सायबर बुलिंग विविध प्रकारे केलं जातं. अनेकदा बळी ठरणाऱ्या व्यक्तीला आपल्याबरोबर सायबर बुलिंग होते आहे हेच समजत नाही. कारण त्याविषयी जागरुकता नाहीये. आणि सायबर बुलिंगचे प्रकार काय आहेत याचीही माहिती नसते. या लेखात आपण सायबर बुलिंगचे प्रकार काय आहेत याची थोडक्यात माहिती घेऊया.
छळ (Harassment)
एखाद्याला पुन्हा पुन्हा नकोसे आणि त्रासदायक मेसेजेस पाठवत राहणं. किंवा सतत चुकीच्या पद्धतीने कॉमेंट्स करत राहणं. किंवा एखाद्याबद्दल सोशल मीडियावर किंवा चॅटिंगमध्ये वाईटसाईट बोलणं. अशा कॉमेंट्स, चॅटिंग की ज्याचा त्याला खूप त्रास होईल. ती/तो निराश होईल, खूप वाईट वाटेल असं सगळं सायबर छळात येतं. काहीवेळा माणसं गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर किंवा सोशल मीडियावर अनोळखी माणसांशी चॅटिंग करतात. ही अनोळखी लोकंही त्रासदायक असू शकतात. ऑनलाईन जगातला छळ ओळखीची आणि अनोळखी कुणीही करु शकतं.
आउटिंग/ डॉक्सींग (Outing/Doxing)
एखाद्या व्यक्तीची खासगी, वैयक्तिक माहिती त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय उघड करणं याला म्हणतात आउटिंग किंवा डॉक्सींग. हाही गुन्हाच आहे.
सायबर स्टॉकिंग (Cyber Stalking)
सायबर स्टॉकिंग म्हणजे ऑनलाईन जगात एखाद्या व्यक्तीचा चोरून केलेला पाठलाग. अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार हल्ली घडतो. त्यामुळे ऑनलाईन जगात आपण कुणाशी मैत्री करतोय याबाबत सावध असायला हवं. आता तुम्ही म्हणाल, ऑनलाईन पाठलाग कसा करणार?
तर सतत त्या व्यक्तीवर लक्ष ठेऊन असणं. पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचं सोशल मीडिया प्रोफाइल चेक करणं, त्यांना चुकीचे मेसेजेस पाठवत राहणं. थोडक्यात सांगायचं तर एखादी व्यक्ती ऑनलाईन जगात जिथे जिथे जाईल तिथे जाणं आणि ती व्यक्ती काय करते आहे हे सतत फॉलो करणं. सतत पाठलाग करुन त्या व्यक्तीला लाईक, लव्ह देत राहणं, तू इथे का गेलीस, तिथे का गेलीस, मी तुला अमुक ठिकाणी पाहिलं, तिथे जाऊ नकोस अशा प्रकारचे मेसेजेस पाठवत रहाणं असले प्रकार केले जातात.
फसवणूक (trickery)
यात सरळ सरळ फसवणूकच केली जाते. लबाडी करुन, कपटाने एखाद्याला फसवलं जातं.
फ्रॅपिंग (fraping)
या प्रकारात गुन्हेगार एखाद्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करुन चुकीची माहिती, फोटो, व्हिडीओ पोस्ट करतो. यात अनेकदा मुलांच्या किंवा टिनेजर्सच्या सोशल मीडियावरुन पॉर्न व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करण्याचे प्रकारही घडतात. किंवा एखाद्या विषयावरची चुकीची, फेक माहिती पसरवली जाऊ शकते.
मास्करेडींग (Masquerading): मास्करेडींगचा अर्थ खोटा आव आणणं. एखाद्या गोष्टीचा बहाणा करणं किंवा भासवणं. हे गुन्हेगार फार डामरट असतात आणि डेंजरसही. यात सायबर गुन्हेगार सरळ सरळ खोटी सोशल मीडिया प्रोफाईल्स तयार करतात. स्वतःची खरी ओळख लपवून ठेवतात आणि बनावट प्रोफाईल्स बनवतात. बहुतेकवेळा प्रसिद्ध व्यक्तींची प्रोफाईल्स बनवण्याकडे यांचा कल असतो. एखाद्या सेलिब्रिटींच्या किंवा इन्फ्लूएंसारच्या नावाने बनावट किंवा फेक प्रोफाइल तयार करतात. तिथे सगळे त्या प्रसिद्ध व्यक्तीचे फोटोबिटो वापरतात. त्यामुळे अनेकांना ते प्रोफाइल खरं वाटण्याची शक्यता असते. आपण एका सेलेब्रिटीशी बोलतोय किंवा त्यांना फॉलो करतोय असंही वाटू शकतं. पैसे उकळण्यापासून, लोकांना धमकावण्यापर्यंत किंवा त्या सेलिब्रिटीला बदनाम करण्यापर्यंत अनेक कारणांसाठी हे गुन्हेगार अशी बनावट प्रोफाईल्स तयार करतात. त्यामुळे एखाद्या लाडक्या सेलिब्रिटींच्या नावाचं प्रोफाइल दिसलं म्हणून लगेच हुरळून जायचं नाही. ते खरं आहे का, ऑफिशिअल प्रोफाइल आहे का याची खात्री करून घ्यायची. बहुतेक सेलिब्रिटींच्या प्रोफाईलला ब्लू टिक असतो. तो आहे का हे बघायचं. नाहीतर सरळ गुगलवर जाऊन अमुक तमूक व्यक्तीचे ऑफिशिअल सोशल मीडिया प्रोफाइल असं सर्च करायचं म्हणजे खऱ्या खोट्याचा लगेच तपास आपल्याला लावता येतो.
तिरस्कार (Dissing)
या शब्दाचा जो अर्थ आहे तेच साध्य करण्यासाठी माणसं सायबरच्या जगात गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात. एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याच्याविषयी अतिशय असंवेदनशील, खोटी, विकृत पोस्ट केली जाते. काहीवेळा अशी पोस्ट त्या व्यक्तीला वैयक्तिक पाठवली जाते किंवा सार्वजनिकही केली जाते. म्हणजेच सोशल मीडियावर पोस्ट केली जाते.
ट्रॉलिंग (Trolling)
बुलिंग आणि ट्रोलिंगमध्ये पुसटशी रेषा आहे. इतक्या या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. एखाद्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत, त्याचा लूक आवडला नाही, पोस्ट आवडली नाही, फोटो आवडला नाही अशा कुठल्याही कारणाने समोरच्या व्यक्तीला वाट्टेल ते बोलणं, असभ्य भाषेत बोलणं, धमकावणं, आत्महत्येस प्रवृत्त करणं, शारीरिक इजा पोचवण्याबद्दल लिहिणं असे सगळे प्रकार ट्रोलिंगमध्ये येतात.
या सगळ्या प्रकारापासून सावध राहायचं असेल तर या टिप्स लक्षात ठेवा.
1) अनोळखी लोकांशी बोलताना सावध असा.
2) अनोळखी किंवा नव्यानेच ओळख झालेल्या लोकांशी खासगी माहिती कधीही शेअर करु नका. फोन नंबर शेअर करु नका. घराचा पत्ता किंवा इतर डिटेल्स देऊ नका.
3) जर कुणी आपल्याशी अर्वाच्च भाषेत बोलत असेल तर त्या व्यक्तीबरोबर कुठलाही संवाद करण्याची गरज नसते. कारण तिथे संवाद होऊ शकत नाही. सायबर बुलिंग करणारी व्यक्ती समजून उमजून सगळं करत असते. त्यामुळे असं प्रोफाइल ब्लॉक करुन टाकायचं.
4) ब्लॉक केल्यानंतरही दुसरं प्रोफाइल तयार करुन त्रास देणं सुरु असेल तर त्या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर ते प्रोफाइल रिपोर्ट करा.
5) त्रास फार जास्त असेल तर ताबडतोब पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवा.