कर्वे घराण्याचा समृद्ध वारसा
‘समृद्ध वारसा’ हा शब्द आपण सहजतेने वापरतो, पण प्रत्यक्ष आयुष्यात ज्यांना खरोखरच हा समृद्ध वारसा असतो काय? हे बघायला गेलं तर यांच्या कुटुंबाचे उदाहरण देता येईल. स्त्रियांसाठी उच्च शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे महर्षी कर्वे यांचे पणजोबा, समाजशास्त्रज्ञ- मानववंश शास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे त्यांच्या आजी तर आजोबा रसायन शास्त्रज्ञ डॉ. दिनकर कर्वे.
पर्यावरण क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा जागतिक कीर्तिचा अश्डेन पुरस्कार दोनदा मिळवणाऱ्या आरती (ARTI) या संस्थेचे संस्थापक वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे हे त्यांचे वडील तर मीना कर्वे या त्यांच्या आई. मला वाटतंय तुम्हाला अंदाज आला असेल मी बोलतेय ते डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांच्याविषयी. इतका समृद्ध वारसा लाभलेला, शिवाय स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे या शाश्वत ऊर्जा संशोधन क्षेत्रातलं खरोखरीच मोठ्ठं नाव.
निर्धूर चुलींवरचं मोलाचं संशोधन
डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, समुचित एनव्हायरोटेक या पुण्यातील कंपनीच्या संस्थापक – संचालक आणि जुलै २०२३ पासून क्लीन एनर्जी अक्सेस नेटवर्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.पदार्थविज्ञान या विषयांत त्यांची डॉक्टरेट. समुचित एनव्हायरोटेक ही पर्यावरणस्नेही जीवनशैलीला प्रोत्साहन देणारी उत्पादने आणि उपक्रम राबविणारी कंपनी त्यांनी 2005 साली उभारली. डॉ. प्रियदर्शिनी ओळखल्या जातात ते निर्धूर चुलींच्या उत्कृष्ट मॉडेलसाठी. ग्रामीण भागातील स्त्रियांना धुराचा त्रास होऊ नये आणि शेताच्या आसपासच्या क्षेत्रातलं नूतनीकरणक्षम इंधनही वापरलं जावं यासाठी त्यांनी निर्धूर चुलीचं मॉडेल तयार केलं. या सगळ्या कामाशी त्या कश्या जोडल्या गेल्या हे विचारलं असता त्या सांगतात, “बीएससीच्या शेवटच्या वर्षात असताना एक प्रकल्प करायचा असतो. बाहेर कुठे जाण्यापेक्षा वडिलांच्या आरती (Appropriate Rural Technologies Institute) मध्ये प्रकल्प करूयात हे ठरवलं. तेव्हा भारत सरकारच्या सुधारित चुलींच्या प्रकल्पावर संस्थेत काम करण्याबाबतचा विचार सुरू होता आणि मला ते काम इंटरेस्टिंग वाटल्याने मी त्यातच जॉईन झाले. माझं लहानपण साताऱ्यातल्या फलटणमध्ये गेल्याने ग्रामीण आयुष्याची, ग्रामीण महिलाच्या कष्टाची- समस्यांची जाणीव होतीच. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी कमीत कमी धूर होईल आणि चांगल्या प्रकारची उष्णता मिळेल यावरचं काम आम्ही सुरू केलं. सुरुवातीच्या प्रयोगाच्या दोन तीन महिन्यातच मला स्वत:ला धुराचा प्रचंड त्रास झाला की, खेड्यातल्या बायकांना किती त्रास होत असेल, याची जाणीव तीव्र झाली. ”
चुलीतून धूर का निर्माण होतो?
डॉ. प्रियदर्शिनी पुढे सांगतात, “उपाय शोधायचा तर मुळाशी जायला हवं. चुलीतून मुळात धूर का निर्माण होतो? चुलीतल्या लाकडाला आग लावली की त्याचा पृष्ठभाग आधी जळतो, तेव्हा लाकडातले काही रासायनिक, ज्वलनशील पदार्थ ऑक्सिजनच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे ज्वाळा तयार होतात. चुलीच्या तोंडातून हा ऑक्सिजन मिळत असतो. पण खूप जास्त हवा आत आली तर ज्वालांसाठी जे तापमान राखलं जायला पाहिजे ते राखलं न गेल्याने सगळं लाकूड जळत नाही. ज्वलनशील वायू आणि कण न जळताच बाहेर पडतात आणि धूर होतो. याउलट चुलीचं तोंड खूप लहान असलं तरी किंवा काही कारणाने हवा कमी मिळत असेल तर ऑक्सिजन कमी पडतो. परिणामी पुन्हा धूर व्हायला लागतो. त्यामुळे चुलीसाठी हवा जास्तही नको आणि कमीही नको, या दोन्ही घटकांनी धूर होतो. त्यामुळे चुलीतलं हवेचं प्रमाण जर योग्य राखलं तर धूर होणार नाही हे त्यामागचं विज्ञान आहे. हे सूत्र लक्षात घेऊन चुलीच्या लाकूड लावणाऱ्या तोंडाचा आकार किती ठेवायचा, जिथून ज्वाळा बाहेर येत आहेत तो आकार किती ठेवायचा, भांडं ज्या खुरांवर ठेवलंय ते खूर किती उंचीचे ठेवायचे? या सगळ्यावर प्रयोग करून त्याची परम्युटेशन्स- कॉम्बिनेशन्स करून हवेचा योग्य पुरवठा कसा करता येईल, ज्यामुळे कमीत कमी धूर येईल. असे अनेक प्रयोग करून आमची निर्धूर चूल तयार झाली. “
धुराचा महिलांच्या आयुष्यावरील दुष्परिणाम
दरम्यानच्या काळात एमएससीमध्येही त्यांनी याच विषयावर प्रकल्प केला. पीएचडीसाठी मात्र प्रियदर्शिनी कर्वे यांनी पदार्थविज्ञानाशी संबंधित विषय निवडला. नव्वदच्या दशकात डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यावर काम करत होत्या. तेव्हा भारत सरकारच्या सुधारित चुलींसाठीच्या अनुदान प्रकल्पाद्वारे या निर्धूर चुली महाराष्ट्रातील अनेक गावात दिल्या जात होत्या. 2002 साली मात्र ही योजनाच बंद झाली. 2000 नंतरच्या काळात लोकांच्या आरोग्याला हानी न पोहोचवणारे इंधन म्हणून एलपीजीला मान्यता मिळायला लागली, त्याचा प्रचार प्रसार जोरात सुरू झाला. डॉ. प्रियदर्शिनी सांगतात, “आताच्या काळात तर उज्ज्वला योजनेसारखी भारताच्या सुमारे 97 टक्के घराघरात एलपीजी सिलेंडर पोहोचल्याचा दावा करणारी योजनाही आहे. मात्र विकसनशील देशात चुलीच्या धुराने 40 लाख महिलांचे अकाली मृत्यू, त्यातले एक चतुर्थांश म्हणजे 10 लाख महिलांचे मृत्यू भारतात होतात. तर ब्राँकायटिससारख्या श्वसनसंस्थेशी संबंधित आजाराचे 50 टक्के रूग्ण हे चुलीच्या धुराच्या संपर्कामुळे बाधित होतात, हे अभ्यासावरून लक्षात येतं. एलपीजी आल्याने धुराच्या समस्या संपल्या आहेत, असं आपण अजिबात म्हणूव शकत नाही. कारण एलपीजीचे कनेक्शन ज्यांना मिळालेलं आहे, ते सुद्धा अजून पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करत आहेत.”
समुचित एनव्हायरोटेकची स्थापना
आधी ‘आरती’ च्या माध्यमातून आणि नंतर 2005 साली निर्धूर चुली, बायोगॅस आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांसाठी डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी समुचित एनव्हायरोटेक ही कंपनी सुरू केली. खरंतर ग्रामीण भागात या चुलींना चांगली मागणी असेल असं वाटत होतं, पण सरकारी कार्यक्रमातून अनुदानातून आधी चूल मिळायची, मग आता विकत कशाला घ्यायची? असा काही लोकांना प्रश्न पडायचा तर काहींना वाटायचं तुम्ही शहरी लोक एलपीजी गॅस वापरता मग आम्हांला चूल का घ्यायला सांगता? त्यामुळे सुरूवातीला चूल विक्रीचे अंदाज काहीसे चुकले. याउलट शहरात मात्र आमच्याकडे बाग आहे, बंगला आहे आम्हांला कमी प्रदूषण करणारी, बागेतल्या काडी कचऱ्यावर चालणारी चूल विकत घेता येईल का? अश्या चौकश्या सुरू झाल्या. यासोबतच पर्यावरण विषयासंदर्भात काहीशी जागृतीही होत होती. मग सौरउर्जेवरच्या उत्पादनांची मागणीही सुरू झाली. दरम्यान डॉ. प्रियदर्शिनी कर्वे प्राध्यापक आणि व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही काम करत होत्या. वातावरण बदलाचे भविष्यातले परिणाम चिंता वाढवत होते.
पर्यावरण बदलाशी लढताना
डॉ. प्रियदर्शिनी सांगतात, “Living with climate change असा कोर्सच मी तयार केला होता. माझ्या रोजच्या आयुष्यातून आपण कार्बन फूट प्रिंट किती वाढवतोय, याचं भारतातलं कॅलक्युलेटर मी 2007 साली तयार केलं. हे गणित मी माझ्या विद्यार्थ्यांनाही करायला लावायचे. त्यातून विद्यार्थ्यांना याचं गांभीर्य कळायला लागलं, की आपल्यामुळे कार्बन फूटप्रिंट खरोखर वाढतंय. यातून शहरात पर्यावरणाचे काम करण्याच्या संधी दिसू लागल्या कारण लोकांकडून तश्या मागण्या व्हायला लागल्या. कोणाला सौरदिवे हवे असतात, कोणाला जलसंधारणात रस असतो. पर्यावरणपूरक वस्तूंमध्ये रस असणाऱ्या व्यक्तींना आम्ही पर्यावरणपूरक उत्पादनांची विक्री, प्रशिक्षण, कोर्सेस, संबंधित लोकांशी गाठ घालून देणं अशी वेगवेगळी कामं आम्ही करतो. शाश्वत शहरी आय़ुष्यासाठी कार्बन फूटप्रिंटची कार्यशाळा, नॉलेज कन्सल्टन्सी आणि प्रॉडक्ट सेल असं आमचं काहीसं काम आहे.
भारतातलं पहिलं कार्बन फूट प्रिंट कॅलक्युलेटर
आमचा कार्बन फूट प्रिंट कॅलक्युलेटर Webapp स्वरूपात उपलब्ध आहे. climatora.com या वेबसाईटवर हा कॅलक्युलेटर आहे. आपण महिन्याला वापरत असलेली वीज, आपल्याला लागणारा गॅस, आपल्या वाहनाला लागणारं पेट्रोल डिझेल, आणि इतर दोन तीन पॅरामीटर्स हे घातलं की आपली कार्बन फूट प्रिंट आपल्याला मिळतं. तुमच्या कुटुंबामुळे किती हरितगृह वायूचे उत्सर्जन होतंय, हे लक्षात येतं. 2021 साली वातावरण बदलावरचा एक उपाय म्हणून पॅरिस करार पुढे आला. जगातले सगळे देश कार्बन न्यूट्रॅलिटी प्लान जाहीर करू लागले, संस्था आणि उद्योगही आपल्या याबद्दलच्या योजना जाहीर करू लागले. म्हणजेच भविष्यात कार्बन अकाऊंटिंग कळणारे, त्यातल्या बेसिक गोष्टी कळणारे हजारोंचे मनुष्यबळ लागणार आहे. यासाठीचाच एक कार्बन अकाऊंटिंगचा एक कोर्स समुचितच्या वेबसाईटवर आम्ही 2014 साली सुरू केलेला जो आता पुन्हा काळानुरूप आणि आणखी आधुनिक केलाय. आणि हे सगळं संशोधन अभ्यास मी जाणीवपूर्वक ओपन सोर्स ठेवलाय, की तो कुणालाही कळवा त्याचा अभ्यास व्हावा आणि ते प्रत्यक्षात आणलं जावं. कारण शाश्वत शहरीकरण आणि रिन्यूएबल एनर्जीला प्रोत्साहन ही अवघड वाटणारी ध्येयं जगासमोर आहेत. हा बदल कासवाच्या गतीनं का असेना घडावा, त्यात आपलं पेटंट आड येऊ नये.”
आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन
डॉ. प्रियदर्शिनी कर्वे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांसोबत काम करतात. Indian Network on Ethics and Climate Change च्या त्या राष्ट्रीय संयोजक आहेत. Climate Collective Pune – पुणे मेट्रोपॉलिटिन रिजन कार्बन न्यूट्रल व्हावा यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करून शासनाला सादर केला आहे. क्लीन एनर्जी अक्सेस नेटवर्कच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर त्या आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
शेवटी जाता जाता एकच प्रश्न डॉ. प्रियदर्शिनी यांना विचारला, “अतिशय ज्ञानी आणि प्रसिद्ध अश्या कर्वे कुटुंबात जन्मल्याचा कधी ताण आला का?” त्यावर त्या म्हणाल्या, “कर्वे घराण्याचे दडपण असं नव्हतं, कारण आमच्याकडे प्रत्येक पिढीने वेगळ्या क्षेत्रात काम केलंय. याउलट इतर जी प्रसिद्ध घराणी आहेत त्यांच्यातल्या कुणीतरी एखादं मोठ्ठं काम करून ठेवलेलं असतं, मग त्यांच्यापेक्षा त्या क्षेत्रात वेगळं काम करणं हे आव्हान पुढच्या पिढीसमोर असतं. आमच्याकडे असं काही नव्हतं. त्यामुळे ही कर्व्यांची मुलगी आहे, ती वेगळं काहीतरी करणार हे लोकांनीच ठरवून टाकलेलं होतं, त्यामुळे मला रान मोकळं होतं तसं. पण फक्त घराणं आणि इतिहास यातच अडकून राहणंही पुरेसं नाही. वर्तमानकाळाची आव्हानं फार मोठी आहेत आणि आपण आपल्यापरीने त्यासाठी काम करत राहणं गरजेचंच आहे.”
1 Comment
I want to do the course if calculating carbon foot prints. How can I do it? Please suggest