तुम्ही इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडिओज बघता? सोशल मीडिया सकारात्मक परिणामही करते, चांगला संदेशही देते, खळखळून हसवते, विचार करायला भाग पाडते यावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच तिचे ‘फॅन’ असाल. ती आहे तुमच्या आमच्यासारखीच सर्वसामान्य घरातली. पण तरीही जगभरात तिचा डंका वाजतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
170 लाख फॉलोअर्स
हवामान बदल, शिक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर तिनं आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलं आहे. तिचं नाव आहे, प्राजक्त कोळी! सगळ्यांत प्रभावी इन्फ्लुएन्सर असलेली प्राजक्ता फक्त सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर चित्रपट, ओटीटी आणि मुख्य म्हणजे सामाजिक स्तरावरही तिनं आपला ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर तिचे तब्बल 170 लाख फॉलोअर्स आहेत. तर फक्त इन्स्टाग्रामवर 79 लाख फॉलोअर्स आहेत.
रेडिओ जॉकी ते युट्यूबर
ठाण्यात अगदी मध्यमवर्गीय घरात जन्मलेली प्राजक्ता तिच्या गोड हसण्यासाठी, तिच्या चुलबुलेपणासाठी प्रसिध्द आहे. तिचं ‘मोस्टली सेन’ हे यूट्युब चॅनेल तुफान लोकप्रिय आहे. तुमच्या आमच्या घरांत, आपल्या आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवरचे हे व्हिडिओ अगदी लहान मुलांपर्यंत ते आजीआजोबांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात. प्राजक्ताचा सहज वावर, मिश्कील भाषा, बोलण्याची स्टाईल यामुळे ती अगदी घरांघरांत पोहोचली आहे. प्राजक्ताचे वडील रिअल इस्टेट व्यावसायिक होते, नंतर त्यांनी रेस्टॉरंटही सुरु केलं. तर आई फोनेटिक्स आणि भाषातज्ञ आहे. ठाण्यातल्या वसंत विहार शाळेची ती विद्यार्थिनी. वझे केळकर कॉलेजमधून तिनं मास मीडियामधून मास्टर्सची पदवी घेतली. अगदी लहानपणापासूनच तिला रेडिओ जॉकी बनायचं होतं. ती सहावीत असताना रेडिओ जॉकी म्हणून तिनं कामंही केलं. त्यानंतर कॉलेज संपल्यावर प्राजक्ताने FM 104 या रेडिओ चॅनेलवर रेडिओ जॉकीचं काम केलं आहे. तिथं तिचा ‘कॉल सेंटर’ या नावाचा शो होता. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर इंटर्नशिप करत असताना तिची भेट सुदीप लाहिरी यांच्याशी झाली. त्यांनी तिच्यातले गुण बघून तिला यूट्यूब चॅनेल काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
मनोरंजन ते सामाजिक विषय
काहीतरी वेगळं आणि क्रिएटिव्ह करण्याचं स्वप्नं असलेल्या प्राजक्तानं 2015 मध्ये ‘मोस्टली सेन’ हे तिचं यूट्यूब चॅनेल सुरु केलं. अगदी थोड्या काळातच हे चॅनेल प्रचंड लोकप्रिय झालं. त्यातली संकल्पना, लिखाण सगळं काही प्राजक्ताच करते. 2020 मध्ये ‘मिसमॅच्ड’ ही तिची वेबसीरिजही प्रचंड लोकप्रिय ठरली. या सीरिजचा दुसरा सीझनही आला. त्यानंतर प्राजक्ता बॉलीवूडमध्येही झळकली. ‘जुग जुग जियो’ या सिनेमात तिनं केलेली गिन्नीची भूमिकाही सगळ्यांनाच आवडली. तिच्या ‘अंगारो’ आणि ‘आली ठुमकत’ या गाण्यांच्या मॅशअपवरच्या डान्सलाही लाखोंनी views मिळाले. 2020 मध्ये तिनं Pretty Fit हा तिचा नवा शो सुरु केला. फिटनेस, व्यायामासंदर्भातला हा शो भरपूर लोकप्रिय झाला. यामध्ये तिनं करिना कपूर, नेहा कक्कर, सान्या मल्होत्रा, आर जे मलिष्का, मिथिला पालकर, सुमुखी सुरेश यांच्या फिटनेसबद्दल खास मुलाखती घेतल्या. या शोलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. फिटनेस फ्रिक असलेली प्राजक्ता अनेकदा तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओजही पोस्ट करते. त्यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये यूट्यूबच्या माजी सीईओ Susan Wojcicki यांनी प्राजक्ताच्या “Real Talk Tuesday” या सीरीजची निवड त्यांच्या मुलाखतीचं व्यासपीठ म्हणून केली. या मुलाखतीमुळे प्राजक्ताचं नाव तर जगभरात पोहोचलंच पण अनेक नव्या संधीची दारंही तिच्यासाठी उघडली गेली. 2020 मध्ये प्राजक्ताची ‘खयाली पुलाव’ ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली. हरियाणातील महिला सक्षमीकरणाबाबत या शॉर्ट फिल्ममध्ये भाष्य करण्यात आलं होतं.
Climate Influencer Of The Year ते ऑलिंपिक मॅरेथॉन रनर
प्रेक्षकांची नस बरोबर ओळखणाऱ्या प्राजक्तानं तिचा वावर फक्त मनोरंजनापुरताच मर्यादित ठेवलेला नाही. तर अनेक महत्वाच्या सामाजिक प्रश्नांबाबत जागरुकतेसाठी ती आवर्जून उभी राहते. नुकतीच UNDP च्या Climate Week मध्ये तिनं भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. हवामान बदल आणि त्यावरील सध्या उपलब्ध असलेले पर्याय या विषयावर जगभरातील तरुणांना जोडण्यासाठी प्राजक्तानं पुढाकार घेतला होता. सकारात्मक बदलासाठी शिक्षण, काही मुलभूत उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना सहभागी करुन घेण्यासाठी प्राजक्ता या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यामुळेच तिला UNDP भारताची पहिली Youth Climate Champion हा किताब देण्यात आला. तर NDTV च्या वतीनेही तिला ‘Climate Influencer Of The Year’ हा पुरस्कार देण्यात आला. पॅरीस ऑलिंपिकमध्ये मॅरेथॉनमध्ये धावणारी ती पहिली सोशल मीडिया कंटेट क्रिएटर आहे. खेळाप्रती प्रेम, प्रसार आणि एकता या उद्दिष्टांसाठी ऑलिंपिकमध्ये धावलेली प्राजक्ता सध्याच्या जगात कंटेट क्रिएटर्सची भूमिका खूप महत्वाची आहे असं मानते. त्यामुळेच मनोरंजनाच्या पलिकडे जाऊन नेहमीच सामाजिक भान जपताना दिसते. बॉडी शेमिंग, ट्रोलिंग अशा महत्वाच्या विषयांवरही तिनं आपल्या व्हिडिओजमधून भाष्य केलं आहे.
व्ह्यूज आणि लाईकच्या पलीकडे
आज भारतातलीच नव्हे तर जगातली लोकप्रिय influencers पैकी एक असलेली प्राजक्ता खरंतर एकेकाळी यूट्युबवर व्हिडिओज करायचे नाहीत असा विचार करत होती. आणि त्याचवेळेस तिचे व्हिडिओज प्रचंड लोकप्रिय होऊ लागली. मग तिनं मागे वळून पाहिलं नाही. 2019 मध्ये तिचा समावेश ‘Forbes’ च्या Under 30 च्या यादीतही समावेश करण्यात करण्यात आला. गुगल ऑर्गनायझेशनच्या गुगल इम्पॅक्ट चॅलेंजमध्येही तिनं भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. प्राजक्ता You Tube च्या ‘Creators For Change’ या उपक्रमाची जागतिक राजदूतही आहे. हे सगळं प्राजक्तानं तिच्या स्वप्नांचा अविरत पाठलाग केला म्हणूनच शक्य झालं. फक्त सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक्स आणि VIEWS वर ती समाधानी राहिली नाही, तर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तिनं सोशल मीडियाचा उपयोग केला. विविध प्लॅटफॉर्म्सवर ती काम करते.
कॅडबरीसोबतचं नातं
तुमच्या आमच्या घरात, हल्लीची तरुणाई बोलते तीच भाषा आणि संवेदनशील विषय. त्यामुळेच बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला ती आपल्या घरातली वाटते. प्राजक्ताचे ठाण्यातल्या कॅडबरी कंपनीच्या बाहेर भलमोठ्ठं पोस्टर लागलं होतं. ती जाहीरात होती कॅडबरी कंपनीची. एकेकाळी ज्या कॅडबरी कंपनीत तिचे बाबा काम करायचे, त्याच कंपनीच्या जाहिरातीच्या पोस्टरवर प्राजक्ता झळकली होती. हे पोस्टर लागल्यानंतर तिनं एक भावूक पोस्टही लिहीली होती. दिवाळीत कॅडबरी कंपनीचा येणारा चॉकलेट ट्रे आपल्यासाठी खास होता, असं तिनं त्यात म्हटलं होतं. स्वत:वर ठाम विश्वास ठेवून आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत करणारी आणि तरीही पाय जमिनीवरच असलेली प्राजक्ता खरोखरची सोशल आयकॉन आहे.