लातूर : राज्यातील लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेला मतदारसंघ म्हणजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी नेतृत्व केलेल्या या मतदारसंघातून विलासरावांचे जेष्ठ सुपुत्र अमित देशमुख हे गेल्या तीन निवडणुकांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. ते यावेळी चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर. मात्र डॉ. अर्चना यांनी भाजपमध्ये जाऊन विधानसभेची उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे कधी काळी ‘देशमुख-चाकूरकर’ असा मिळून प्रचार करणाऱ्या काँग्रेसच्या या दिग्गज राजकीय घराण्याची दुसरी पिढी एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे.
या मतदारसंघातून तब्बल 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उभे आहेत. वंचित आघाडीचे विनोद खटके यांचंही आव्हान आहे. चला तर जाणून घेऊयात लातूरच्या लक्षवेधी मतदारसंघातील चुरस.
राज्यात-केंद्रात महत्वाची पदे मिळवलेला जिल्हा
लातूर हे मराठवाड्यातील एक मोठं शहर. आपल्या अनोख्या शैक्षणिक पॅटर्नमुळे राज्यात-देशात सुपरिचित असलेले हे शहर भूकंप, दुष्काळ, पाण्याची रेल्वे अशा नैसर्गिक संकटांमुळे चर्चेत राहिलेलं आहे. याशिवाय दिग्गज राजकारण्यांचा जिल्हा म्हणून ही लातूर कायम राज्यात तसेच देशभरात चर्चेत असतं. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्यामुळे लातूर जिल्ह्याचा राजकीय दबदबा राज्यासह देशानेही पाहिला आहे. दिवंगत विलासराव देशमुख यांनी 1999 आणि 2004 अशा दोन वेळेस जवळपास 8 वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलं तर दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी 1984 मध्ये 9 महिन्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलं. याशिवाय काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी 1980 ते 2004 अशी सलग 7 टर्म लातूर लोकसभेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ज्यात लातूर लोकसभेचे अध्यक्ष ते केंद्रातील विविध मंत्रीपदे त्यांनी लिलया सांभाळली. 2004 मध्ये लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नवख्या रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून चाकूरकर यांचा पराभव झाला. मात्र तरीही सोनिया गांधी यांनी 2004 मध्ये देशाचे गृहमंत्रीपद देऊन चाकुरकरांना राज्यसभेवर खासदार केलं. तर अशा या दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या जिल्ह्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
‘देवघर’ फोडलं तरी देव आपल्यासोबत
पहिल्या पिढीतील दिवंगत विलासराव देशमुख आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर या दोन दिग्गज नेत्यांनी सोबत निवडणूक लढवित विरोधकांना धोबीपछाड दिलेली महाराष्ट्राने अनुभवलं आहे. डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
एका सभेत बोलताना लातूर शहर विधानसभेतील काँग्रेस उमेदवार, माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव न घेता ते राहत असलेल्या घराचे नाव ‘देवघर’ असल्यामुळे त्यावर भाष्य केलं होतं. ‘देवघर’ जरी भाजपने फोडलं असलं तरी देवघरातील देव आपल्यासोबत असल्याचे सूचक वक्तव्य केलं होतं.
सासऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा?
याबाबत भाजपच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची मी सून असली, तरी मी पूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाची सदस्य नव्हते. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मी भाजपमधून केली आहे. चाकूरकर कुटुंबात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असून हा निर्णय माझा वैयक्तिक असून कुटुंबियांना सांगूनच आपण हा निर्णय घेतला” असं डॉ अर्चना सांगतात. काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर हे कुटुंबातील व्यक्ती म्हणून माझ्यासोबत आहेत, मात्र त्यांचे वय 90 वर्ष असल्यामुळे ते प्रत्यक्ष प्रचारात उतरणार नसल्याचे सांगत डॉ. अर्चनाताई पाटील यांनी शिवाजीरावांचा त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं दाखवत आहेत.
1995 पासून काँग्रेसच विजयी
वंचित आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांच्या रूपाने तिसरा मोठा राजकीय पर्याय असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहेत. एकूण 23 उमेदवार लातूर शहर मतदारसंघात आपले नशीब आजमावत आहेत. मुस्लिम, दलित, ओबीसी, लिंगायत आणि त्याखालोखाल मराठा मतदारांची संख्या या मतदारसंघात मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काचा मुस्लिम-दलित हा काँग्रेसकडेच राहतो की भाजप-वंचित आघाडी त्यात छेद करणार हे पाहणे रोचक ठरणार. लातूर शहर मतदारसंघातून 1995 नंतर कुठलाही गैरकाँग्रेसी उमेदवार किंवा भाजपाला आतापर्यंत यश मिळवता आलेलं नाही.
दिग्गज नेते आणि मंत्रीपदं असूनही विकास लांबच!
आपण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवीत असल्याचे काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार सांगत आहेत. तर दुष्काळात कायम पाणी टंचाईचे चटके सहन करणाऱ्या लातूरकरांना उजनी धरणाचे पाणी मिळणार का ? कचरा, अंतर्गत रस्त्याच्या समस्या, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, वाढती बेरोजगारी अशा अनेक समस्यांतून सुटका मिळणार का ? असा प्रश्न मतदारांपुढे या निवडणुकीतही उभा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे पाहणं रोचक ठरणार आहे.