बटाटा, मिरचीला आपल्याकडं रुजवणारी ‘दापोडी इस्टेट’ – भाग 1

वसाहतवादी कालखंडात वसाहतींनी ‘बाहेरून’ आलेली पिकं स्वीकारली. कधी स्वखुशीनं, कधी जबरदस्तीनं. वसाहतीतल्या लोकांचं पोट भरण्यासाठी काहीवेळा ही बाहेरची पिकं आणली गेली. तरी त्यात आर्थिक, राजकीय हितसंबंधही गुंतले होतेच. युरोपियन नागरिकांना भारतात मायदेशाची आठवण येऊ नये, यासाठी ब्रिटिशांनी आपल्या देशात परदेशी फळं आणि भाज्यांची लागवड केली.
[gspeech type=button]

परक्या भूमीवर मायदेशी पिकं

कोलंबसाच्या सफरीमुळे मिरच्या, बटाटे, टोमॅटो, मका, शेंगदाणे, काजू, अननस, पपई, चिकू, पेरू उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतून जगभर पसरले. या कोलंबियन एक्सचेंज’च्या, देवाणघेवाणीच्या जोरावर युरोपियांनी आफ्रिका आणि आशिया इथल्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला. मसाल्याच्या व्यापारावरची आणि पर्यायानं जागतिक अर्थव्यवस्थेवरची पर्शियनांची मजबूत पकड संपुष्टात यायला 1498 साल उजाडावं लागलं. वाश्कु द गामा भारतात आला. या घटनेला जागतिक इतिहासाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वेला असलेल्या देशांची संस्कृती, त्यांचा इतिहास यांच्याशी फारसा संबंध नसलेले युरोपीय देश आशियाशी वाश्कु द गामाच्या साहसामुळे जोडले गेले.

वसाहतवादी कालखंडात वसाहतींनी बाहेरून’ आलेली पिकं स्वीकारली. कधी स्वखुशीनं, कधी जबरदस्तीनं. वसाहतीतल्या लोकांचं पोट भरण्यासाठी काहीवेळा ही बाहेरची पिकं आणली गेली. तरी त्यात आर्थिक, राजकीय हितसंबंधही गुंतले होतेच. युरोपियांना भारतात मायदेशाची आठवण येऊ नये, यासाठी ब्रिटिशांनी आपल्या देशात परदेशी फळं आणि भाज्यांची लागवड केली.

सांगलीच्या शाहीबागेत रुजलं बटाट्याचं वाण

1827  साली उन्हाळ्यातल्या एका सकाळी सांगलीचे पहिले शासक श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन हे मेजर-जनरल सर जॉन माल्कमला भेटायला गेले. माल्कम तेव्हा पुण्याजवळच्या दापोडीत राहत असे. त्याच्या घराभोवती भलीमोठी बाग होती. ही बाग बघून श्रीमंत पटवर्धन अतिशय प्रभावित झाले. माल्कमशी त्यांनी युरोपीय आणि अमेरिकी पिकांचं भारतात नैसर्गिकीकरण कसं करावं, याबद्दल तपशिलात चर्चा केली. माल्कमनं बागेत बटाटा लावला होता. हा कंद काही शतकांपूर्वी अमेरिकेतून भारतात आला असला, तरी पश्चिम भारतात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड तेव्हा नुकतीच सुरू झाली होती. राजेसाहेबांना या नव्या कंदाविषयी बरीच उत्सुकता होती. ते सांगलीला बटाट्याचं वाण घेऊन गेले.

हे ही वाचा : दापोडी बोटॅनिकल गार्डनभाग 2

दापोडी इस्टेट

माल्कमचं निवासस्थान त्या काळी दापोडी इस्टेट या नावानं ओळखली जाई. तो बंगला आणि भोवतीची बाग मुळात कर्नल फोर्डच्या मालकीचे होते. फोर्डनं बाजीराव पेशव्यांसाठी युरोपीय धाटणीची एक भव्य मराठा ब्रिगेड उभारली होती. पेशवाईच्या अस्तानंतर माल्कमची नेमणूक बॉम्बे इलाख्याचा गव्हर्नर म्हणून झाली. आणि 1827 साली दापोडी इस्टेट आणि शेजारची मैदानं त्यानं सरकारी वापरासाठी खरेदी केले. पुण्यात असताना तो तिथेच राहत असे.

नव्या भाज्या आणि फळं

गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर माल्कमनं ब्रिटीश राजवटीची योग्य तत्त्वे’ राबवण्यास सक्रिय सुरुवात केली होती. कंपनीच्या फायद्यासाठी भारतावर राज्य करायचं होतं. पण भारतीयांचं हीत जपल्यास राज्य करणं सोपं जाईल, हे भान त्याला होतं. त्यानं सत्तेचं विकेंद्रीकरण करायला सुरुवात केली, जिल्हाधिकारी नेमले. सतीप्रथा आणि स्त्रीभ्रूणहत्या यांना त्यानं आळा घालण्याचा प्रयत्न केला. पण याशिवाय त्यानं एक अतिशय महत्त्वाचं काम केलं. त्यानं भारतात नव्या भाज्या आणि फळं आणायला सुरुवात केली. ही नवी वाणं रुजवण्यासाठी, त्यांच्या लागवडीचे प्रयोग करण्यासाठी त्यानं 1827 सालच्या डिसेंबरात दापोडी इस्टेटीतल्या बागेचं सरकारी बोटॅनिकल गार्डनमध्ये रूपांतर करावं, असा प्रस्ताव मांडला.  

सर जॉन माल्कम

सरकारी जागेचा पुरेपुर फायदा

दापोडी इस्टेट सत्तर एकरांवर पसरली होती. त्यांपैकी अकरा एकर जमीन शेती योग्य नव्हती. बारा एकरांवर इमारती होत्या. उरलेल्या जागेत फोर्डनं सुंदर बाग उभारली होती. तीत भारतीय आणि इंग्रजी फळझाडं, फुलझाडं आणि अनेक तर्‍हेच्या भाज्या लावल्या होत्या. काही दुर्मीळ वनस्पतींची लागवडही त्यानं केली होती. माल्कमच्या ताब्यात आल्यावर बागेच्या श्रीमंतीत भर पडली होती. त्यानं नवनवी रोपं, बिया आणून बागेत रुजवण्याचा सपाटा लावला.

बोटॅनिकल गार्डनचा प्रस्ताव

बागेतल्या मातीवर माल्कमचा विश्वास होता. तिथे जलवाहिन्यांद्वारे पाणी खेळवलं होतं. थोडीफार डागडुजी केल्यावर एक उत्तम बोटॅनिकल गार्डन इथे तयार होईल, याची माल्कमला खात्री होती. मात्र आपल्या प्रस्तावाला मोठा विरोध होईल, हेही त्याला ठाऊक होतं. म्हणून सुरुवातीला त्याच्या सगळ्याच कल्पना त्यानं प्रस्तावात लिहिल्या नाहीत. अगदी लहान प्रमाणात सुरुवात करण्याची त्याची तयारी होती जेणेकरून ईस्ट इंडिया कंपनीला फारसा खर्च सोसावा लागला नसता.

ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्ससमोर मांडलेल्या प्रस्तावात त्यानं लिहिलं होतं – “लिबरल सायन्सच्या प्रचारासाठी मी कटिबद्ध आहे. त्यासाठी करावा लागणारा प्रत्येक प्रयत्न, तो कितीही किरकोळ वाटला तरी, मी करेन. कंपनीला तोटा होईल असा खर्च न करता या देशाला ज्यामुळे फायदा होईल, इथले नागरिक ज्यामुळे शांततापूर्ण जीवन जगू शकतील, व्यवसाय करू शकतील, अशी कामं आपण करावीत, असं मला वाटतं. इथल्या लोकांच्या सवयी, त्यांचं चारित्र्य यांबद्दल अजून मला पुरेसं ज्ञान आहे, असं वाटत नाही. पण त्यांच्या फायद्याच्या गोष्टीसाठी ते परिश्रम करतात. आणि हे बोटॅनिकल गार्डन आपल्या आणि त्यांच्या फायद्याचं आहे.”

प्रस्तावाला विरोध

मात्र, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा एक मोठा गट दापोडीत बोटॅनिकल गार्डन होऊ नये, या मताचा होता. कलकत्ता, मद्रास आणि सिलोन इथे त्यावेळी बोटॅनिकल गार्डन अस्तित्वात होते. या बागांच्या देखभालीचा खर्च त्यांतून मिळणार्‍या फायद्यापेक्षा कितीतरी जास्त होता, असं त्यांना वाटत होतं. कंपनीनं भारतीयांच्या हिताची काळजी न करता फक्त व्यापारावर लक्ष केंद्रित करावं, असं त्यांचं म्हणणं होतं.

दापोडी इस्टेटला विरोध

माल्कमच्या प्रस्तावावर जाहीर चर्चा सुरू होताच, त्याच्या कल्पनेला विरोध करणार्‍यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्थेची दयनीय स्थिती’ दाखवून देणारी पत्रं लिहायचा सपाटा लावला. कंपनीच्या कोर्टानं हस्तक्षेप करून गार्डनची योजना किमान दीड वर्षं पुढे ढकलावी आणि जमल्यास ती रद्दच करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रकल्प पुढे ढकलला गेला, की तो आपोआप नामंजूर होईल, अशी त्यांची अटकळ होती.  बंगाल आणि मद्रास या प्रांतांत युरोपातून आलेली अनेक वाणं रुजली होती; मात्र पश्चिम भारत त्याबाबतीत मागे होता. पश्चिम भारतातलं हवामान या पिकांसाठी प्रतिकूल होतं. तरिही, कंपनीनं पैश्यासाठी कधीही हात अखडता घेतला नव्हता हे सांगायला विरोधक विसरले नाहीत.

माल्कमची एडव्होकसी

बोटॅनिकल गार्डनला होणार्‍या विरोधामुळे माल्कम चिडला. भारतात हॉर्टिकल्चरचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीनंच करावा लागेल, त्यासाठी अनेक प्रयोग करावे लागतील, हे तो सतत सांगत होता. त्याच्या दृष्टीनं वनस्पती-उद्यानं या प्रयोगशाळा होत्या. या प्रयोगशाळांमध्ये केलेल्या प्रयोगांतून मिळणारं ज्ञान अमूल्य होतं. हे ज्ञान भारतातल्या व युरोपातल्या रहिवाश्यांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं होतं, हे त्यानं कंपनीच्या वरिष्ठांना कळवलं. या प्रयोगांतून कंपनीला आर्थिक फायदाही होणार होता, हे सांगायला तो विसरला नाही.

भारतीय हवामानाला पूरक पद्धती

माल्कमला होणार्‍या विरोधाच्या वेळी त्याचे एकमेव समर्थक होते कलकत्ता बोटॅनिकल गार्डनचे अधीक्षक डॉ. नथॅनियल वॉलिक.  त्यांनी माल्कमला लिहिलं – “एक काळ असा होता जेव्हा फूलकोबीची किंवा नारळसुपारीची बाग लावण्यापुरती युरोपियांची धाव होती. पण आता भारतातल्या युरोपीय बागांचं रूप पालटतं आहे. लोकांची अशी चुकीची धारणा आहे की, भारतात उत्तम बागा फुलवता येत नाहीत. त्यांना तसं वाटतं कारण उद्यानशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे या देशात फारसे कोणी नाहीत. पण आपल्या लोकांनी पंचेंद्रियांवर भरवसा ठेवून, लागवडीची युरोपीय पद्धत जशीच्या तशी वापरण्याचा हट्ट सोडून इथल्या हवामानाला पूरक पद्धती स्वीकारल्या, तर या देशातही उत्कृष्ट बागा निर्माण होतील’.

दापोडीसाठीचे डावपेच

वॉलिक तेव्हा इंग्लंडला निघाले होते. त्यांच्यासोबत दोन बर्मी आणि दोन बंगाली माळी होते. त्यांनी त्यांची इंग्लंडमधल्या वनस्पतिशास्त्राच्या महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण घेण्याची सोय केली होती. भारतात परतून त्यांचं ज्ञान बागकामासाठी वापरता येईल, अशी त्यांची योजना होती. यांपैकी दोघांना पुण्याला माल्कमच्या मदतीसाठी पाठवण्याची तयारी वॉलिक यांनी दाखवली. माल्कमला आनंद झाला, पण आधी त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डिरेक्टरांना दापोडीच्या गार्डनचं महत्त्व पटवून द्यायचं होतं.

(क्रमश:)

1 Comment

  • मानसी

    Very interesting आर्टिकल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Shreshth Maharashtra's Mangala Gaur 2025 : महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ने सलग दुसऱ्या वर्षी 'श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2025' स्पर्धेचं आयोजन
जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत 'भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले ' युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत.
Special Public Security Act : महाराष्ट्र सरकारने आणलेले हे विधेयक संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचं अनेक संघटना आणि राजकीय पक्ष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ