पुरुषभान जागवणाऱ्या ‘स्त्री मुक्ती संघटने’ ची पन्नाशी

Feminist Movement : स्त्री मुक्ती संघटना गेली 50 वर्ष महिलांचा ‘स्वतंत्र व्यक्ती’ या अस्तित्वासोबतच त्यांचं जीवनमान कसं उंचावेल, याकरता अविरत मेहनत घेत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, चळवळीचा जन्म या गोष्टींना उजाळा देण्यात आला. 

महाराष्ट्राच्या इतिहास आणि वर्तमानाचं डॉक्युमेंटेशन स्त्री मुक्ती संघटनेशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. स्त्री मुक्ती संघटना गेली 50 वर्ष महिलांचा स्वतंत्र व्यक्ती या अस्तित्वासोबतच त्यांचं जीवनमान कसं उंचावेल, याकरता अविरत मेहनत करत आहे. स्त्री मुक्ती म्हणजे वरवरचं तकलादू स्वातंत्र्य नसून खरे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी संपूर्ण समाजाचे वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आत्मिक उद्धार करणारी चळवळ आहे. 

समाज उभारणीतल्या महिलांच्या हिश्श्याची नोंद नाही

भारतीय राज्यघटनेनं स्त्री-पुरूष समानतेचा उद्घोष केला तरी व्यवहारातले चित्र वेगळं होतं. महिला वेगवेगळ्या व्यवसायात, कामगार चळवळीत होत्या, तरी हे महिलांचे प्रश्न म्हणून त्यांची दखल घेतली जायची नाही. स्वातंत्र्य संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यात महिलाही हिरिरीने सहभागी होत्या. पण त्यांची दखल फारशी घेतली गेली नाही.  कष्टकरी महिलांच्या जीवनात बदल झालेच नाहीत. समान कामाला समान वेतन मिळाले नाही. 1965 ते 1975 या चळवळीला पोषक काळात महाराष्ट्रात औषध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला आणि बेरोजगार गिरणी कामगार महिलांनी त्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली. पुणे आणि नागपूरमध्ये मोलकरीण संघटना स्थापन केली. महिलांच्या नेतृत्वाखाली देवदासी आंदोलन, ‘एक गाव एक पाणवठा’ आंदोलन, महागाईविरोधी मोर्चे निघाले. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक अशा सर्वच क्षेत्रातलं आपलं स्थान दुय्यम असल्याची जाणीव कित्येक महिलांना होऊ लागली. महिला या अबला आणि पुरुष हे उद्धारकर्ते, या विचारांना महिला चळवळींनी सुरूंग लावायला सुरुवात केली. समाजाचा अर्धा हिस्सा विकासापासून दूर राहिला तर समाज पुढे कसा जाणार? असा प्रश्न चळवळीतील महिला विचारू लागल्या.

जागतिक पातळीवरच्या स्वायत्त महिला चळवळी

पन्नास वर्षांपूर्वी राजकीय पक्षांच्या महिला आघाड्या होत्या, पण त्या स्वतंत्र नव्हत्या. आजही त्यात बदल झालेला नाहीच. जागतिक पातळीवर महिला चळवळीची वेगळ्या प्रकारची प्रक्रिया सुरू झाली होती. पक्षाच्या पलिकडे जावून काही विभाग स्वतःला संघटित करत होते. युरोप अमेरिकेत स्वायत्त स्त्री चळवळ सुरू होती. दक्षिण आफ्रिकेत ब्लॅक पँथर नावाची संघटना काढली होती. संयुक्त राष्ट्रसंघानं 1975 हे महिला वर्ष घोषित केल्यावर निरनिराळ्या देशांमध्ये अशाप्रकारे स्वायत्त महिला चळवळी सुरू झाल्या. मेक्सिकोमध्ये पहिली जागतिक महिला परिषद झाली. याच दरम्यान डॉ. वीणा मुजुमदार यांचा टूवर्डस् डिग्निटी हा भारतीय महिलांच्या स्थितीचा आढावा घेणारा अहवाल प्रसिद्ध झाला. 

महिला चळवळीची संकल्पना कशी पुढे आली?

मुंबईत त्यावेळी लाल निशान पक्षाचं कार्यालय श्रमिकच्या चळवळीचं केंद्र होतं. अनेक आंदोलनं, बैठका इथं होत असत. नेते आणि कार्यकर्ते इथं एकत्रच राहत. त्याला कम्युन म्हणत. अशा प्रकारची कम्युन पुणे, कोल्हापूर, नगरमध्येही होती. या सर्व ठिकाणी कामगार चळवळींचं प्राबल्य होतं. यात अनेक डावे पक्ष होते. संपूर्ण महाराष्ट्रात सशक्त कामगार चळवळी होत्या. यात शेतकरी ते ट्रेड अशा अनेक युनियन्स होत्या. या युनियन्समध्ये महिलाही काम करत होत्या. लाल निशाण पक्षाच्या कम्युनमध्ये शारदा साठे या पूर्ण वेळ कार्यकर्त्या आणि मागोवा गटाच्या छाया दातार या गिरणी कामगारांकरता काम करत होत्या. 1972 च्या दुष्काळादरम्यानही अनेक स्थानिक समस्यांचा उहापोह या दोघींनी केला. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित व्हायच्या काही काळ आधी, अमेरिकन समाजशास्त्रज्ञ गेल ओमवेट यांनी सातारच्या पत्री सरकारवर पीएचडी केली होती. अमेरिकेतील व्हिएतनाम युद्धाविरोधी आंदोलन आणि महिलांवर जगभरात होत असलेले अत्याचार, विरोध याबद्दल गेल ओमवेट माहिती देत असत.  श्रमिकचे कार्यकर्ते, छाया दातार, गेल ओमवेट यांच्या चर्चांमधून पुढं आलं की, महाराष्ट्रातही एक स्वायत्त स्त्री चळवळ उभारावी म्हणजेच ती कोणत्याही पक्षाला जोडलेली नसेल. गंमत म्हणजे हे सर्व सुरू होतं, एका पक्षाच्या ऑफिसमध्येच. पण तरी त्या पक्षाने हे सर्व चालू दिलं, याला सहकार्य केलं. ट्रेड युनियनच्या, शेतकरी संघाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये स्त्री मुक्ती संदर्भातली पथनाट्य आणि गाणी सादर केली जायची. विशेष म्हणजे त्याकाळच्या सशक्त कामगार चळवळींना स्त्री मुक्तीचे विचार पेलवले जात होते. जे आजही राजकीय पक्षांच्या महिला आघाड्यांमध्ये स्वीकारले जात नाहीत. श्रमिकच्या मुशीत ही चळवळ बाळसं धरू लागली. 

स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना

राज्याच्या इतर भागातही लहान-मोठ्या अशा संघटना उभ्या राहू लागल्या. आज यांचं जाळं महाराष्ट्रात आहे. पुण्यात ऑक्टोबर 1975 मध्ये स्त्री मुक्ती परिषद झाली. आणीबाणीच्या काळात ही परिषद झाली होती. वृत्तपत्रात महिलांच्या प्रश्नांसंबंधी लेख लिहून येत होते त्याचा फायदा या परिषदेत महिलांचा सहभाग वाढवण्याकरता झाला.  महाराष्ट्रव्यापी संघटन उभारावं हा मुद्दा इथं पुढं आला. याच दरम्यान या महिलांनी बायजा नावाचं त्रैमासिक सुरू केलं.  या परिषदेत जाऊन आल्यावर शारदा साठे, छाया दातार आणि गेल ओमवेट यांनी महिला कामगार, कष्टकरी, गृहिणी आणि विद्यार्थिनी अशा वीस-पंचवीस जणींचा सुरुवातीला गट बांधला. अशा प्रकारे नोव्हेंबर 1975 मध्ये स्त्री मुक्ती संघटनेची औपचारिक स्थापना झाली.

आरोप, टीका आणि प्राधान्य

ही सर्व पाश्चात्य थेरं आहेत. तुम्ही अमेरिका आणि युरोपकडे पाहून कामं करत आहात. अशाप्रकारचे आरोप सुरुवातीलाच होऊ लागले. पण संघटनेनं सुरुवातीपासूनच इथल्या स्थानिक प्रश्नांचा अभ्यास, आयाम, कामाची दिशा यावर भरपूर कामं केलं. त्याशिवाय इथं ही चळवळ तग धरू शकणार नव्हती, मुरणार नव्हती. भारतातली समाजसुधारक परंपरा आणि जागतिक स्त्री चळवळ यांचा मेळ घालायचा होता. कारण पुरुषसत्ताक हे केवळ भारतापुरतं मर्यादीत नाही. त्याला जागतिक आयाम आहे. त्यामुळे जगातील स्त्रिया काय करतात, हे पाहणंही महत्त्वाचं होतं. सोबतच आपल्या देशाचं वैशिष्ट्य, इथल्या महिलांची स्थिती व समाजसुधारकांनी केलेली कामं याचा विचार करून पुढची कामं करायला सुरूवात झाली.  

गाणी, पथनाट्यांचा वापर

महिलांच्या प्रश्नांना कलेच्या माध्यमातून हात घातला आणि या प्रश्नांची उत्तरही गाण्याच्या माध्यमातून द्यायला सुरूवात केली. कारण ज्या महिलांपर्यंत पोहचायचं होतं त्यांना बैठकीला यायला वेळ नसायचा आणि सवयही नव्हती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी पोस्टर्स, कलापथकं आणि भाषणे हा त्रिसूत्री कार्यक्रम संघटनेनं ठरवला.  आपल्याला जे व्यक्त करायचे तेच लोकांना समजले पाहिजे हा मुख्य निकष गाण्यांना लावला. या गाण्यांची पुस्तिका 1975 मध्ये काढण्यात आली. त्यावेळी या पुस्तिकेची किंमत होती, 50 पैसे. सगळ्या सदस्यांच्या नोकऱ्या आणि कामं सांभाळून कलापथकाची तयारी, चर्चा, प्रॅक्टीस चालत असे. मोठी घरं असणाऱ्या सदस्यांच्या घरात किंवा श्रमिकच्या ऑफिसमध्येच प्रॅक्टिस चाले. स्त्री मुक्ती म्हणजे नवरा, संसारापासून, मंगळसूत्रापासून मुक्ती का? असे काही लोक त्याकाळी विचारतं. लोकांच्या या प्रश्नांनाही स्त्री मुक्तीचं कामं काय आहे याची उत्तरं गाणी आणि पथनाट्यातूनच दिली गेली. अनेक कार्यकर्त्या संघटनेसाठी गाणी, पथनाट्य लिहित होत्या. पण अध्यक्षा ज्योति म्हापसेकर यांचं संघटनेची गाणी आणि नाटक लिखाणातलं योगदान खूप मोठं आहे.  मुलगी झाली हो या नाटकाने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. हिंदीसोबतच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करून हे नाटक सादर केलं गेलं. अगदी ऑस्ट्रेलियातही याचे प्रयोग झाले. 

भारतात औषध कंपनीतील महिलांना लग्नाचा हक्क नव्हता

सत्तरच्या दशकात औषध कंपनीत काम करणाऱ्या महिलांना लग्न करण्याचा अधिकार नव्हता. त्यांना बाळंतपणाची रजाही नव्हती. नवरा की नोकरी, सासू-सासरे की युनियन ही आव्हानंही महिलांसमोर होती. महिलांच्या या परिस्थितीवर उपरोधिक पद्धतीनं भाष्य करणारं हा प्रश्नच चुकीचा आहे हे नाटक अतिशय प्रभावी झालं. 

हेही पहा – महिला चळवळीची जडणघडण ऐकुयात स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापिका सदस्या शारदा साठे यांच्याकडून

जुन्या कायद्यानुसार हुंडा देणाऱ्यालाही शिक्षा

1962 च्या कायद्यानुसार हुंडा देणारे आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही शिक्षा होत होती. त्यामुळे तक्रार करायला कोणी पुढे येत नसत. परिणामी आरोपीला शिक्षा होत नव्हती. कायदा असूनही भारतात जवळपास रोज एक हुंडाबळी जायचा. 1982 मध्ये मंजुषा सारडाच्या हुंडाबळीने महिलांमध्ये खूप अस्वस्थता पसरली. शिक्षा कडक व्हावी म्हणून तरुणींनी रस्त्यांवर आंदोलनं केली. लेख आणि भाषणे लिहिली. स्त्री मुक्ती संघटनेनं तीव्र आंदोलनं उभारलं. सरकारनं याची दखल घेत प्रमिला दंडवते यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं. हुंड्याच्या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. 

स्त्री मुक्ती संघटनेचा जाहीरनामा

स्त्री मुक्ती संघटनेचा जाहीरनामा 1978 ला तयार झाला. महिलांची राजकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक दडपणातून मुक्तता करणे आणि त्यासाठी आवश्यक ती भौतिक परिस्थिती निर्माण करणे. महिलांच्या मार्गातील अडथळे दूर करणे, हे स्त्री मुक्ती संघटनेचं उद्दीष्ट ठरलं. लिंगभेदावरील आधारीत श्रमविभागणी नष्ट होणे हेही महत्त्वाचं मानलं गेलं. स्त्री मुक्ती व्यक्तिगत पातळीवर होणे शक्य नाही. यासाठी स्वतःशी वैचारिक संघर्ष, स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातील संघर्ष आणि सामुदायिक संघर्ष या तिन्ही पातळीवर संघर्ष करण्यासाठी संघटित व सामुदायिक चळवळी सुरू करणे जरुरीचं असल्याचं स्त्री मुक्ती संघटना मानते. हे सगळं करण्यासाठी महिला सिद्ध होण्यासाठी प्रयत्न स्त्री मुक्ती संघटनेकडून करण्यात येतात.    

महिलांचं जीवनमान उंचावणे

एका लेखात स्त्री मुक्ती चळवळीची पन्नास वर्ष मांडता येणं शक्य नाही. त्यामुळं ही यात आपण फक्त वरवरचा आढावा घेतला आहे. पुढचं वर्ष श्रेष्ठ महाराष्ट्रवर स्त्री मुक्ती संघटनेची पन्नाशी याचं डॉक्युमेंटेशन असणारच आहे. महिला मुक्ती, अत्याचार यापेक्षा स्त्री मुक्ती संघटना बरंच काही आहे. रोजगार निर्मिती, बालवाडी, जीवनमान उंचावण्याकरता कचरावेचक महिलांसाठी प्रकल्प, परिवार निधी, कुमारवयीनकरता व्यवसाय मार्गदर्शन, लैंगिक शिक्षण, बालमजूरी निर्मूलन, महिला आरक्षण, पर्यावरण दक्षता अशा अनेक पातळ्यांवर स्त्री मुक्ती संघटना काम करते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Varakari Education: दक्षिणकाशी पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी. भागवत धर्म हे या नगरीचे अधिष्ठान. गळ्यात तुळशी माळ, ओठात हरिपाठ व
Dhanurmas: धुंधुरमासाला धनुर्मास असे देखील ओळखले जाते. सूर्य ज्या वेळेला धनु राशीत असतो, त्या महिन्याला ‘धुंधुरमास’ म्हणून ओळखले जाते. या
जैव-विविधता किंवा एकाच कुळातील अथवा प्रजातीमधील विविध प्रकारचे सजीव एकाच वेळी, एकाच ठिकाणी अस्तित्वात असणे ही खरंतर निसर्गाने निर्माण केलेली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली