मिलाया इटालिया 1001’चे साहसवीर आशिष जोशी

साहसवीर आशिष जोशी
साहसवीर आशिष जोशी (Ashish Joshi) यांनी 17 हजार मीटरची चढाई सायकलवर यशस्वी केली. प्रचंड ध्यास, साहस, चिकाटी,संयम, मनोधर्य, शारीरिक तंदुरुस्ती.. .. असे शब्द अपुरे पडतील अशी सर्व प्रकारची आत्यंतिक कसोटी पाहणारी  सायकलवरची स्पर्धा म्हणजे 'मिलाया इटालिया (Milaya Italia) 1001.'
[gspeech type=button]

प्रचंड ध्यास, साहस, चिकाटी,संयम, मनोधर्य, शारीरिक तंदुरुस्ती.. .. असे शब्द अपुरे पडतील अशी सर्व प्रकारची आत्यंतिक कसोटी पाहणारी  सायकलवरची स्पर्धा म्हणजे ‘मिलाया इटालिया 1001.’ म्हणजेच 1001 मैल.  यंदा 16 ते 22 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा झाली.

सायकलिंग आणि क्लायम्बिंग-रँडॉनी

या स्पर्धेत इटलीतल्या सुंदर निसर्गाचं दर्शन घडवणारा 1600 किमीचा मार्ग 134 तासात पूर्ण करायचा असतो. हा मार्ग सरळसोट नाही बरं का. तर अनेक घाट पार करावे लागतात.  एव्हरेस्टची उंची 8,849 मीटर. या स्पर्धेत मार्गातल्या सगळ्या डोंगरदऱ्या मिळून जवळपास दुप्पट म्हणजे 17 हजार मीटर चढाई करावी लागते. रात्रंदिवस अथक सायकलिंग आणि क्लायम्बिंग अशा एकत्रित ऍक्टिव्हिटीमुळे या साहसी प्रकाराला ‘रँडॉनी’ म्हणतात.  बऱ्याच आव्हानांमुळे 50 टक्क्यांहूनही कमी सहभागी ही स्पर्धा पूर्ण करू शकतात. अंतर पूर्ण करणं, हेच या सर्वात कठीण रँडॉनीमधलं यश !

148 तासात जेमतेम 10 तास झोप

यंदा या स्पर्धेत प्रथमच भारतातून 12 जण सहभागी झाले होते. त्यापैकी 6 जण वेळेत संपूर्ण अंतर  पार करू शकले. तर 3 जणांनी अधिक वेळ घेऊन हे अंतर पूर्ण केलं.  यापैकी एक पुण्याचे आशिष जोशी. 148 तासात त्यांनी हे अंतर पूर्ण केलं.  ”148 तासात जेमतेम  10 तास झोप, सायकलचा दिवा जाणं, मार्ग चुकणं, चार्जिंगची अडचण, दिवसाचं 36 ते 38 अंश तापमान, पावसानं ओले झालेले कपडे, उत्तर इटलीत  रात्रीचं 12 अंश तापमान 5 अंश जाणवेल एवढी कडाक्याची थंडी, सतत एवढे तास सायकल चालवून आलेले फोड, व्हायब्रेशनमुळे हात काळेनिळे होणं, सुजलेली मनगटं, पायाला आलेले फोड  मानेचा तोल जाणं,  इटलीतल्या सुट्टीमुळे निर्मनुष्य गावं, त्यामुळे खाणं काय पाण्याचेही हाल, भाषेचा अडथळा … ” आशिष यांचा अनुभव ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

डिहायड्रेशन आणि थकव्यामुळे भ्रम

मिलान शहराच्या वायव्य भागात वसलेल्या पॅराबियागो इथून सायकलिंगला सुरुवात झाली. एकूण 18 टप्पे किंवा कंट्रोल्स  स्पर्धेमध्ये होते. ”अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये मार्ग, काठिण्य पातळी आयोजक ठरवतात.  प्रत्येक टप्यादरम्यानचं अंतरही  विशिष्ट वेळेत पूर्ण करणं आवश्यक असतं.” आशिष सांगतात.  ”रस्त्यावर कुठेही मार्किंग नसतं, मॅप असतो पण टाइम प्रेशर, थकवा, झोप ,खाणं, पाणी नाही त्यामुळे भ्रम होऊन रस्ता चुकू शकतो. मीही एका पॉइंटवर डिहायड्रेशनमुळे रस्ता काही केल्या सापडत नसल्यानं खूप निराश झालो. अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये ही खूप घातक स्थिती असते. अधिक स्पष्ट सांगायचं तर चर्चगेट स्टेशनपासून इरॉस थिएटर सापडत नाही, माणूस तासनतास मरीनड्राईव्हभोवती फिरत राहतो, अशी टोकाची स्थितीही उद्भवू शकते. या आधी 2017 ला मी असा अनुभव घेतला आहे. बाजूचं ठिकाण चार तास सापडलं नव्हतं, ओक्सबोक्शी रडलो होतो मी !”

आशिष जोशी

भरकटलेले 100 किलोमीटर 

”या स्पर्धेत रस्ता सापडेनासा झाल्यावर स्पर्धा सोडायचा निर्णय मी घेतला.  पण माझ्या पत्नीनं, मुलीनं खूप धीर दिला. मुलगी माझे अमेरिकेत असलेले इटालियन प्रशिक्षक अल्बर्टो ब्लँको यांच्याशी बोलली. त्यांनी स्वतः रेस अक्रॉस अमेरिका खूप आव्हानात्मक स्थितीत पहिल्या प्रयत्नात पूर्ण केली आहे. एखाद्या खेळाडूला कसं हाताळायचं ते त्यांना चांगलं समजतं. त्यांनी 20 मिनिटं झोपायला  सांगितलं. माझा ट्रॅक ठेवून पुढे पुढे जाण्यासाठी ते मला मोटिव्हेट करू लागले. 

माझे हात सुजलेले, मानेचा तोल गेलेला, त्यातून मातीचा रस्ता, त्यामुळे सारखा पडत होतो. मग सरळ सायकल हातात घेऊन चालायला लागलो. रस्त्यात एक पेट्रोल पंप लागला, तिथे इटालिअन भात मिळाला. भात खाऊन जी हुशारी, आनंद मिळाला, तो अवर्णनीय होता. इटलीत सुट्टी असल्यानं 80 टक्के उपहारगृह बंद होती, घरं बंद होती. क्वचित ब्रेड स्लाइस आणि हॅम, मिळाला तर एखादा टार्टचा तुकडा आणि सर्दाळलेल्या हवेत थंडगार कलिंगड, असं काहीतरी पोटात ढकलायला मिळायचं. 

सलग दोन रात्री न झोपल्यावर एके ठिकाणी थोडे थांबून मार्गारिटा पिझ्झा घेतला. दुकान बंद होत होते. तेवढयात दोघे इंडोनेशियाचे रायडर आले. ते पण भुकेलेले होते. त्यांच्यासोबत पिझ्झा शेअर केला.  माझा बराचसा प्रवास कोकवरच झाला. मी 30 कॅन तरी कोक प्यायलो असेन आणि झोप उडवण्यासाठी नेस्प्रेसो कॉफी. अंतर पूर्ण करणं, हेच एकमेव उद्दिष्ट होतं माझं.! ” 

रस्ता भरकटल्यामुळे आशिष यांच्या एकूण अंतरात जवळपास शंभर किलोमीटरची भर पडली. कासेला लिगुर  ते डेव्हीना मरिना आणि डेव्हीना मरिना ते गोरलिआनो हे टप्पे  कठीण ठरले पण समुद्रकिनारा लाभलेलं डेव्हीना मरिना डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं, असं आशिष सांगतात.

400 ते 1200 किमी अंतर एकाच कपड्यावरच

स्पर्धेचं काठिण्य पाहता कमीतकमी सामानच सोबत ठेवावं लागतं. त्यामुळे सोबत खाणंपिणं फार बाळगता येत नाही. पाण्याच्यादेखील फक्त 3 च बाटल्या ठेवल्याचं आशिष सांगतात. 60 किलोमीटर तर त्यांना  पाणी न पिताच काढावे लागले.  कपडे आणि इतर सामान आपण वेगळं पुढे पाठवू शकतो, ते 400 किमीच्या आणि 900 किमीच्या कंट्रोलवर मिळतात. 400 किमीवर सामान मिळालं. पण पुढे 70 टक्के सहभागी वेळ राखू न शकल्यानं अनेक जणांना 900 किमी कंट्रोलवरचं सामान मिळू शकलं नाही. आशिषना पण सामान मिळू शकलं  नाही. आयोजक निघून गेले होते. त्यामुळे चार दिवस 400 ते 1200 किमीपर्यंत  त्यांना त्याच कपड्यांवर राहावं लागलं. आधी ऊन मग पाऊस-थंडीने ओले झालेले कपडे… सतत सायकलवर बसून फोड आलेले..अशा कठीण परिस्थितीतून आशिष यांना जावं लागलं.

अडचणीतून स्वतःच मार्ग शोधायचा

या स्पर्धेत तुमच्या गोष्टी तुम्हालाच मॅनेज कराव्या लागतात. बाहेरून कुठलीच म्हणजे कुठलीच मदत नाही.   प्रोफेशनल स्पर्धेत ठराविक अंतरावर गाड्या असतात, काही मदत लागली तर मिळू शकते. इथे मात्र सायकल पंक्चर झाली, सायकलचे काही तुटलेफुटले तर आपल्यालाच बघावे लागते. कित्येक किमी मार्गावर आपण पूर्णपणे एकटे असतो. अशा स्थितीत एवढे तास एकट्याने काढण्याचाही काहीसा परिणाम आपल्यावर होत असतो. 

चार्जिंग आणि पॉवर बँकसाठीची वणवण      

प्रवासात सायकलचा दिवा पडल्यामुळे आशिष यांच्यासमोर आणखी एक आव्हान उभं राहिलं. मार्ग ग्रामीण भागातला असल्यानं आणि इथल्या गावात रस्त्यावर फारसे दिवे नसल्यानं सायकलला दिवा आवश्यक होता.   ” लॉक आतमधून तुटल्यामुळे सेल बाहेर काढता येत नव्हते, लाईट ओपन करता येत नव्हता, तेव्हा भावाला फोन करून आसपास दुकानं आहेत का ते शोधायला सांगितलं. पण कुठल्याच दुकानात माझ्या सायकलसारखा लाईट काही मिळेना. शेवटी एका दुकानाविषयी कळलं तर ते दुपारी उघडणार होतं. वेळ पुढे पुढे सरकत होती. दुकानमालकाचं काम फारच संथ गतीनं  चालू होतं. त्याला इंग्लिश येत नव्हतं. मग थोड्या वेळानं ज्याच्याशी माझं बोलणं झालं होतं, त्याचा मुलगा आल्यावर मला लाईट मिळाला.

त्यासाठी 5 किमी मागे मला यायला लागले होते. त्यानं तेवढ्यापुरती सोय करून दिली. तोवर प्रचंड पाऊस सुरू झाला. लाईट पॉवरफुल नव्हता, पण तो मिळाला याचं मानसिक समाधान मोठं होतं. चार्जिंगअभावी पाचव्या दिवशी पॉवर बँकसकट सगळं बंद पडायला लागलं. तेव्हा एका कार वॉशवाल्याने त्याचे सगळे प्लग्स दिले. पण तीन तास होऊनही चार्जिंग केवळ 40 टक्केच झालं. शेवटी तिथून निघालो. रात्री 11.30 ला हॉटेल दिसलं. पंजाबी होता. त्यानं आपुलकीनं खाऊ घातलं. पैसेही तो घेत नव्हता.

स्टेडियमवर पोहचलो पण…

शेवटचे 200 किमी राहिले असताना लाईट बंद पडलाच. मुलीला फोन केला. तिने सरळ हॉटेलची रूम बुक केली. तिथे रात्रीचे 4 तास झोपलो. स्पर्धेत एवढी सलग झोप मी प्रथमच घेतली. त्याआधी केवळ अर्धा एक तासाच्या पॉवर नॅप  रस्त्याच्या कडेला वगैरे अशाच घेतलेल्या.  पाऊस आणि थंडीमुळे कपडे ओले ते ओलेच राहिले.  शेवटचा टप्प्यात खूप उत्साह होता. खूप वेगानं सायकल चालवत मी स्टेडिअमवर पोहोचलो… पण तिथे कोणीही म्हणजे वॉचमनसुद्धा नव्हता. आदल्या दिवशी माझे आयोजकांशी बोलणे झाले होते. पण मी तिथे पोहोचलो तेव्हा कोणीच नसल्याचे पाहून मन खट्टू झाले. फिनिश लाईनपाशी फोटो काढून, आयोजकांना फोन करून  मी हॉटेलवर गेलो. आयोजकांना याबाबत कळल्यावर मात्र ते स्वतः हॉटेलवर आले आणि मला पदक प्रदान केलं.”

स्पर्धेचे निकष

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही लंडन-एडिनबर्ग-लंडन, पॅरिस ब्रेस्ट पॅरिस, तसंच जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया इथं होणाऱ्या  Audax संघटनेच्या रँडॉनी पूर्ण केलेल्या असाव्या लागतात.  सायकलवरून किमान 13 हजार मीटर चढाईचा अनुभव पाठीशी असणं आवश्यक आहे. Audax ही रँडॉनी आयोजनातली संस्था असून तिचं मुख्यालय फ्रान्समध्ये आहे. विविध देशात तिच्या शाखा आहेत.

स्पर्धा पूर्ण करणं हेच बक्षिस

टूर द फ्रान्ससारख्या स्पर्धा आणि या स्पर्धा यात फरक असतो. हा सगळा आपल्या हौसेचा मामला असतो. प्राईज मनी नसतं. तुम्हाला स्पर्धा पूर्ण करता येणं, हेच तुमचं बक्षीस, असं आशिष सांगतात.  

रोजचा सराव          

आर्किटेक्ट असलेले आशिष जोशी 2013 पासून या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. 2022 मध्ये त्यांनी लंडन-एडिनबर्ग-लंडन पूर्ण केली आहे. सकाळी 4 ला त्यांचा दिवस सुरू होतो. पहाटे 5.30 ला ट्रेनिंगला जाऊन 9 वाजता ऑफिस. इव्हेंट जवळ आला की सकाळी तीन तास, संध्याकाळी दोन ते तीन तास सराव ते करतात. ” काही झालं तरी राईड मध्येच सोडायची नाही, हा माझा दृढ निश्चय गेल्या 10-11 वर्षातला सर्वात मोठा बदल होता. आपण एकटे असलो, अडचणी आल्या तरी पुढे जात राहायचं. आपल्या आयुष्यातही हेच महत्त्वाचं असतं ना…. पुढे जात राहणं … !”

4 Comments

  • Ramakant Mahadik

    Jabardast

  • Gauri Pandit

    Great going Aashish! Hats off to you…tremendous efforts taken by you…Keeping riding. Heartiest congratulations and All the best for your future rides

  • Aruna Joshi

    Unimaginable!! It’s the result of tremendous Dedication Self belief Burning desire to achieve the goal and support system !!👍👍

  • Mandar Datar

    Hat’s off to you, salute to your bravery, confidence and your hard work efforts.
    Truly speechless. Your are truly a Big fighter.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 Responses

  1. Hat’s off to you, salute to your bravery, confidence and your hard work efforts.
    Truly speechless. Your are truly a Big fighter.

  2. Unimaginable!! It’s the result of tremendous Dedication Self belief Burning desire to achieve the goal and support system !!👍👍

  3. Great going Aashish! Hats off to you…tremendous efforts taken by you…Keeping riding. Heartiest congratulations and All the best for your future rides

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Womenhood : दुर्दैवाने व्हीलचेअरशी खिळलेले आयुष्य वाट्याला आलेली;पण उमेद न हारता अपंगांसाठी सुलभता वाढवण्याची मोहीम हाती घेतलेली, फॅशनच्या जगातली चाकांच्या
Womenhood : बारामतीमधल्या लता भगवान करे या अशाच एक साहसी महिला आहेत. त्यांच्या साहसाची कसोटी लागली ती वयाच्या 62 व्या
Indian naval officers : अलीकडेच भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी, लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ