्हणजे एक रुपयाच्या बदल्यात नेपाळला किती चलन मोजावं लागेल याचा दर आधी ठरवावा लागतो. यामध्ये अनेकदा चढ-उतार होतात.
मात्र, दोन देशांमध्ये या दर निश्चिततेमध्ये पारदर्शकता असावी यासाठी पारदर्शी रेफरेन्स रेट (standard exchange rate) ठरवला जाईल. जेणेकरुन व्यापारी लोकांना आधीच या दराची कल्पना असून त्यांना व्यापार, व्यवहार करणं सोपं जाईल.
विदेशी बँकेमध्ये रुपये ठेवल्यास जास्त फायदा होईल
जेव्हा एखाद्या देशाशी भारत रुपयामध्ये व्यवहार करते तेव्हा तिथल्या बँकामध्ये भारत देशाकडून विशेष खातं खोललं जातं. या खात्याला स्पेशल रुपया वोस्ट्रो अकाऊंट असं म्हटलं जातं. या खात्यात भारतीय चलन ठेवलं जातं.
आतापर्यंत या खात्यात असलेल्या चलनावर या विदेशी बँकांना पुरेसा फायदा मिळत नव्हता. मात्र, यावर उपाय म्हणून आरबीआयने नवीन प्रस्ताव दिला आहे. यानुसार, या विदेशी बँकांना भारतीय चलन भारतातील कंपन्यांच्या बाँड्समध्ये गुंतवता येतील. यामुळे या बँकांना या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळू शकतो.
जर या बँकांना रुपयावर चांगला परतावा मिळाला तर रुपयामधुन व्यापार करण्याचं प्रमाण वाढेल.
आरबीआयच्या या निर्णयांमुळे नेपाळ, भूतान आणि श्रीलंकासोबत व्यवहार करणं खूप सुलभ होईल. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरही रुपयाचं मूल्यांकन वाढेल.