गुहेतला कलाविष्कार
महाराष्ट्राला जसा वैविध्यपूर्ण भूगोल लाभलेला आहे, त्याचप्रमाणे रोमांचक आणि गौरवशाली इतिहासही लाभलेला आहे. या सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जशा महाराष्ट्रातील मंदिरांमधून, गड-किल्ल्यांमधून ठळकपणे पाहायला मिळतात; त्याच प्रमाणे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये खोदलेल्या लेण्यांमधूनही पाहायला मिळतात. अतिप्राचीन काळी म्हणजे अश्मयुगात तेव्हाच्या माणसाचा निवारा म्हणजे डोंगर-पर्वतांमधील नैसर्गिक गुहा होत्या. आपल्या या शैलाश्रयात त्या काळातल्या माणसाने स्वतःच्या राहाण्याचे, जगण्याचे, त्या काळातील समाजाचे दर्शन घडवणारी चित्रे रेखाटली, जी आजही पाहायला मिळतात. पुढे मानवी समाज अधिक संघटित होत गेला. कलाविष्काराला नेमकी दिशा आणि उद्देश मिळाला. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या त्या टप्प्यावर अशा प्रकारच्या गुहा खोदून त्यात कलाकौशल्याने काही निर्माण करण्याची प्रथा रुढ झाली. याच प्रथेमधून आपण आज पाहातो ती लेणी निर्माण झाली.
लेणी खोदण्याची कला इराणमार्गे भारतात
लेणी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादीत नाहीत. किंबहुना लेणी खोदण्याची कला भारतात इराणमार्गे आली असावी, असाही संशोधकांचा अंदाज आहे. भारतात लेणी खोदण्याची पध्दत मगध साम्राज्यात निर्माण झाली आणि तिथून ती महाराष्ट्रात आली. भारतात ओरिसा, मध्य प्रदेश, गुजराथ, कर्नाटक, तमिळनाडू अशा राज्यांमध्ये वेगवेगळ्या काळात खोदलेली, वेगवेगळ्या पध्दतीची लेणी पाहायला मिळतात. महाराष्ट्रात लेणी खोदायला सुरुवात इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात झाली. या दरम्यान पाटलीपुत्र, वाराणसी, बुध्दगया इथून बौध्द भिख्खू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात येऊ लागले.
लेण्यांचे तीन प्रकार
महाराष्ट्रातील भाजे, कार्ले आणि कर्जत जवळील कोंढाणा ही लेणी सर्वात प्राचीन (पहिल्या टप्प्यात खोदलेल्यांपैकी) आहेत. तशी महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये लेणी आढळतात. वास्तू शास्त्रानुसार बौध्द लेण्यांचे तीन मुख्य प्रकार मानले जातात. स्तूप, विहार आणि चैत्यगृह.
स्तूप
स्तूप म्हणजे पूज्य व्यक्तीच्या अवशेषांवर उभारलेलं शिल्प स्मारक असं म्हणता येईल. तथागत बुध्दाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अवशेषांवर उभारलेले सांची, सारनाथ, गया, नालंदा येथील स्तूप प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रातही कार्ले, भाजे,बेडसे, ठाणाळे, अजिंठा इथे स्तूप पाहायला मिळतात. महायान बौध्दांच्या प्रभावाने स्तुपांवर बुध्दाच्या प्रतिमा कोरल्या जाऊ लागल्या.
विहार
विहार म्हणजे बौध्द भिक्षूंच्या निवासासाठी केलेली रचना. पावसाळ्यात भिक्षूंचे देशाटन बंद असे. या काळात त्यांच्या निवासासाठी विहारांची आवश्यकता भासत असे. सुरुवातीचे विहार साधे आहेत. पुढे त्यांच्या सजावटीसाठी कोरीव स्तंभ, मूर्ती-पानाफुलांची नक्षी यांचे कोरीव काम सुरू झाले.
चैत्यगृह
चैत्यगृहे ही प्रार्थना गृहे होती. त्यामुळे ती विहारांच्या जवळ असत. सुरवातीच्या काळात चैत्यगृहाच्या मागच्या भिंतीतच स्तूप कोरलेला असे. नंतरच्या काळात तो भिंतीपासून स्वतंत्र पुढे येईल असा तयार केला जाऊ लागला.
बौद्ध लेण्यांच्या दीड हजार वर्षांनी हिंदू लेणी
हिंदू किंवा ब्राह्मणी लेणी ही बौध्द लेण्यांइतकी प्राचीन नाहीत. साधारण पाचव्या शतकात म्हणजे बौध्द लेण्यांनंतर सुमारे दीड हजार वर्षांनी ही लेणी कोरायला सुरवात झाली. खरंतर प्राचीन काळापासून हिंदू देव देवतांसाठी शिल्पाकिंत मंदिरे निर्माण करण्याची परंपरा सुरू झालेली होती. मात्र बौध्दांच्या धर्तीवर कातळात खोदकाम करुन लेणी निर्माण करायला महाराष्ट्रात वाकाटकांच्या राहवटीत सुरवात झाली असावे असे मानले जाते. अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांची निर्मिती याच राजवटीत सुरू झाली. हिंदू लेण्यांमध्ये शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथांच प्रभाव पाहायला मिळतो. वेरुळ, घारापुरी, मंडपेश्वर, टाकळी- ढोकेश्वर, आंबेजोगाई येथे हिंदू लेणी पाहायला मिळतात. या लेण्यांचा आराखडा साधारणतः बौध्द लेण्यांना अनुसरणारा असला तरी त्यात हिंदू देवता, महाभारत – रामायणातील प्रसंग आणि हिंदू परंपरेतील प्रतिके कोरलेली पाहायला मिळतात.
जैन लेणी
महाराष्ट्रात आढळणारी आणखी एका प्रकारची लेणी म्हणजे ‘जैन लेणी’. या लेण्यांचा कालावधी आठव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंतचा धरला जातो. बौध्द धर्मियांप्रमाणेच जैन धर्मियांनीही आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी अनुयायांना देशाच्या विविध भागात पाठवले. हे जैन साधू आणि श्रमण देखील पावसाळ्यात एकाच ठिकाणी निवास करत असत. त्यासाठी त्यांनी शैलगृहांचा वापर सुरू केला आणि हळू हळू बौध्द लेण्यांप्रमाणे आपली लेणी खोदायला सुरवात केली. महाराष्ट्रात अंजनेरी, मांगीतुंगी, चांदवड, आंबेजोगाई, धुळे, जुन्नर इथे जैन लेणी पाहायला मिळतात. या लेण्यांमध्ये जैन तिर्थंकर आणि जैन दैवते कोरलेली आहेत. जैन लेणीही नाजूक कोरीवकामाने सजवलेली आहेत.
महाराष्ट्राचं डॉक्युमेंटेशन – कातळशिल्पे
महाराष्ट्राच्या इतिहासाचा, सामाजिक आणि धार्मिक परंपरेचा दस्त ऐवज कोरीव स्वरुपात मांडणाऱ्या लेण्यांचा आढावा घेताना, एक प्रश्न मनात येतो की लेणी खोदण्याच्याही आधी, त्या पूर्वीच्या काळात अशा प्रकारची कला किंवा दस्त ऐवजीकरण झालं होतं का ? शैलाश्रयात राहाणाऱ्या अश्मयुगिन मानवाने खडकावर आपल्या काळाच्या खाणाखुणा नोंदवल्या होत्या का ? तर याचं उत्तर आहे की होय. ज्या प्रमाणे भिमबेटका मधल्या गुहांच्या भिंतींवर आदिमानवाच्या चित्रकलेचे नमुने पाहायला मिळतात त्याच प्रमाण महाराष्ट्रातील कोकणात अतिप्राचीन काळातल्या माणसाच्या कोरीवकामाचे नमुने कातळ शिल्पांमधून पाहायला मिळतात. या कातळ शिल्पांना किंवा कातळ चिन्हांना ‘पेट्रोग्लिफ्स’ म्हणतात. महाराष्ट्रात रत्नागिरी,लांजा, राजापूर,देवगड,मालवण या तालुक्यांमध्ये सुमारे पन्नास ठिकाणी अशी कातळ शिल्पे पाहायला मिळतात. यातली राजापूर तालुक्यातली बारसू येथील कातळशिल्पे अलिकडे प्रसिध्दीच्या झोतात आली ती तिथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पामुळे. बारसू येथे एक भव्य मानवी आकृती कोरलेली पाहायला मिळते आणि तिच्या दोन बाजूंना पट्टेरी वाघ दाखवलेला आहे. तर गिर्ये येथिल कातळ चिन्हामध्ये वाघाने हरणे धरलेली दाखवली आहेत. या कातळ चिन्हांमध्ये जसे मोर, मासा, वराह, हरण, वाघ हे प्राणी खोदलेले पाहायला मिळतात तसेच कोकणात आज न दिसणारे एकशिंगी गेंडा, पाणघोडा असे प्राणीही पाहायला मिळतात. काही ठिकाणी चौकोन, त्रिकोण, गोल-अर्धगोल अशा भौमितिक आकारांची रचना दिसते. यातून काही संदेश देण्याचा वा कशाची तरी स्मृती जतन करण्याचा प्रयत्न केला असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. वेगवेगळ्या गावांच्या परिसरात ही कातळ शिल्पे हजारो वर्षे आहेत. त्यामुळे त्या त्या ठिकाणी त्यांच्या भोवती लोककथा-दंतकथांचे वलय तयार झालेले पाहायला मिळते. प्राचीन काळातील माणसाने आपल्या सर्जनतेला वाव देताना, आपल्या जगण्यातील काही क्षण नोंदवताना ही कातळ चिन्हे तयार केली आहेत. कोणत्या काळातल्या कुठल्या मानव समूहाकडून ही चिन्हे खोदली गेली असतील याबाबत ठाम पुराव मिळालेला नाही.राज्य शासनाने संरक्षित मानचिन्ह म्हणून या कातळशिल्पांना दर्जा दिला आहे .अधिक संशोधनानंतर या अनोख्या कलाकृतींचे गूढ उलगडले जाईलच.
भाजे लेण्यांचा इतिहास
महाराष्ट्रातील आद्य लेणी म्हणून ओळखली जातात ती लोणावळ्याजवळची ‘भाजे लेणी’. मावळ तालुक्यात भाजे गावाजवळ ही लेणी आहेत. लोणावळ्याजवळच्या मळवली या गावापासून हे ठिकाण जवळ आहे. एकीकडे लोहगड आणि दुसरीकडे विसापूरचा किल्ला यांच्या बेचक्यात ही लेणी आहेत. ही लेणी ‘बौध्द हिनयान’ पंथाची लेणी आहेत. चैत्य, विहार आणि भोजन कक्ष मिळून इथे बावीस लेणी आहेत. इसवी सनपूर्व 250 ते इसवी सन 1200 इतक्या प्रदीर्घ काळात या लेण्यांची निर्मिती झाली आहे. या लेण्यांमधील 12 क्रमांकाचे चैत्य लेणे सर्वात लक्षवेधी आहे.या चैत्यगृहाच्या दालनात 27 अष्टकोनी कोरीव स्तंभ पाहायला मिळतात. या सभागृहाच्या छतावर अर्धवर्तुळाकार आकाराच्या लाकडी फळ्या बसवलेल्या पाहायला मिळतात. या लाकडी फळ्या लेण्यांइतक्याच जुन्या म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या चैत्यगृहातील भव्य दगडी स्तूप आणि त्यावरील दगडी हर्मिका पाहून थक्क व्हायला होतं. या स्तुपाचा परिघ साधारण नऊ-साडे नऊ फूटांचा आहे तर उंची साधारण सहा-साडे सहा फूट आहे. भाजे येथील लेण्यांचा बाह्य भाग कोरीवकामाने सजवलेला आहे.या लेण्यांच्या संकुलात उघड्यावर चौदा स्तूप एकाशेजारी एक कोरलेले पाहायला मिळतात. भाजे लेण्यांमधील सूर्य गुंफा पाहाण्यासारखी आहे. या गुहेत चार घोड्यांच्या रथातून जाणारा सूर्यदेव आणि ह्त्तीवर आरुढ झालेला इंद्र याचे शिल्प आहे. आता बौध्द लेण्यांमध्ये हिंदू पुराणातला इंद्र कसा ? तर काही तज्ञांच्या मते तो इंद्र नसून बुध्दाचा शत्रू ‘मार’ आहे तर काही तज्ञांच्या मते ही शिल्पे सातवाहन राजा पहिला सातकर्णी आणि त्याचा पुत्र कुमार सातवाहन यांची आहेत. भाजे लेण्यांना लाभलेली सुंदर नैसर्गिक पार्श्वभूमी आणि तिथला धबधबा यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची पावले इकडे मोठ्या प्रमाणावर वळतात.
(महाराष्ट्रातील आणखी काही महत्वाच्या लेण्यांचा आढावा पुढल्या भागात अवश्य वाचा.)
संदर्भ ग्रंथ — लेणी महाराष्ट्राची – डॉ.दाऊद दळवी