पोर्तुगालमध्ये नुकताच FIM वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातल्या ऐश्वर्या पिसे या तरुणीने तिच्या गटातून जिंकली आहे. संपूर्ण आशियातून ही सर्धा जिंकणारी ऐश्वर्या पिसे ही पहिली भारतीय महिला आहे.
W2RC क्रमवारीत 27 वे स्थान
बेंगळुरूच्या 30 वर्षीय बाईकरने रॅली 2 महिला वर्गात पोर्तुगाल आणि स्पेनमधून 2 हजार किमी पेक्षा जास्त अंतर कापलं आणि W2RC क्रमवारीत 27 वे स्थान पटकावलं. हा एक मैलाचा दगड आहे जो तिला मोटरस्पोर्ट्समधील सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनवतो. या ऐतिहासिक विजयासह, ती आता डाकार 2027 च्या स्पर्धेची तयारी करत आहे. तिला डाकार रॅलीमध्ये शर्यत करून ती पूर्ण करणारी पहिली आशियाई महिला होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.
रेसर होण्याचं स्वप्न आणि त्यासाठीचा प्रवास
ऐश्वर्याचा मोटारसायकल रेसर होण्याचा प्रवास लोकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल. भारतात महिला विविध क्षेत्रात आपलं नाव उज्ज्व करत आहेत. तरिही, नवी वाट चोखळलं, कुटुंबियांनी त्यासाठी परवानगी देणं, पाठिंबा देणं, त्यासाठीच्या उपयुक्त सोई-सुविधा मिळणं अशी अनेक आव्हानं असतातच. या अडचणींचा सामना ऐश्वर्यालाही करावा लागला. मात्र, तिने हार न मानता मेहनत करत राहिली आणि आज तिने भारतासाठी मेडल ही जिंकलं आहे.
ऐश्वर्याने 2019 साली मोटारसायकलवरील मोटरस्पोर्टमध्ये भाग घेत जागतिक विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर तिने FIM बाजास विश्वचषकात भाग घेतला आणि महिला गटात प्रथम आणि ज्युनियर गटात दुसरे स्थान मिळवलं.
मोटरस्पोर्ट्स खेळात भारताचं नाव उज्ज्वल करणं हेच ध्येय
मोटरस्पोट्स या क्रीडा प्रकाराची भारतात जास्त माहिती नाही. जास्त खेळाडू नाहीत. जागतिक स्तरावर या क्रीडाप्रकारामध्ये अधिकाधिक भारतीयांचा समावेश व्हावा, या खेळाचा प्रसार- प्रचार व्हावा यासाठी ऐश्वर्या प्रयत्न करत आहे. या क्षेत्रात भारतातले खेळाडू नसल्यामुळे तिला अशा कोणत्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळाली नाही. तिची आवड हिच तिची प्रेरणा होती. मात्र, ती या क्रीडाप्रकारामध्ये प्राविण्य मिळवत आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीपुढे ती एक प्रेरणादायी खेळाडू असेल याचा तिला आनंद आहे.
मोटारसायकल रेसिंगला करिअर म्हणून निवडण्याचं आव्हान
रोड रेसिंगपासून सुरुवात करून हळूहळू मोटारसायकल ऑफ-रोड रॅली रेसिंगकडे वळणारी ऐश्वर्या 18 व्या वर्षी रेसिंगमध्ये रुची घेऊ लागली. तीन वर्षांच्या कालावधीतच तिने 2017 च्या राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिपच्या महिला गटात विजेतेपद पटकावलं. त्यानतंर तिने तीन रॅली विजय देखील जिंकले. त्यामुळे ती जागतिक विजेतेपद मिळवण्यापूर्वी तिने एकूण सहा राष्ट्रीय विजेतेपदांवर आपलं नाव कोरलं होतं.
तिच्या कुटुंबाने तिच्या या करिअरच्या निवडीला लगेच मान्यता दिली नव्हती. ती सांगते, “मी एका अतिशय रूढीवादी कुटुंबातून आली आहे. जिथे नऊ ते पाच अशी नोकरी करण्याशिवाय काहीही करणं अपेक्षित नाही. जेव्हा मी रेसिंगला व्यावसायिकरित्या घ्यायचे ठरवलं तेव्हा बरेच प्रश्न विचारले जात होते, जसं की हे सामान्य आहे का. मला वाटतं की भारतात सुरक्षा महत्त्वाची आहे आणि जर तुमच्याकडे ती आवड असेल तर तुम्ही इतर काहीही करू शकता. पण जेव्हा मी हे व्यावसायिकपणे स्वीकारले आणि त्यामुळे मला पैसे मिळू लागले, तेव्हा माझे पालकही मला पाठिंबा देऊ लागले.
मोटरस्पोर्ट्स खेळाला निधी देणे
कौटुंबिक मतभेदांव्यतिरिक्त, ऐश्वर्यासमोर इतरही काही आव्हाने आली. त्यातील एक मोठी अडचण म्हणजे तिच्या खेळांसाठी, शर्यतींसाठी आर्थिक निधीची तरतूद करणे.
एका मुलाखतीत ती सांगते की, “मी एक स्वयंपूर्ण व्यक्ती आहे आणि जेव्हा मी असं म्हणते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की माझ्या या रेसिंग करिअरसाठी मी पालकांकडून काहिच आर्थिक मदत घेतली नाही. मी माझ्या पद्धतीनं काम केलं आहे आणि माझ्या कौशल्यांनी मला आज मी जिथे आहे तिथे पोहोचवलं आहे. मोटरस्पोर्ट्स हा भारतातील सर्वात महागड्या खेळांपैकी एक आहे आणि सुरुवातीला स्वतःसाठी पैसे कमवणे हे एक मोठं आव्हान होते.”
ऐश्वर्या सांगते की, तिला रेसिंगमधून पैसे कमवायला दोन वर्षे लागली आणि तोपर्यंत ती एकतर काम करत होती किंवा कर्ज घेत होती. “जर मी स्वतःमध्ये गुंतवणूक केली नाही, तर मी इतर कोणीही माझ्यामध्ये गुंतवणूक करेल अशी अपेक्षा करू शकत नाही,” असं ऐश्वर्या म्हणते.
दुसरं म्हणजे, तिच्या आजूबाजूच्या लोकांकडून येणारा अडथळा आणि अविश्वास हे देखील तिच्यासाठी अडथळे बनले. “एक पायनियर म्हणून, तुम्हाला असे अनेक लोक म्हणतील की तुम्ही ते करू शकत नाही आणि तुम्ही तिथे पोहोचू शकत नाही, आणि ते माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते, पण मी ते पार केलं.”
मोटरस्पोर्ट्स या खेळाला सरकारकडून कोणताही पाठिंबा नाही, पण अलिकडेच गौरव गिलने अर्जुन पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे या खेळातील खेळाडूना विश्वास आहे की या कामगिरीमुळे त्यांच्या खेळाला एक दर्जा आणि खेळाच्या वाढिला मदत होईल. मोटरस्पोर्ट्स फेडरेशनने सर्व खेळाडूंना खेळाबद्दल माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि या खेळाशी स्पर्धेशी आवश्यक ती मदत पुरवून नेहमी पाठिंबा दिला आहे.
जीवघेणे अपघाताची बळी
ऐश्वर्याच्या रेसिंग कारकिर्दीत तिला गंभीर अपघातांना ही सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये तिचं स्वादुपिंड फुटणं आणि कॉलरबोन तुटणं अशा गंभीर अपघातांना सामोरं जावं लागलं आहे. पण ती या अपघातांना न घाबरता हिंमतीने उभी राहून स्पर्धेची तयारी करत असते. ऐश्वर्या म्हणते, “मला हेच आवडते आणि जेव्हा मला व्यवसाय म्हणून जे आवडते ते करायला मिळते, तेव्हा मी त्याच्या ऐवजी इतर काही करू शकत नाही.
मोटरस्पोर्ट्स खेळातील आदर्श
“स्पेनमधील लाया सॅन्झ नावाची एक महिला डाकार रॅली नावाच्या सर्वात कठीण शर्यतींपैकी एकात भाग घेते. जी माझ्या स्वप्नातील रेसिंग स्पर्धा आहे. ती दररोज 700 किमी पेक्षा जास्त 14 दिवस चालते. जी माझ्या खेळातील प्रत्येक खेळाडूला भाग घ्यायची इच्छा असलेल्या अंतिम शर्यतींपैकी एक आहे. ती दरवर्षी टॉप 20 मध्ये असते आणि बरेच लोक ती पूर्णही करू शकत नाहीत, म्हणून मला तिच्यासारखं व्हायचं आहे. भारतातून अरविंद केपी आणि सीएस संतोषसारखे भारतीय हिरो आहेत, जे डाकारमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि हे असे लोक आहेत ज्यांच्याकडे ऐश्वर्या प्रेरणा म्हणून पाहते. या डाकार 2027 च्या स्पर्धेत सहभाग घेऊन ऐश्वर्याला केवळ तिचंच स्वप्न पूर्ण करायचं नाही तर, तिला आशियातील तरुण रेसर्सपुढे कायम मेहनत करुन स्वप्न पूर्ण करण्याचा आदर्श घालून द्यायचा आहे.