भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करातील महिला अधिकारी एकत्रितरित्या पहिल्या जागतिक प्रदक्षिणेला सुरूवात केली आहे. ‘समुद्री प्रदक्षिणा’ नावाच्या पहिल्याच महिला क्रूमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलातील दहा महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही मोहीम भारतीय लष्कराच्या नौकानयन जहाज (IASV) त्रिवेणीवरून जगभर प्रवास करणार आहे.
पहिली त्रि-सेवा यात्रा
ही अशा प्रकारची पहिलीच त्रि-सेवा यात्रा आहे. यामध्ये 10 महिला अधिकाऱ्यांचं एकत्रित पथक सुमारे 26 हजार नॉटिकल मैलांचा प्रवास करणार आहे. 11 सप्टेंबर रोजी, हा प्रवास सुरू झाला आहे.
हा सागरी प्रवास असण्यासोबतच आत्मसंयम, शौर्य आणि दृढनिश्चयाचा प्रवास आहे. ही केवळ एक मोहीम नाही तर सशस्त्र दलांच्या तिन्ही तुकड्यांच्या एकत्रित ताकदीचं प्रतीक आहे. जेव्हा मोहीम पूर्ण येईल तेव्हा त्यांनी भारतासाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला असेल.
संपूर्णत: महिलाचं नेतृत्व
या मोहिमेचं नेतृत्व सर्व महिलांनी केलं आहे, ही या मोहिमेचा सर्वात अभिमानास्पद भाग आहे. ही टीम वाटेत असलेल्या फ्रीमँटल, ऑस्ट्रेलिया; लिटल्टन, न्यूझीलंड; पोर्ट स्टॅनली, फॉकलंड बेटे; आणि केपटाऊन, दक्षिण आफ्रिका यासारख्या मोक्याच्या बंदरांवर थांबणार आहे. तिथे ते भारताच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं प्रदर्शन करणार आहेत. तसेच तिथल्या स्थानिक अधिकारी आणि समुदायांशी संवाद साधणार आहेत.
या मोहिमेमध्ये पाच लष्करी अधिकारी, एक नौदल अधिकारी आणि चार हवाई दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या संपूर्ण पथकाचं मुख्य नेतृत्व लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्याकडे आहे.
11 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या नऊ महिन्यांच्या प्रवासादरम्यान हे पथक जवळजवळ 26 हजार नॉटिकल मैलांचा प्रवास करेल. दोन विषुववृत्त ओलांडेल आणि केप लीउविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप या तीन ग्रेट केप्सना प्रदक्षिणा घालेल.
मे 2026 मध्ये मुंबईत परतण्यापूर्वी, ते चार परदेशी बंदरांना भेट देतील आणि सर्व मुख्य महासागर तसेच ड्रेक पॅसेज आणि दक्षिण महासागर यासारख्या काही सर्वात धोकादायक पाण्यांमधून जातील. मिशन MARG चा एक घटक म्हणून, या मोहिमेचे भारताच्या नौदल शक्ती, लष्करी एकता आणि महिला शक्तीचे ऐतिहासिक प्रदर्शन म्हणून कौतुक केलं जात आहे.