आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 574 खेळाडू असणार आहेत. यात 204 जागांसाठी बोली लागेल. यामध्ये 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू असणार आहेत. रविवारी 24 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता आयपीएल 2025 चा मेगा लिलाव सुरू होणार आहे.
मार्की खेळाडूंची यादी जाहीर
2025 आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मार्की खेळाडूंच्या यादीत 12 खेळाडूंना स्थान मिळालं आहे. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या भारतीय खेळाडूं या यादीत समावेश आहे.
ऑक्शनमध्ये ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना जास्त मागणी असणार आहे. यापैकी अय्यरने यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून तिसरा आयपीएल किताब जिंकला होता. यामुळे अनेक संघ या खेळाडूंना तगडी रक्कम देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करतील. सर्व खेळाडूंना 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीत मार्की यादीत घेण्यात आलं आहे.
परदेशी खेळाडूंमध्ये कागिसो रबाडा, डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, जोस बटलर आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. यामध्ये डेव्हिड मिलर हा एकमेव खेळाडू आहे ज्याने आपली मूळ किंमत 1.50 कोटी रुपये ठेवली आहे. तर, जोस बटलर आणि मिचेल स्टार्क यांच्यावर अनेक संघांच्या नजर असणार आहे.
पंजाब किंग्जच्या खात्यात सर्वाधिक रक्कम शिल्लक
पंजाब किंग्जकडे सर्वाधिक कोटा शिल्लक आहे. पंजाब किंग्जकडे 110.5 कोटी असल्याने पंजाब इतरांचं गणित बिघडवू शकते. तर आरसीबीकडे 83 कोटी रुपये शिल्लक आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सकडे 45 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी 41 कोटी रुपये शिल्लक आहेत.
इंग्लंडचे बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जो रूट या वर्षीच्या ऑक्शनमध्ये दिसणार नाहीत. परंतु या वर्षीच्या यादीत इंग्लंडचा रेड-बॉल वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन उपस्थित असणार आहे. त्याने वयाच्या 42 व्या वर्षी आपले नाव ऑक्शनसाठी नोंदवले आहे. याशिवाय, बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू आहे, जो ऑक्शनमध्ये सहभागी होईल.
मार्की खेळाडूंची यादी
मार्की यादी 1: श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, जोस बटलर, कागिसो रबाडा, मिशेल स्टार्क.
मार्की यादी 2: युझवेंद्र चहल, केएल राहुल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर.