पर्माकल्चरचा प्रत्यक्ष वापर : भाग 3

Permaculture : पर्माकल्चर आणि त्याचा परिणाम हा एका रात्रीत जादूची कांडी फिरवल्यासारखा नसतो. त्याकरता तुमच्याकडे पेशन्स म्हणजेच संयम असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कामामुळं काय परिणाम होतात हो हळूहळू दिसू लागतं. कधीकधी काही गोष्टी चुकीही शकतात. अशावेळी हताश व्हायचं नाही. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य हवं. आमच्या शेतात पर्माकल्चरचा वापर आम्ही कशाप्रकारे करत आहोत, या प्रयत्नांनी किती काळात काय होतंय पाहुयात.

पर्माकल्चर आणि त्याचा परिणाम हा एका रात्रीत जादूची कांडी फिरवल्यासारखा नसतो. त्याकरता तुमच्याकडे पेशन्स म्हणजेच संयम असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कामामुळं काय परिणाम होतात हो हळूहळू दिसू लागतं. कधीकधी काही गोष्टी चुकीही शकतात. अशावेळी हताश व्हायचं नाही. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य हवं. आमच्या शेतात पर्माकल्चरचा वापर आम्ही कशाप्रकारे करत आहोत, या प्रयत्नांनी किती काळात काय होतंय पाहुयात.

छोटे आणि सावकाश उपाय

हे तत्त्व सांगतं की, प्रयोग करताना घाई करता, सावकाश, छोट्या स्तरावर बदल करून, त्यांचं नीट व्यवस्थापन करावं. या अनुभवातून शिकणे आणि मगच व्याप्ती वाढवणे हे महत्त्वाचे आहे. निसर्ग ज्या पद्धतीने सावकाश, समतोल सांभाळत बदल करत जातो,  हेच तत्त्व आपण पाळावं.  नाहीतर, सुरुवातीलाच मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे सुरुवातीला केलेल्या मोठ्या चुका नंतर दुरुस्त करणे सहजासहजी शक्य नसतात.

उदा. एखादं नवं पीक किंवा बियाणं घ्यायचं असेल तर पहिल्यांदाच संपूर्ण शेतात लावण्यापेक्षा आधी थोड्या क्षेत्रात लावून अनुभव घ्यावा. मग व्याप्ती वाढवणं योग्य असं पर्माकल्चर म्हणतं.

कोंबड्या पाळायच्या ठरवल्या की, एकदम भरपूर गुंतवणूक करून पाच- दहा हजार कोंबड्या पाळायला सुरुवात करणे ही एक पद्धत, तर पंधरावीस कोंबड्या आणून त्यातून व्यवस्थापन, कोंबड्यांचे आजार, आहार, प्रकार, मार्केट इत्यादींबाबत शिकायचं. या गोष्टींचा अंदाज घेऊन मग डिझाईनमध्ये योग्य ते बदल करून हळूहळू कोंबड्या वाढवणे ही दुसरी पद्धत. ह्यातली कोणती पर्माकल्चरच्या तत्वात बसेल? ते तुम्हांला लक्षात आलं असेलच.

आमच्या शेतात बाबांनी 24 वर्षांपूर्वी आवड म्हणून हापूस आंब्याची रोपे लावली. ही रोपं लावताना पावसाळा सुरु झाला. झाडांची संख्या उपलब्ध जागेपेक्षा बरीच जास्त होती. त्यामुळं रोपं जवळजवळ लावण्यात आली. रोपं लावताना पुरेसे मोठे खड्डे करून त्यात चांगली माती देता आली नाही. परिणामी प्रचंड मेहनत करूनही खूप कमी रोपं जगली. अंतर कमी असल्यानं जगलेली झाडं एकमेकांच्या जवळ आल्याने, उन्हासाठी ती उंच गेली. हापूस आंबा दोन वर्षांतून एकदा येतो. त्याला फळमाशी लागते, हवामान बदलाचा आणि वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम होतो. समुद्राच्या खाऱ्या हवेपासून दूर असल्याने आंबे उशिरा तयार होतात. हवं तेवढं उत्पादन आणि उत्पन्न मिळत नाही, हे लक्षात येईपर्यंत वीस वर्ष निघून गेलेली आहेत. आधीच अभ्यास केला असता तर कदाचित आमच्या पुरते हापूस आंबे लावून, व्यापारी तत्वावर घेण्यासाठी काही वेगळ्या जातीचे आंबे लावता आले असते.

विविधतेचे महत्त्व वापर 

व्यवस्थेत स्थिरता आणि दृढता (resilience) आणण्यासाठी सजीव आणि वेगवेगळ्या व्यवस्थांमधील विविधता जोपासणे, ह्या तत्त्वात अभिप्रेत आहे. जंगल एकाच प्रकारच्या वनस्पतींनी किंवा एकाच जातीच्या प्राण्याने तयार होत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या सजीवांची परस्परांवर अवलंबून असलेली व्यवस्था असते. कोणतीही व्यवस्था टिकून राहण्यासाठी अनपेक्षित आघात झेलण्याची तिची क्षमता, काटकपणा महत्त्वाचा असतो. विविधता हा काटकपणा पुरवू शकते. अशी व्यवस्था पण आपल्या व्यवस्थेत जाणीवपूर्वक करुन घेतली पाहिजे. आपल्या व्यवस्थेतील प्रत्येक काम करण्यासाठी किमान तीन पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे, असं पर्माकल्चर तज्ञ सुचवतात.

उदा. कोंबड्यांसोबत बदकेही पाळता आली तर अंडी आणि मांस देणारे दोन स्रोत निर्माण होतील. समजा काही कारणाने कोंबड्यांवर रोग आला, तर बदके तरी टिकून राहतील. आणि अंडी आणि मांस मिळत राहील. ह्या दोघांच्या जोडीला प्रोटीनचा तिसरा स्रोत म्हणून शेजारच्या ओढ्यातील मासे आम्ही योग्य ऋतूत पकडतो आणि वाळवून ठेवतो.

सुरुवातीला आमच्याकडे कामावर जी माणसे येत ती एकाच वाडीतून येत. त्यांच्या वाडीत एखादा सण असला, लग्न असलं किंवा मयत झालं की सगळेच कामगार सुट्टी करत. मोहरान हा एक फार्मस्टे असल्याने जेवण, स्वच्छता, सर्व्ह करण्यासाठी स्टाफ रोजच हवा असतो. सर्वच स्थानिक असल्याने सगळे एकत्र सुट्टी घेणार नाहीत, अशी व्यवस्था करून आमच्या स्टाफमध्ये वेगवेगळी कौशल्ये तयार होतील ह्याकडे लक्ष दिले. ह्यामुळे कोणतंही काम सहसा अडून राहत नाही. सर्वांमध्ये कौशल्य वाढतं, आत्मविश्वास वाढतो हे आणखी काही फायदेही होतात.

कुंपणाचे सीमांचे महत्व वापर 

कल्पना करा की तुम्ही अंदमानमधल्या एखाद्या निर्जन बेटाच्या बाहेर असलेल्या होडीतून बेटाकडे पाहत आहात. तर बेटाची जी बाहेरची कडा आहे तिथे किनाऱ्यापासून आत असलेल्या भागापेक्षा जास्त सूर्यप्रकाश असतो. भरती ओहोटीमुळे पाण्याची पातळी वरखाली होत असते. वाराही थेट आत येत असतो. त्यामुळे बेटाच्या अंतर्गत भागापेक्षाही जास्त विविधता बेटाच्या किनाऱ्यावर तयार होत असते. जलचर आणि भूचर जीवांसोबत उभयचर जीव छान वाढत असतात. ह्यावरून लक्षात येईल की, दोन वेगवेगळ्या परिसंस्था मिळतात, त्या सीमांवर दोन्ही परिसंस्थांच्या आतल्या भागापेक्षा वेगळी रचना तयार होऊन अनेक उत्कंठावर्धक गोष्टी घडत असतात. सीमांवरचं वेगळं सूक्ष्मवातावरण, सर्व सजीवांतील जगण्यासाठीची स्पर्धा ह्यामुळे अशा ठिकाणी विविधता भरपूर असते. पर्माकल्चर अशा कडांचा कल्पक वापर करणे सुचवते. उदा. कुंपणावर, तोंडली, दुधी, घोसाळी ह्यासारख्या वेली वाढवणे म्हणजे भाज्याही मिळतील आणि वाऱ्याला प्रतिबंधही होईल. वेलींसाठी वेगळा मांडवही घालावा लागणार नाही.

आमच्या शेतात काही छोटे तलाव आहेत. तलावातलं जमिनीवरचं मायक्रोक्लायमेट वेगळं असतं आणि तलावांच्या काठावरचं वेगळं. मग आम्ही काठांवर नळीची भाजी, वेखंड, थाई जिंजर अशा वेगळ्या वनस्पती वाढवतो आहोत ज्या तिथे छान वाढू शकतात.

बदलांना कल्पक प्रतिसाद त्यांचा वापर

कितीही चांगली रचना केली तरी आजुबाजूच्या वातावरणात अनपेक्षित बदल सतत होत असतात. हेराक्लायटसने म्हटल्याप्रमाणे Only constant in life is change! तंत्रज्ञान, हवामान, माणसे, निसर्ग हे सतत बदलत असतात. पर्माकल्चरचं हे तत्व बदलांकडे सुधारणा करण्याची संधी म्हणून पाहून, व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांचा कल्पकतेने वापर करायला सांगतं. कोरोनाच्या साथीत आपल्या सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला होता. तेव्हा अनेकांनी जुन्या रुळलेल्या वाटा त्यागून नवीन संधी शोधल्या आनंदी, समाधानी, कृतार्थ आयुष्य जगायचं ठरवलं.

उदा. दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात आमचं आतल्या रस्त्याच्या कडेला असलेलं कुंपण पडलं. रस्ता मोठा होता पण पाहुण्यांच्या गाड्यांना पार्किंगसाठी जागा नव्हती. अनायासे पडलंच होतं तर आधीचं कुंपण आहे तसं ठेवण्याऐवजी आम्ही ते आणखी आत नेलं. त्यामुळे फार्मस्टेच्या पाहुण्यांच्या गाड्यांना पार्किंगसाठी भरपूर जागा उपलब्ध झाली

गेल्या वर्षी आंबे जास्तच उशिरा तयार झाले आणि विक्री करायची असतानाच पाऊस आला आणि थेट शेतातून ग्राहकांकडे कुरियर करणे कठीण झाले. आंब्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकेल असं लक्षात आल्याबरोबर आम्ही उरलेले सगळे आंबे पल्प करण्यासाठी पाठवून त्यांचं मूल्यवर्धन केलं त्यामुळे कोणत्याही ऋतूत आमरस करणे शक्य झाले. विक्रीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Surya devta : सूर्याच्या मकरसंक्रमणाचा दिवस म्हणजे मकरसंक्रांती. म्हणजेच या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ह्या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात
Snoring a health Issue : घोरणारी माणसे तशी सुखी असतात. कारण ते घोरतात किंवा किती मोठ्या प्रमाणात घोरतात हे त्यांना
Fake reviews : ऑनलाइन खरेदी करताना फेक रिव्ह्यू म्हणजेच खोटे रिव्ह्यूज ओळखणे हे खूप महत्त्वाचे असते. फेक रिव्ह्यू ग्राहकांची दिशाभूल

विधानसभा फॅक्टोइड

जालना : शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा काँग्रेसचे  उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा आरोप. गोरंट्याल यांनी संभाजीनगर खंडपीठात दाखल केली याचिका.