चारशे वर्ष लेण्यांचे खोदकाम
महाराष्ट्रातील लेणी म्हटल्यावर सगळ्यात आधी ‘अजिंठा-वेरुळ’ हे नाव आठवतं. पण ही लेणी काही शेजारी शेजारी नाहीत, प्रत्यक्षात अजिंठा आणि वेरुळ यांच्यात शंभर किलोमीटरचं अंतर आहे. औरंगबाद शहर हे या दोघांमधला दुवा म्हणता येईल. अजिंठा लेणी खोदण्यासाठी जो डोंगर-परिसर निवडला त्यावरुनच ह्या लेण्यांच्या निर्मात्याची सौंदर्यदृष्टी कळते. नैसर्गिक अर्धवर्तुळाकार आकाराचा डोंगर, त्यामधून वाहणारी वाघूर नदी आणि त्यामुळे निर्माण झालेली वनराजी. यामुळे या लेण्यांना एक अनोखा कॅनव्हासच मिळाला आहे. शेकडो वर्षे हजारो कारागिरांचे कौशल्य, दानशूर दात्यांची देणगी आणि सर्वसामान्य लोकांचा पाठींबा या जोरावरच अजिंठ्यासारखी भव्य, अलौकिक कलाकृती निर्माण झाली. अजिंठा लेणी प्रामुख्याने बौध्द लेणी आहेत. तर वेरुळ येथे हिंदू लेण्यांसोबतच जैन आणि बौध्द लेणीही पाहायला मिळतात. अजिंठ्याच्या तीस लेण्यांपैकी पाच चैत्यगृह आणि बाकीची पंचवीस ही विहार प्रकारची लेणी आहेत. यातील काही लेणी हिनयान तर काही महायान पंथाची आहेत. इसवी सन पूर्व दोन शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक अशा विस्तीर्ण कालखंडात ही लेणी खोदली गेली. सातवाहन-गुप्त-वाकाटक अशा वेगवेगळ्या राजवटींचा राजाश्रय या लेण्यांना मिळाला.
ब्रिटिश अधिकाऱ्याकडून पद्मपाणी बोद्धीसत्वाचा शोध
ब्रिटिश राजवटीत अधिकारी जॉन स्मिथ हा या परिसरात शिकारीला गेला असताना कालौघात विस्मृतीत गेलेल्या या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला परंपरेचा समृध्द खजिना जगासमोर आला. लेणे क्रमांक 1 मधील वीस खांबांवर उभारलेलं दालन, लेणे क्रमांक 2 मधील बुध्दाच्या जन्माची चित्रे, लेणे क्रमांक 4 या आकाराने सर्वात मोठ्या लेण्यांमधील बुध्दाच्या 6 मोठ्या मूर्ती, लेणे क्रमांक 10 मधील पाली भाषेतला शिलालेख, लेणे क्रमांक 16 व 17 मधील अप्रतिम शिल्पे आणि सुंदर चित्रकला अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अजिंठा लेणी ही महाराष्ट्राचा कलात्मक वारसा ठरली आहेत. अजिंठा लेण्यांमधली चित्रे जगप्रसिध्द आहेत. लेणे क्रमांक 1 हा अजिंठ्यातील सर्वात उत्कृष्ट विहार मानला जातो. या ठिकाणचे पद्मपाणी बोधीसत्वाचे चित्र प्रसिध्द आहे. प्रमाणबध्दता आणि भावपूर्णता यामुळे हातात कमळ धारण केलेला हा बुध्दा मनाचा ठाव घेतो. त्यात चित्रकाराने या बुध्दाचे डोळे असे रेखाटलेले आहेत की डावीकडून उजवीकडे जाताना तुमच्या बरोबर बुध्दाची नजरही फिरते.
‘आधी कळस मग पाया’
संभाजी नगर (औरंगाबाद) पासून साधारण पाऊण तासाच्या अंतरावर वेरुळ आहे. वेरुळ हे गाव तिथल्या ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या मंदिरासाठीही प्रसिध्द आहे. याच गावाजवळ वेरुळची लेणी आहेत. वेरुळची लेणी इसवी सन पाच ते दहा या शतकात निर्माण झालेली आहेत. इथे एकूण शंभर गुंफा आहेत त्यापैकी सुमारे चौतीस पर्यटकांना पाहाण्यासाठी खुल्या आहेत. यातील 16 क्रमांकाचे लेणे म्हणजेच कैलास मंदीर. हे कैलास मंदिर हे त्याच्या अद्भूत स्थापत्यासाठी जगप्रसिध्द आहे. या लेण्याची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण -पहिला याच्या कारकिर्दीत झाली. वेरुळचा ( खरतर महाराष्ट्रातील सगळ्याच कोरीव लेण्यांचा ! ) मुकुटमणी ठरलेलं हे लेणं ‘आधी कळस मग पाया’ या पध्दतीने वरुन खाली असे कोरत तयार करण्यात आले आहे.त्याबाबतच्या वेगवेगळ्या लोककथा प्रसिध्द आहेत. कैलास मंदिराची रचना एखाद्या रथाप्रमाणे असून, हा रथ वाघ आणि हत्तींनी आपल्या डोक्यावर उचलून धरला आहे. या ठिकाणी कैलास पर्वतावर बसलेले शिवपार्वती आणि कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करणारा रावण याचे शिल्प पाहायला मिळतं.
दोन लाख टन कातळ फोडला
कैलास लेणे खोदताना कारागिरांनी सुमारे दोन लाख टन वजना इतका कातळ फोडून काढला असावा असा अंदाज आहे. या लेण्यामध्ये गणपती, महिषासूर मर्दिनी, शिव, विष्णू, इंद्र, नरसिंह, वराह, ब्रह्मा तसेच गंगा, यमुना, सरस्वती या नद्या अशी विविध शिल्प पाहायला मिळतात. कोरीव काम आणि दगडातील कलाकुसरीचा सर्वोत्तम नमुना म्हणून कैलास लेणे ओळखले जाते.
तीन मजली लेणं
वेरुळच्या लेण्यांमधील ‘दशावतार लेणं’, ‘रामेश्वर लेणं’, ‘नीलकंठ’, ‘सीता की नहाणी’ ही लेणी ही त्यातील अद्वितिय कोरीव शिल्पांमुळे प्रसिध्द आहेत. वेरुळ येथील बौध्द लेणी ही महायानपंथीयांची आहेत. त्यामुळे या लेण्यांमध्ये विशाल बुध्दमूर्ती, बोधिसत्व तारा, महामयुरी अशा देवता आणि यक्ष,किन्नर यांची सुंदर शिल्पे पाहायला मिळतात. वेरुळच्या बौध्द लेण्यांपैकी 10 नंबरचं लेणं ‘विश्वकर्मा गुहा ’ म्हणून ओळखलं जातं. हे तीन मजली लेणं अप्रतिम शिल्पांनी नटलेलं आहे. वेरुळच्या लेण्यांपैकी क्रमांक 30 ते 34 ही लेणी जैन लेणी आहेत. यातलं 30 नंबरचं लेणं हे ‘छोटा कैलास’ नावाने ओळखलं जातं. हे लेणं म्हणजे वेरुळच्या प्रसिध्द कैलास लेण्याची छोटी प्रतिकृती आहे. जैनांची लेणी असल्याने या लेण्यात तीर्थंकर महावीर, पार्श्वनाथ यांच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. यातले 32 नंबरचं लेणं हे इंद्रसभा म्हणून ओळखलं जातं.
कान्हेरी लेणी
महाराष्ट्रातील लेण्यांमधला एक महत्वाचा समूह मुंबईतल्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात’ पाहायला मिळतो. ‘कान्हेरी लेणी ’ म्हणून ही ओळखली जातात. इतिहास काळातील प्रसिध्द बंदरे- शूर्पारक – आजचं सोपारे आणि कल्याण या स्थानापासून जवळ असल्याने या ठिकाणच्या लेण्यांना तेव्हा विशेष महत्व होतं. जवळपास अकरा शतके हा परिसर वापरता होता. त्यामुळे या कालखंडाच्या खाणाखुणा इथे पाहायला मिळतात. संशोधकांच्या अभ्यासानुसार मुळातली हीनयान पंथीयांची ही लेणी पाचव्या शतकात महायान पंथीयांनी ताब्यात घेतली. कान्हेरीच्या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक शिलालेख आहेत. प्राकृत, ब्राह्मी, संस्कृत भाषेबरोबरच पहलवी आणि चिनी भाषेतले लेख ही इथे पाहायला मिळतात. पहलवी म्हणजे प्राचीन इराणी भाषेतल्या लेखात इराणचा राजा यझदेजर्द शहरियारचा उल्लेख वाचायला मिळतो. कान्हेरीच्या लेण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या लेण्यात बोधीसत्व पद्मपाणी अवलोकितेश्वराचे भव्य शिल्प पाहायला मिळतात. याच लेण्यात बुध्दाची उपासना करणाऱ्या नऊ भक्तांच्या मूर्ती आणि नावे आहेत. 3 नंबरचे लेणे हे कार्ल्यातील लेण्यासारखे भव्य चैत्यगृह आहे. 21 नंबरच्या लेण्यातील शिल्पात पद्मपाणीला अकरा मस्तके दाखवलेली आहेत.
भर समुद्रातील घारापुरी लेणी
मुंबईच्या जवळ असलेली आणि सुंदर शिल्पांसाठी प्रसिध्द असलेली लेणी म्हणजे ‘घारापुरी’ किंवा ‘एलिफंटा’ची लेणी. भर समुद्रातल्या बेटांवर खोदलेल्या या लेण्यांचा समावेश युनेस्को हेरिटेज साइट्सच्या यादीत झाला आहे. घारापुरीची लेणी नेमक्या कोणत्या काळात निर्माण झाली याबाबत तज्ञांमध्ये एकमत नाही. या हिंदू लेण्यांवर शैव पंथाचा मोठा प्रभाव दिसतो, मात्र या बेटावर काही स्तुपांचे अवशेष आहेत. मुंबई आणि भोवतीचा भाग पोर्तुगिजांनी ताब्यात घेतल्यानंतर या बेटावरील शिल्पांचा वापर पोर्तुगिजांनी नेमबाजीच्या सरावासाठी केला असे सांगितले जाते. त्यामुळे इथल्या शिल्पांची अतिशय मोडतोड झालेली आहे. घारापुरीच्या लेण्यांमधील सर्वात प्रसिध्द आहे ते ‘त्रिमूर्ती लेणं’. या लेण्यात कोरलेली भव्य म्हणजे सुमारे बावीस-तेवीस फूट उंचीची त्रिमूर्ती डोळ्यांचं पारणं फेडते. ही मूर्ती ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीची आहे, का ही शिवाचीच तीन रुपे आहेत याबाबतही संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. घारापुरीतील रावणानुग्रह, अर्धनारीनटेश्वर, शिव-पार्वती विवाह, शिव- पार्वती सारीपाट, अंधकासुर वध ही शिल्पे आवर्जून पाहाण्यासारखी आहेत. मुंबईसारख्या महानगरात अगदी सहज जाऊन पाहाता येतील अशी कान्हेरी आणि घारापुरीची लेणी आहेत. या आपल्या कलात्मक वारशाचा लाभ सर्वांनी घ्यायला हवा.
जुन्नर परिसरात तीनशे लेणी
महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाच्या आणि तत्कालीन समाजजीवनाच्या खाणाखुणा जपणारी लेणी कोकणपासून ते नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी आहेत. संभाजीनगरची( औरंगाबाद) लेणी, त्या जवळचं पितळखोरा इथली लेणी काय किंवा कर्जत जवळची कोंढाणा लेणी, पुणे जिल्ह्यातील बेडसे लेणी असोत. ही सगळी लेणी आपल्याला आठशे-हजार वर्षांपूर्वीच्या काळाचे कवडसे दाखवतात. या लेण्यांच्या जागा किंवा स्थान निश्चिती यावरुन प्राचीन काळातील व्यापारी मार्ग, बाजारपेठा, बंदरे यांच्या समृध्दतेचा अंदाज येतो. जुन्नर परिसरात अनेक ठिकाणी मिळून सुमारे तीनशे लेणी आहेत. यातली अनेक लेणी सर्वसाधारण पर्यटकांना माहीत ही नाहीत. तर नाशिक जवळची ‘बौध्द लेणी ’ परंपरेनं ‘पांडव लेणी’ म्हणून ओळखली जातात.
लेण्यांमधील शिलालेखांतून तत्कालीन माहिती
महाराष्ट्रातल्या लेण्यांमधील शिलालेख आणि मूर्ती कला हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. यातल्या अनेक शिलालेखांमधून त्या त्या काळातील धनिक, राजवंशातील लोक, व्यापारी यांच्याविषयी काही माहिती मिळते. या मंडळींनी लेणी खोदण्याबरोबरच, त्यांची निगा राखणे, तेथे राहाणाऱ्या भिक्षूंच्या भोजन-औषधपाण्याची-वस्त्रांची सोय करणे, भिक्षूंच्या अध्ययनासाठी पुस्तकांची सोय करणे यासाठी देणग्या दिल्याचे उल्लेख या शिलालेखांमध्ये वाचायला मिळतात.
विविध धर्म उत्क्रांतीच्या कथा
लेण्यांमधील शिल्पकला ही जणू भारतात वेगवेगळे धर्म कसे उत्क्रांत होत गेले, याच्याच खुणा दाखवणारी आहे. बौध्दांमधील हीनयान पंथीयांना मूर्तीपूजा मान्य नव्हती पण त्यांनी खोदलेल्या लेण्यांमध्ये बुध्दाचे अस्तित्व बोधिवृक्ष, पादुका, भिक्षापात्र अशा संकेतांमधून दाखवलेलं आहे. तर महायान पंथीयांनी बुध्दाला देव मानून, त्यानुसार बुध्दाच्या मागे प्रभावळ दाखवण्यापासून ते चेहऱ्याची ठेवण विशिष्ट प्रकारची करण्यापर्यंत सगळे बदल केले. हिंदू लेण्यांमधील देवता त्यांच्या वाहनावरुन, त्यांनी हातात धारण केलेल्या आयुधांवरुन ओळखणे सोपे झाले. जैन लेण्यांमधील तीर्थंकरांची ओळख ही त्यांची वाहने, लांछने यावरुन होते. महाराष्ट्राच्या कला परंपरेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी लेण्यांमधील मूर्ती हा संदर्भ ठेवा आहे. एकूणच महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा लेण्यांच्या रुपाने पाहायला मिळतात, त्यांचं जतन हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.