कोल्हापूरचा शाही दसरा

Dasshera : महाराणी ताराराणी यांनी शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे संरक्षण केले. 1709 च्या सुमारास त्यांनी स्वराज्याची राजधानी पन्हाळगडावर स्थापन केली. त्यामुळं 1788 पर्यंत दसरा पन्हाळगडावर साजरा होत असे. नंतर स्वराज्याची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात हलवली गेली  आणि कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या थाटामाटात साजरा होऊ लागला.

महाराणी ताराराणी यांनी शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे संरक्षण केले. 1709 च्या सुमारास त्यांनी स्वराज्याची राजधानी पन्हाळगडावर स्थापन केली. त्यामुळं 1788 पर्यंत दसरा पन्हाळगडावर साजरा होत असे. नंतर स्वराज्याची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात हलवली गेली  आणि कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या थाटामाटात साजरा होऊ लागला.

गंजीमाळ ते दसरा माळाचा प्रवास

पूर्वी गंजीमाळावर दसरा साजरा केला जायचा. कालांतराने नवीन राजवाडा बांधल्यानंतर, राजर्षी शाहू महाराज नव्या राजवाड्यात राहायला आले. यानंतर दसरा सण चौफळा माळावर साजरा होऊ लागला. कालांतराने या माळाला ‘दसरा माळ’ असे नाव पडले. हाच आजचा दसरा चौक. सध्या हा चौक शहराच्या मध्यभागी आहे. परंतु राजर्षी शाहू महाराजांच्या काळात तो शहराबाहेर होता. त्यावेळी बिंदू चौकाच्या पुढे फारशी वस्ती नव्हती. शाहू महाराजांच्या काळात त्या परिसरात फक्त एक-दोन वसतीगृहे आणि चित्रदुर्ग मठ इतकीच वस्ती होती. उर्वरित जागा मोकळी होती त्यामुळे या मोकळ्या माळावर सोने लुटले जायचे. या माळावर सोने लुटण्यासाठी भवानी मंडप ते दसरा चौक असा राजेशाही छबिना लवाजम्यासह निघायचा. हेच कोल्हापूर दस-याचे वैशिष्ट्य होते. 

संस्थानाची श्रीमंती, संरक्षणयंत्रणेचं प्रदर्शन

संस्थान काळात राजेशाही असताना भवानी मंडपातून निघणाऱ्या छबिन्यात संस्थानाच्या ऐश्वर्य आणि श्रीमंतीचा थाट प्रकट होत असे. ही मिरवणूक संस्थानाची संरक्षण यंत्रणा किती सज्ज आहे, हे दाखवणारी असायची. या छबिन्यात तोफा, सहा हत्ती, दोनशेपेक्षा जास्त घोडे, उंट आणि चित्त्यांचा समावेश असायचा. नगारा, नौबत, हलगी, चौघडा अशा वाद्यांच्या गजरात छबिना निघायचा. परिटघडी पोशाखातील पायदळ सैनिक, भालदार, चोपदार, म्हालदार, विटेकरी, पोलीस दल, पट्टेवाले, रक्षक, हुजरे आणि जासूद यांचा ताफा सहभागी होत असे. उंट आणि हत्तींच्या पायात चांदीच्या साखळ्या असत, त्यांना रंगीत झूल घातली जात असे. चोपदारांच्या हातात चांदीच्या काठ्या असत. काही सरदार हत्तीवरून मिरवायचे. महाराज स्वतः सुशोभित सोन्याच्या रथात बसलेले असायचे.  ब्रिटिश काळात या मिरवणुकीत तत्कालीन ब्रिटिश अधिकारीही सहभागी होत. या सोहळ्यात विशाळगडकर, कागलकर, बावडेकर, सरलष्कर, तोरगलकर, हिम्मत बहाद्दर, चव्हाण हे जहागीरदार सहभागी होत. त्यांच्यापाठोपाठ जोशीराव, राजोपाध्ये, राजाज्ञा, पंडितराव सरदार, इनामदार, दुमालदार हे सर्व संस्थानातील प्रमुख अधिकारी असायचे. 

‘सुंदरी’ वाद्य आणि 9 तोफांची सलामी

छबिन्यात एका उंटावर मोठा कर्णा ठेवला जायचा. त्यावेळी सुंदरी हे वाद्य प्रमुख होते, ज्याला डफाच्या तालाचा आधार असे. जेव्हा या वाद्यांचा आवाज घुमू लागायचा, तेव्हा लोकांमध्ये वीररस संचारायचा, आणि परिसरात उत्साहाची लाट निर्माण व्हायची. भवानी मंडपातून छबिना सुरू झाल्यानंतर त्याचा लवाजमा टाऊन हॉल बागेपर्यंत पसरलेला दिसायचा, यावरून या लवाजम्याच्या प्रचंड आवाक्याचा अंदाज यायचा. छबिना निघताना भवानी मंडपातून नऊ तोफांची सलामी दिली जायची. तोफांचा आवाज कानात येताच सारे करवीरवासी छबिनामध्ये सहभागी होण्यासाठी भाऊसिंगजी रोडवर जमा व्हायचे. 

सोन्याच्या रथाच्या जागी मेबॅक गाडी

संस्थानं खालसा झाल्यानंतर शाही दसऱ्याच्या कार्यक्रमात लवाजमा जरी कमी झाला असला तरी राजेशाही परंपरा अजूनही कायम आहेत. तोफांची सलामी बंद झाली असून त्याऐवजी बंदुकीच्या फैरी झाडल्या जातात. प्राण्यांचा लवाजमा पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. संस्थानकाळात महाराज भवानी मंडपातून रथातून दसऱ्यात सहभागी होत. परंतु स्वातंत्र्यानंतर राजघराण्यातील व्यक्ती मेबॅक गाडीतून न्यू पॅलेसहून थेट दसरा चौकात येऊन शाही दसऱ्यात सहभागी होतात. छत्रपती राजाराम महाराजांनी1936 च्या सुमारास इंग्लंडच्या रोल्स राईस कंपनीकडून मेबॅक कार घेतली होती. दुस-या महायुद्धाच्या काळात मेबॅक कारचे उत्पादन बंद पडले. यामुळे जगभरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मेबॅक कार शिल्लक आहेत. त्यातील एक म्हणजे ही कोल्हापूरातील मेबॅक. छत्रपतींचा शिक्का असलेल्या या कारचा मूळचा क्रमांक बीवायएफ 8776 असा होता. मात्र कोल्हापूरात आणल्यानंतर तिचा क्रमांक कोल्हापूर 1 असा करण्यात आला. सध्या ही कार कोल्हापूराच्या दसरा सणाची शान आहे.  

लगडकोटचा टिपेला पोहचलेला उत्साह

दसऱ्याच्या आधीच्या आठवड्याभर शाही दसऱ्याची तयारी दसरा चौकात सुरू होते. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या शामियान्याने चौक सजवला जातो. चौकाच्या मध्यभागी करवीर संस्थानाचा भव्य जरीचा पटका फडकत असतो. सोनं लुटण्याच्या विधीसाठी लाकडाचा लगडकोट तयार केला जातो, ज्यात आपट्यांची पाने गच्च बांधून ठेवली जातात. दसऱ्याच्या दिवशी चौक सीमोलंघनासाठी पूर्णपणे सज्ज असतो. राजघराण्यातील सदस्य, सरदार आणि मानकरांचे मुजरे स्वीकारित सदरेवर येतात. तिथे दसरा समितीच्या वतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत केले जाते. स्वागतानंतर महाराज सोने लुटण्यासाठी लगडकोटाकडे जातात. मंत्रोच्चारात महाराज आपट्यांची पूजा करतात, त्यानंतर देवीची आरती केली जाते. आरती झाल्यावर महाराज आपट्यांची पाने तोडून सोनं लुटतात. यानंतर ठासणीच्या बंदुकीच्या फैरी झाडल्या जातात. हा आवाज ऐकू आला की कोल्हापूर जनता दसरा चौकात धाव घेते. लगडकोटातील सोने लुटण्यासाठी चढाओढ सुरू होते, आणि आपट्यांच्या पानांचे भारे उधळले जातात. सोने लुटल्यानंतर शाहू महाराज राजघराण्यातील सदस्यांसह पुन्हा शाही सदरेवर जातात. तिथे सरदार आणि मान्यवरांकडून आपट्यांची पाने स्वीकारली जातात. त्यानंतर राजघराण्यातील सदस्य मेबॅकमध्ये बसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या नागरिकांकडून आपट्याची पाने स्वीकारतात. 

अंबाबाईचं दर्शन आणि शुभेच्छा

राजघराण्यातील सदस्य नवीन राजवाड्यावर परत जातात, जिथे सोने देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानंतर करवीरतनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जातात. शेवटी जुन्या राजवाड्यातील भवानी देवीला सोनं वाहून परत येतात. इकडे, दसरा चौकात सरदार, सरकारी अधिकारी, राजकीय नेते आणि मान्यवर एकमेकांना सोने देऊन शुभेच्छा देतात. या काळात दसरा चौकाच्या परिसरात जत्रा भरते, आणि रात्री उशिरापर्यंत चौकात चैतन्य असते.

पालखी मार्ग आणि पूर्वजांना सोनं 

राजेशाही लवाजम्यानंतर फुलांनी सजवलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी, आणि गुरु महाराज यांच्या पालख्या असत. दसऱ्याचे सोने लुटल्यानंतर या पालख्या परत जाताना सिद्धार्थ नगरातून जातात. राजर्षी शाहू महाराजांनी दसऱ्याच्या पालख्या परतताना या मार्गाने जाव्यात अशी परंपरा सुरू केली होती, आणि ती आजही पाळली जाते. सिद्धार्थ नगरात पालख्यांचे स्वागत रांगोळ्या आणि फुलांच्या उधळणीने केले जाते. या ठिकाणाहून पालख्या पंचगंगा नदीकाठी येतात. येथील मंदिरसमूहाला नाव आहे संस्थान शिवसागर. हा परिसर म्हणजे करवीरकर छत्रपती घराण्याची अंत्यसंस्कार भूमी. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील तीन ते चार छत्रपतींच्या समाध्या मंदिरांच्या स्वरूपात तिथं आहेत. शेजारच्या शंकराचार्य समाधी जवळ अंबाबाईची पालखी विसावते. पूर्वजानां सोनं देणे हा या प्रथेमागील उद्देश आहे. त्यानंतर गंगावेश, पापाची तिकटी आणि गुजरी मार्गे पालख्या परत त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचतात.

 

(हा लेख लिहिण्यासाठी कोल्हापूरातील भरत महारूगडे यांनी केलेल्या मदतीबद्दल लेखिका त्यांच्या आभारी आहेत. )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Perfumes : अत्तर म्हणजे तर हवाहवासा सुगंध. देवघरात दरवळणारा चंदनाच्या अत्तराचा गंध असो, किंवा आजी-आईच्या रेशमी साड्यांना येणारा जुन्या खस/हीना/केवड्याच्या
Diwali Magazines - दिवाळी म्हणजे सगळ्या भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये
Poetry : कविता वाचनाने सौंदर्यदृष्टी विकसित होते. कवितेतून आपण आपल्या सभोवतालचे सौंदर्य अनुभवू शकतो. कविता वाचल्याने समजून घेण्याची आणि विश्लेषण

विधानसभा फॅक्टोइड

नाशिक :  नववर्षा निमित्ताने शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 200 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस अंमलदार आणि सहाशे होमगार्ड तैनात.