गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. सणासुदीच्या या काळात आपण सगळेच नवनवीन कपडे घालण्यासाठी उत्सुक असतो. पण यंदा तुम्ही काहीतरी हटके करण्याचा विचार करत असाल, तर पारंपरिक कपड्यांना एक ट्विस्ट देऊन तुमच्या लूकमध्ये नवलाई आणता येईल. दरवर्षीच्या एक सारख्या फॅशन स्टाईलला थोडं बाजूला ठेवून, या गणपतीच्या उत्सवात काहीतरी वेगळं ट्राय करा.
इंडो-वेस्टर्न स्टाइलमध्ये किंवा साडी जंपसूट घालून तुम्ही तुमचा खास लूक तयार करू शकता. आऊटफिट निवडताना तुम्हाला कम्फर्ट आणि स्टाईल यांचा समन्वय साधणारे आणि सणाच्या प्रत्येक प्रसंगाला साजेशे असे आउटफिट्स निवडा.
जॅकेट
लेयरिंग ही एक सोपी आणि चटकन कोणाचंही लक्ष वेधणारी स्टाईल आहे. जी सेलेब्रिटींमध्ये खूप जास्त पाहायला मिळते. तुम्ही तुमच्या साध्या साडीला जॅकेट लेयर करून एकदम ट्रेंडी आणि आकर्षक लूक तयार करू शकता. उदाहरणार्थ, साडीवर लांब जॅकेट घालून फॉर्मल आणि पार्टीसाठी छान असा लूक करता येईल किंवा डेनिम जॅकेट घालून कॅज्युअल लूक किंवा लेदर जॅकेटही वापरता येऊ शकते.
जंपसूट साडी
जंपसुट साडी ही स्टाइलिश फ्यूजन कॉम्बिनेशन आहे. पारंपरिक साडी आणि वेस्टर्न जंपसूट यांचा हा एकत्रित प्रकार आहे. यात साडीचा लूक आणि ग्रेस असतो, पण ती नेसत नाहीत तर जंपसूट सारखी घालावी लागते.यामध्ये साडी वेगळी नेसण्याची गरज नसते. साडीचा पदर आणि निऱ्या आधीच जंपसूटमध्ये डिझाइन केलेले असतात. हे घालायला सोपे असते आणि यामुळे स्टाइलिश लूक येतो. यासोबत बेल्ट किंवा ज्वेलरी आपल्या आवडीनुसार घालता येतात.
बंडी जॅकेट
मुलांसाठी बंडी जॅकेट हा प्रकार नक्कीच खूप छान आणि वेगळा लूक करण्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला जर कोणता कुर्ता खूप आवडत असेल, पण तो कुर्ता पुन्हा रिपिट करायचा नाहीये तर तुम्ही कुर्त्यावर बंडी जॅकेट नक्की ट्राय करा. तुम्ही कुठल्याही कुर्त्यावर बंडी जॅकेट ट्राय करू शकता. यामुळे एक छान रिच लूक येतो.
शॉर्ट कुर्ता
सध्या शॉर्ट कुर्ता हा मुलांमधील एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. प्रिंटेड किंवा फक्त प्लेन, वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये शॉर्ट कुर्ते मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. सणासुदीच्या काळात परफेक्ट लूकसाठी हा एक उत्तम पर्याय नक्कीच असू शकतो.
यंदाच्या सणासुदीच्या मोसमात हे हटके फॅशन ट्रेंड्स तुम्हाला स्टायलिश आणि आकर्षक लूक मिळवण्यासाठी नक्कीच आवडतील.