भोपाळ गॅस दुर्घटना! आजही अंगावर काटा आणणारी घटना. तब्बल 40 वर्षा नंतर आजही भोपाळमध्ये ‘न जन्मलेली मुलं’ या घटनेची शिक्षा भोगत आहेत. पिढ्यानपिढ्या उद्धवस्त करणाऱ्या या दुर्घटनेप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला शिक्षा न झालेलं हे देशातलं एकमेव प्रकरण.
40 वर्षापूर्वीची ‘ती’ काळरात्र
सन 1984 साली 2 डिसेंबरला भोपाळ शहराच्या सीमेवर असणाऱ्या युनियन कार्बाइड कारखान्यातील एका टाकीतून मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती होऊ लागली. 3 डिसेंबरपर्यंत संपूर्ण भोपाळ शहर या वायूने व्यापलं गेलं. अमेरिकेच्या युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन कंपनीची ही युनियन कार्बाइड ही खते निर्मिती करणारी कंपनी होती. एका इंजिनिअरकडून साफसफाई दरम्यान चुकून जलीभूत मिथाइल आयसोसायनेटच्या टाकीत पाण्याचा प्रवाह सोडला गेला. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया झाली आणि विषारी वायूचे ढगच सगळीकडे पसरु लागले. जवळपास 40 टन मिथाइल आयसोसायनेटची गळती झाली होती.
मृत्यूचा तांडव
भोपाळ वायू गळती ही मानवी विद्धांस करणारी जगातली सगळ्यात मोठी औद्योगिक दुर्घटना म्हणून ओळखली जाते. जवळपास 5 लाखाहून जास्त नागरिक या दुर्घटनेत सापडले होते. तर जवळपास 2,259 लोकं या घटनेत दगावल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली. मात्र, जवळपास 20 हजार लोकं ही या वायू गळतीमुळे झालेल्या विविध व्याधीमुळे मरण पावली. केवळ हयात असलेलीच नव्हे तर आईच्या गर्भात असलेल्या बाळांनाही शारीरिक व्यंगत्व आलं आणि आजही तेथे जन्मला येणाऱ्या अनेक बाळांमध्ये या वायू गळतीचे दुष्परिणाम दिसून येतात.
वायू गळतीचे बळी
गेल्या 40 वर्षापूर्वी झालेल्या वायू गळतीचे पडसाद आजही तिथे जन्माला येणाऱ्या बाळांवर पडतात. त्या दुर्घटनेतून वाचलेल्या अनेक जणं विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. अनेकांना श्वसनाचे विकार, कफ, अस्थमा, डोळ्याचे आणि त्वचेचे विकार झालेले आहेत. जन्माला येणाऱ्या नव्या पिढीला सुद्धा हे आजार होत आहेत. या आजारासोबतच कॅन्सर, फुफ्फुसं, हृदय आणि न्यूरोलॉजी असे गंभीर विकारही जडत आहेत.
‘द गार्डियन’च्या 2019 च्या अहवालानुसार, या दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये मृत्यूदर 28 टक्क्यांनी वाढल्याची माहिती संभावना ट्रस्टने दिली आहे. तर बऱ्याच लोकांचा मृत्यू हा फुफ्फुसाचे विकार, कॅन्सर आणि टीबी सारख्या दीर्घकालीन आजारांनी झाल्याचं समोर आलं आहे.
तर या दुर्घटनेवेळी प्रेग्नेंट असलेल्या अनेक महिलांचा गर्भपात झाला. तर काही बालकं मृत जन्माला आली. जन्माला आलेली नवजात बालकांमध्ये वंध्यत्व, मुलींमध्ये मासिक पाळी संबंधात अडचणी निर्माण झाल्या, तर मोनोपॉज ही लवकर येऊ लागला.
जन्माला नव्या पिढीवर होणारा परिणाम
आजही भोपाळमध्ये जन्माला येणाऱ्या बाळांवर याचा नकारात्मक परिणाम होतो. अनेक बाळांमध्ये अपंगत्व, डाऊन सिंड्रोम, अटेंशन डिफीसाइट आढळून येते. यामधून बचावलेल्या स्त्रियांच्या पोटी या दुर्घटनेनंतर जन्माला आलेल्या बालकांपैकी 9 टक्के बालकं ही जन्मजात विकृत असल्याचं आढळून आलं आहे. तर या विषारी वायूच्या संपर्कात नसलेल्या स्त्रियांनी जन्म दिलेल्या बाळांपैकी केवळ 1.3 मुलांमध्ये जन्मजात विकृती आढळून आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अहवालामध्ये ही माहिती दिली आहे.
दुसरी-तिसरी पिढीलाही बसली झळ
या दुर्घटनेतील पीडितांना आजही न्याय मिळालेला नाहीये. आणि या दुर्घटनेतून सुटकाही झालेली नाहीये. आजही येथे जन्माला येणाऱ्या पिढ्यामध्ये कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच जन्मजात विकृती, रोगप्रतिकारक समस्या, न्यूरोलॉजिकल आणि मस्क्युलर लोस्केलेटल समस्या आढळून येतात. भोपाळ दुर्घटनेतील पीडितांना न्याय मिळवून देणारी आंतरराष्ट्रीय संघटनामधल्या वकील रचना डिंगरे ही माहिती दिली आहे.
जन्मजात अंपगत्व घेऊन जन्माला आलेल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी चिंगारी चिल्ड्रन संस्था याठिकाणी कार्यरत आहे. या संस्थेमध्ये जवळपास 1 हजार मुलांमध्ये मानसिक अंपगत्व आहे. सेरेब्रल पाल्सी, मस्क्यूलर डिस्ट्रोफी, ऑटिझम, बौद्धिक अपंगत्व, गतीमंद अशा स्वरूपातील अंपगत्व असलेल्या मुलांचं प्रमाण अधिक आहे.
40 वर्ष सरली, मात्र परिस्थिती अजूनही अधिकाधिक गंभीर बनत आहे. 40 वर्षांपूर्वी या दुर्घटनेतील पीडितांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीलाही या दुर्घटनेची झळ बसत आहे. शारीरिक व्याधी आणि अपंगत्वासह मानसिक अपंगत्वाची संख्या दिवसेगणिक वाढत आहे. या दुर्घटनेमुळे पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे भोपाळ दुर्घटनेतील एकूण बळी किती हे अद्यापही कोणी सांगू शकत नाही.