भावना आणि प्रॅक्टिकल असणं या लग्नाच्या नात्याच्या दोन बाजू आहेत. जसं केवळ पैशाने आनंद, सुख मिळत नाही तसं केवळ प्रेमाने आयुष्य जगता येत नाही. कोणतंही नातंही निभावता येत नाही. लग्नाच्या नात्याने दोन व्यक्ती हे नवीन कुटुंब निर्माण करण्यासाठी एकत्र येतात. म्हणजे एक नवीन जबाबदारी त्यांना निभावायची असते. ही नवीन जबाबदारी घेताना भावनिकदृष्ट्या आणि तितकचं आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असणं गरजेचं आहे.
आर्थिक सुस्पष्टता
सोयरिक ठरवतानाच अनेकदा मालमत्ता, संपत्ती वगैरेची माहिती मिळवूनच सोयरिक ठरवली जाते. अलीकडे लग्न जुळवताना मुला-मुलीचा स्वभाव, शिक्षण यापेक्षाही पैसा, संपत्ती, सधनता याला जास्त महत्त्व दिलं जातं. पण नातं जुळवताना कोणत्या मुद्याला प्राधान्य द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.
अनेकदा लव्ह मॅरेजमध्ये मुला-मुलींनीच आपले साथीदार निवडलेले असतात. त्यामुळे लग्नानंतरची आर्थिक जबाबदारी, व्यवस्थापन काय असेल यावर चर्चा झालेली नसते. लग्नानंतरचं आर्थिक व्यवस्थापन असं ही काही असतं, याची ही कल्पना नसते. पण दोघांचे पगार किंवा व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे कशा पद्धतीने वापरले जाणार, नवीन घर, गाडी असं काही घ्यायचं असेल, तर त्याचं व्यवस्थापन कसं काय असणार यासगळ्या बाबींवर लग्ना आधीचर्चा आणि व्यवस्थापन करणं उत्तम.
आर्थिक समानता
अनेकदा लग्न करु इच्छिणाऱ्या मुलीपेक्षा मुलगा हा आर्थिकदृष्ट्या सेटल असला पाहिजे अशी समाजाकडून ठाम अपेक्षा असते. मुलाचा पगार जास्त असला पाहिजे, त्यांच्याकडे स्वत:च स्वतंत्र घर, गाडी असली पाहिजे. असं सगळ्या दृष्टीने तो पुर्ण सेटल असण्याची अपेक्षा असते. मात्र, त्या मुलाचं वय कधी ध्यानात घेतलं जात नाही. संसार हा दोघांचा असतो. त्यामुळे मुला-मुलीने समंजसपणे आर्थिक घडी बसवली पाहिजे. स्वतंत्र घर घेण्याचं असो की अन्य मनोरंजन किंवा सहलीचे खर्च असो दोघांनीही ते मिळून करणं उत्तम.
दोन्ही पालकांची जबाबदारी
लग्न झाल्यानंतर मुलगी सासरच्या घरी आल्यावर तिची तिच्या आई-वडिलांप्रती असलेली जबाबदारी संपत नाही. मुलांच्या आई-वडिलांच्या जबाबदारीप्रमाणे मुलीच्या आई-वडिलांची जबाबदारी ही नवरा-बायको दोघांची असायला पाहिजे. जर का मुलगी ही आई-वडिलांची एकुलती एक असेल किंवा दोघी बहिणीच असतील तर जावई म्हणून नवऱ्या मुलाने तिच्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. जर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील तर त्यांना आर्थिक मदत करण्याची जबाबदारी मुलीप्रमाणे नवऱ्या मुलाने घ्यायला हवी.
नोकरी आणि पगार खर्च
जर मुलगा आणि मुलगी हे दोघंही नोकरी करत असतील तर त्यांचे पगार किती आहेत याची खरी माहिती एकमेकांना असावी. या पगाराचं नियोजन कसं केलं जातं हे ही आपल्या साथीदारांना सांगावं. उदाहरणार्थ पगार कुठे खर्च केला जातो? घरखर्चासाठी दिला जातो का? कोणतं वैयक्तिक कर्ज आहे का? हे स्पष्ट करावं. अनेकदा मुलगा किंवा मुलगी पगाराचा आकडा खोटा सांगतात यामुळे अनेक कुटुंबामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. किंवा आलेल्या पगारातला बहुतांशी पैसा कुठे खर्च केला जातो याची त्यांनाच कल्पना नसते. थोडक्यात आपल्या साथीदाराकडून पैशाची उधळपट्टी होत असेल तर त्याचवेळी त्यांना समजावून सांगता येतं.
बचत आणि गुंतवणूक
जोवर लग्न झालेलं नसतं, कोणतीही आर्थिक जबाबदारी नसते, तोवर खर्चाची बचतीची फिकीर केली जात नाही. पण आर्थिक शिस्त असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या अनुषगांने लग्नापूर्वीच्या कोर्टशिप कालावधीत चर्चा करावी. लग्नानंतर दैनंदिन घरखर्च कोणाच्या पगारातून केला जाणार, बचतीसाठी कोणते पर्याय निवडले जाणार आणि त्यासाठी कोणाचा पगार दिला जाणार. किंवा दोघांच्या पगारातून किती टक्के रक्कम ही मेडिकल इश्यूरन्स वा अन्य ईएमआय भरण्यासाठी दिला जाणार आहे हे ठरवणं उत्तम.
कर्जा संबंधीत माहिती
मुलगा वा मुलगी व्यवसाय क्षेत्रात असेल तर त्यांच्यावर कर्ज असण्याची शक्यता असते. किंवा नवीनच घर बांधलं असेल तर त्याचं कर्ज असू शकते. ते किती आहे? कर्ज फेडण्यासाठी दर महिन्याला किती रुपये हफ्ता भरला जातो हे आपल्या साथीदाराला विचारावं. कारण समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत की लग्नापूर्वी याबाबतीत चर्चा झालेली नसते.
संपत्ती
जर लग्नानंतर नवीन संसार सुरू करण्यासाठी तुम्ही घर घेत असाल तर त्या अनुषंगाने चर्चा करावी. यामध्ये आपल्या साथीदारांच्या मताचा विचार करावा. घर घेण्याच्या निर्णयामध्ये आपल्या दोन्ही कुटुंबियांची मतं, सल्ले सुद्धा जरुर विचारात घ्यावीत. मुळात आपल्या आर्थिक क्षमतेची जाण ठेवून त्यानुसार घर घ्यावं. घराप्रमाणेच कोणत्याही पद्धतीची रियल इस्टेट प्रॉपर्टी किंवा जमीन, गाडी विकत घ्यायची असेल तर आपल्या साथीदारांशी चर्चा करावी. त्यांच्या मताला विचारात घ्यावं.
करिअर चर्चा
मुलगा असो वा मुलगी प्रत्येकांचे करिअर प्लान असतात. काही वर्ष नोकरी केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा असा विचार असू शकतो. मात्र, याविषयी आपण आपल्या साथीदारासोबत चर्चा करुन निर्णय घेतला पाहिजे. कारण आपल्या निर्णयामुळे काही काळासाठी आर्थिक बाजू त्याला किंवा तिला सांभाळायची असेल तर त्याची तयारी आहे का? ते प्रॅक्टिकली शक्य आहे का? यावर चर्चा झाली पाहिजे.
यातच दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नोकरीच करायची नसेल तर. हा मुद्दा बहुतांशी वेळा मुलींना लागू होतो. अनेकदा आई म्हणून जबाबदारी आल्यावर अनेकांना नोकरी करणं शक्य होत नाही. किंवा मुलीला नोकरी करायची नसेल तिला गृहिणी म्हणून राहायचं असेल तर त्याबाबतही दोघांमध्ये चर्चा करुन निर्णय घेतला पाहिजे.
शेवटी संसाराच्या गाडीला दोनं चाकं आहेत. ती रुळावरून नीट चालण्यासाठी दोन्ही चाकं एका दिशेत असणं गरजेचं आहे. प्रेम, विश्वास यासारख्या भावनांसह आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापनेला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. कारण वारंवार आर्थिक चणचण भासत असेल तर लग्नातल्या नात्यात गोडव्याऐवजी तणावचं जास्त निर्माण होतो.