सोलापूरच्या सांगोल्यात राहणारी सहावीतली मुलगी, जिच्या डोळ्यासमोर तिचे वडील ब्लड कॅन्सरने जातात. आई त्या काळात फक्त चौथीपर्यंत शिकलेली, सोबत दोन बहिणी. वडील अचानक गेल्याने कोसळलेलं आभाळ या मुलींच्या आईनं जिद्दीने पेललं. छोट्या गावात आधी लाजत काजत चार घरी स्वयंपाकाला जाऊ लागल्या. बाई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाकाला जाते म्हणून लोक नावं ठेवायचे. पण नावं ठेवणारी लोकं आपल्याला मदत करायला पुढे होत नाहीत, हे कळल्यावर त्या बाईंनी न लाजता आपल्या उत्तम स्वयंपाकाच्या बळावरच मुलींना मोठ्ठं करायचं ठरवलं. त्यांनी झुणका भाकर केंद्रात काम केलं, खानावळ चालवली, डब्बे पुरविले, हॉस्टेलच्या जेवणाचं कंत्राट घेतलं आणि आपल्या उत्तम स्वयंपाकाचे, कष्टाला न लाजण्याचे संस्कार मुलींवर केले. त्यांचा हाच वारसा स्वीकारलेल्या मुली आपापल्या क्षेत्रात पुढे तर आहेतच, पण त्यांच्यापैकी एक मुलगी सध्या मराठी यूट्यूब चॅनलवर अत्यंत विश्वासार्ह , अचूक रेसिपी देणारी शेफ म्हणून प्रसिद्ध झालीय- ‘सरिताज किचन’ यू ट्यूब चॅनलच्या सर्वेसर्वा सरिता पद्मन.
बीएससी मॅथ्स ते बीपीओत नोकरी
वर उल्लेख केल्याप्रमाणे लहानपणीच्या ओढगस्तीच्या परिस्थितीतून सरिताताई पुढे आल्या. त्या सांगतात, “आईचे कष्ट लहानपणापासून बघत आणि आईला मदत करत करतच आम्ही वाढलो. पण यासोबत आमचे शिक्षणही चालू राहिले पाहिजे यासाठी आई आग्रही होती. आईनं हाताला धरून स्वयंपाक शिकवला नाही, पण आम्ही बघत आणि मदत करत शिकत गेलो. आईसोबत पन्नास लोकांचा डबा करता करता मी आई नसतानासुद्धा पन्नासेक जणांचा डबा करायला शिकले. व्यवस्थापन हा मोठा गुण माझ्याही नकळत मी आई बहिणींचे काम बघून शिकले. पुढे बीएसस्सी मॅथेमेटिक्स झाल्यानंतर एमबीए करण्यासाठी मी पुण्याला जायचे ठरवले. त्याकाळी त्याचीही फी परवडण्यासारखी आमची परिस्थिती नव्हती, आईवर भार पडू द्यायचा नाही या उद्देशाने मी एमबीए करण्याचे रहित केले आणि पुण्यात भरपूर हिंडून छोट्या- मोठ्या नोकऱ्या मिळवल्या. सुरूवातीच्या काळात फक्त दोन चार हजार रूपये पगार होता. बीएससीच्या चांगल्या गुणांच्या बळावर कुठे नोकरी मिळवावी हे ही त्या काळी समजत नव्हते. छोट्या गावातून आल्याचा थोडासा न्यूनगंड होता पण जे काही करायचं ते उत्तमच या बळावर मी पुढे इन्फोसिसच्या बीपीओमध्येही नोकरी मिळविली, तेव्हा माझे पॅकेज सहा लाखांचे होते.”
फौजीची नोकरी ते प्रांतोप्रातीच्या रेसिपी
याचदरम्यान सरिताताई उत्कर्ष पद्मन यांच्या प्रेमात पडल्या. त्यांचे प्रेमप्रकरण अगदी अकरावीपासून सुरू होते, पण स्थिरस्थावर झाल्याशिवाय आणि दोन्हीकडच्या पालकांच्या परवानगीशिवाय लग्न करायचे नाही हे निश्चित होते. उत्कर्ष पद्मन इंडियन नेव्हीत ऑफिसर होते. सुरूवातीपासूनच लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये असलेले दोघेही नऊ वर्षांनी विवाहबंधनात अडकले. लग्न आणि त्यानंतरच्या गोष्टींबद्दल सांगताना सरिताताई म्हणतात, “लग्न करताना उत्कर्षने सांगितले होते-“ मी चोवीस तास देशासाठी दिले आहेत, कुठल्याही क्षणी मला ड्युटीला जावं लागतं, तेवढं फक्त समजून घेशील” ‘फौजीची बायको’ होणं म्हणजे काय, याचा पुरेपुर अनुभव मला लग्नानंतरच्या नऊ वर्षांनी दिला, अर्थात त्याच काळाने मला खूप शिकवले आहे, आत्मविश्वास आणि आनंदही दिला आहे. लग्नानंतरचं पहिलंच पोस्टिंग विशाखापट्टणमचं होतं, मग पुढे अंदमान अश्या अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही राहिलो. वेगवेगळ्या जातधर्मभाषेची माणसं सोबत असायची, उत्कर्ष यांना कधीही ड्युटीवर जावं लागायचं- परत यायची तारीख ठरलेली नसायची, तेव्हा ते सुरूवातीला अवघड वाटायचं पण त्याच काळात मी माझ्या मूळ आवडीने ज्या त्या प्रांतातल्या रेसिपीज शिकून घेतल्या. उदा. मी अंदमानमधल्या मुस्लिम मैत्रिणींकडून परफेक्ट बिर्याणी शिकले तर सांबार मसाला विशाखापट्टणमच्या आजींकडून शिकले. शिवाय शक्य तिथं छोट्या छोट्या नोकऱ्याही केल्या”.
यू ट्यूबद्दल माहीतच नव्हतं
यू ट्यूब चॅनलची सुरूवात कशी झाली हे सांगताना सरिताताई म्हणतात, “खरंतर फौजीची बायको असताना, दुर्गम ठिकाणी पोस्टिंग असताना यू ट्यूब चॅनल वगैरेची मला फारशी माहिती नव्हती, तितकं नेटवर्क, व्हिडिओज पाहण्याचा वेळ ही आमच्यासाठी लक्झरी होती. उत्कर्षने जेव्हा नेव्हीतली नोकरी सोडली तेव्हा आम्ही पुण्याला स्थायिक व्हायचं ठरवलं. दरम्यान आम्हाला एक मुलगा झाला होता, सरिताने नऊ वर्षे तिच्या करिअरचा बळी दिलाय तर तिने आता प्रामुख्याने आपली स्वप्नं पूर्ण करावीत यावर माझ्या नवऱ्याचा भर होता. उत्कर्षचीही दुसरी नोकरी सुरू झाली होती आणि मी शिक्षिका म्हणून काम सुरू केलं होतं, तसंच माझी मूळ आवड असलेला केटरिंगचा बिझनेसही छोट्या प्रमाणावर सुरू केला होता. त्याच दरम्यान माझ्या बहिणीने एक यू ट्यूब चॅनल काढलं होतं आणि माझी स्वयंपाकाची आवड, शिकवण्याची हातोटी माहिती असल्याने तिने मला त्यातल्या बेसिक गोष्टी शिकवून तू पण यू ट्यूब चॅनल सुरू कर, असा खूप आग्रह मला केला. सोशल मीडिया वगैरेवर करिअर करता येतं, यावर तेव्हा माझा विश्वास नव्हता पण बहिणीचं ऐकून आपण एक महिना प्रयत्न तर करून बघूयात असं म्हणत मी सरिताज किचन सुरू केलं. 29 ऑगस्ट 2018 रोजी सुरू केलेला हा प्रवास इतका यशस्वी ठरेल याची मला त्या क्षणी अजिबात कल्पना नव्हती”.
दीड महिन्यात पावणे दोन लाख रुपये
सरिताताई पुढे सांगतात, “29 ऑगस्टला चॅनल सुरू केला, तीनच दिवसांत 1000 सबस्क्रायबर्स झालेदेखील! ही तेव्हाची आणि 8 सप्टेंबर 2018 रोजी मी अपलोड केलेली उकडीच्या मोदकांची रेसिपी हिट गेली, व्हायरल झाली. खरंतर त्या वर्षीचा गणेशोत्सव सुरू व्हायला वीस दिवस शिल्लक होते आणि मी माझी नोकरी, मुलगा सांभाळून हे यू ट्यूब चॅनल सुरू केले होते आणि रात्री दोन अडीच वाजता ही मोदकांची रेसिपी अपलोड केली होती. सकाळ होताच धपाधप व्ह्यूज वाढत चालले, कमेंटस, लाईक शेअर्सचा आकडा वाढायला लागला. आणि ‘सरिताज किचन’ची नवी ओळख निर्माण झाली. येणाऱ्या कौतुक करणाऱ्या कमेंटसमध्ये माझ्या भाषेचं, शांतपणे समजावून सांगण्याच्या हातोटीचंही विशेष कौतुक होत होतं. चॅनल सुरू झाल्यानंतर ‘सरिताज किचन’ ने दीड महिन्यात पावणेदोन लाख रूपये कमावले आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर आजवर एकही महिना असा नाही की माझी यू ट्यूबवरून कमाई झाली नाही.”
सातत्या टिकवणं महत्वाचं
सरिताज किचनचे सध्या सुमारे 18 लाख सबस्क्रायबर्स आहेत. ‘सरिताज किचन’च्या या दैदिप्यमान यशामागचं गमक काय आहे, असं विचारला असता सरिताताई सांगतात, “सातत्य – ही तीन अक्षरं माझ्या यशामागे फार महत्त्वाची आहेत. तुम्ही सातत्याने आणि दर्जेदार, नवनवीन कंटेट हा दिलाच पाहिजे. सातत्याच्या बाबतीत मी इतकी पर्टिक्युलर आहे की माझ्या दुसऱ्या अपत्याच्या वेळी मी जेव्हा डिलिव्हरीकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा सुद्धा माझे 8-10 व्हिडिओज शेड्यूल करून ठेवलेले होते, आणि ते ठरलेल्या वेळेला प्रसिद्ध होत होते. दुसरं- इतर कुणी कुकिंगचं यू ट्यूब चॅनल काढून यशस्वी झालंय म्हणून मी ही काढेन, हा विचार अजिबात नको, तुम्हांला ज्या क्षेत्राची मनापासून आवड आहे, तुमचं त्यातलं ज्ञान आहे त्याच क्षेत्रात तुम्ही जा. कुकिंग ही माझी पॅशन होती आणि आहे, त्यामुळे हे काम करताना मजा येते.”
एका वर्षात चाळीस लाखांचं कर्ज फेडलं
“तिसरं म्हणजे, काम करताना शंभर टक्के द्या, कमेंटमधून शिकत राहा. माझ्या कौतुक करणाऱ्या कमेंटसचं प्रमाण सातत्याने सर्वाधिक आहे पण पाकातले रवा लाडू करण्याच्या एका पाककृतीवर, ‘तुमची रेसिपी आम्ही फॉलो केली आणि आमचे दहा किलो रवा लाडू बिघडले’ अशी एक कमेंट एकदा आली होती, ते पाहून मला मनापासून वाईट वाटलं होतं, अक्षरश: मी रडले होते आणि हा चॅनल आता बंद करूयात, आपल्यामुळे इतरांचं नुकसान नको, अश्या निर्णयाप्रत आले होते. पण तीच रेसिपी इतर अनेकांनी नावाजली अगदी माझ्या सासूबाईंना सुद्धा हे लाडू पाहून त्यांच्या आईची आठवण झाली, हे बघून मी काम चालू ठेवायचा निर्णय घेतला. पण रेसिपी सांगताना अशी सांगूयात की ती परफेक्टच झाली पाहिजे, हातचं न राखता, गुपित न ठेवता सगळ्या टिप्स देत सोप्या शब्दांत अचूक रेसिपी सांगायची हे मी ठरवलं आणि हाच ‘सरिताज किचन’चा यूएसपी आहे. बाकी कमाईचं म्हणाल तर एकच सांगते, इतकी समाधानकारक कमाई आहे की एका वर्षात मी चाळीस लाखाचं लोन क्लिअर केलंय!
नवीन व्यवसायात प्रवेश
सरिताज किचनच्या लाकडी घाणा तेलाचा आणि कांदा लसूण मसाला इ. चा व्यवसायही आता सुरू केलेला आहे. मात्र हे करताना नऊ लाख सबस्क्रायबर्स होईपर्यंत रेसिपीचं नियोजन, शूटिंग, व्हॉईसओव्हर, एडिटिंग, अपलोडिंग, डिस्क्रिप्शन, थंबनेल असं सगळं काम मी एकटीच करत होते आता मात्र माझी टीम आहे, सो भरपूर मेहनतीला पर्यायच नाही.
1 Comment
Thanks for this article. Sarita ma’am is a favorite U tuber and I enjoy watching her easy and simple recipes. She has a nice style of explaining to a naive person too. This article brought about many new aspects of Sarita ma’am life and what a struggler she has been.