महाकुंभ मेळावा हा ‘उत्तर प्रदेश पर्यटनाचा मुख्य आकर्षण’ व्हावा, अनेकानेक पर्यटकांनी या निमित्ताने प्रयागराजला द्यावी, यासाठी उत्तरप्रदेश पर्यटन विभागाने अनेक उपक्रम राबवले आहे. त्यापैकीच एक उपक्रम आहे आखाडा पर्यटन. महाकुंभ मेळाव्या निमित्ताने प्रयागराज येथे आलेल्या भाविकांना, पर्यटकांना संन्यासाचं आयुष्य कसं असतं? आखाडे म्हणजे काय? तिथं काय असतं? नागा साधू, अधोरी, कल्पवासी हे काय असतं? याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते.
त्यामुळे उत्तरप्रदेश पर्यटन विभागाने महाकुंभ मेळाव्या दरम्यान साधूंच्या जीवनासंबंधित माहिती देणारं विशेष पर्यटन टूरचं आयोजन केलं आहे.
यामध्ये राज्य पर्यटन विभागाने तीन पॅकेजेस् तयार केले आहेत. पाहुयात ही पॅकेजेस् कशी आहेत? पर्यटकांना कोणती माहिती मिळणार आहे आणि त्याचे दर किती असणार आहेत?
महाकुंभ वॉक टूर कॉम्बो पॅकेज
उत्तरप्रदेश राज्य पर्यटनाच्या या महाकुंभ वॉक टूरच्या कॉम्बो पॅकेजमध्ये पर्यटकांना 13 आखाडे, नागा साधू, अघोरी आणि कल्पवासी यांचं वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. तिथं त्यांना या वेगवेगळ्या पद्धतीच्या साधूंची पूर्ण माहिती, इतिहास, त्याचं जीवनमान, दिनचर्या याविषयीची माहिती दिली जाणार आहे. या टूरसाठी जीएसटीसह प्रत्येकी 3,500 रुपये आकारले जातात. ही पाच तासाची टूर असून याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 अशी असते.
आखाडा पर्यटन
आखाडा पर्यटनामध्ये पर्यटकांना फक्त 13 आखाड्यांमधूनच फिरवलं जातं. त्या-त्या आखाड्यांची सविस्तर माहिती दिली जाते. यासाठी पर्यटकांसोबत गाइडची नेमणूक केली जाते. यासाठी जीएसटी करासह प्रत्येकी दोन हजार रुपये आकारले जातात. ही टूर अडीच तासाची असते. याची वेळ सकाळी 7 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत असते.
नागा साधू, अघोरी आणि कल्पवासी पर्यटन
राज्य पर्यटनाच्या तिसऱ्या पॅकेजमध्ये ज्या पर्यटकांना फक्त नागा साधू, अघोरी आणि कल्पवासी साधूंचे राहणीमान पाहायचे आहे, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे अशांसाठी असते. या टूरसाठी जीएसटीसह प्रत्येकी 2 हजार रुपये आकारतात. ही अडीच तासाची टूर असून याची वेळ सकाळी 7 ते रात्री 9.30 अशी असते.
टूरचे नियम
उत्तरप्रदेश पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर https://upstdc.co.in/Web/kumbh2025 नोंदणी करता येते.
या तिन्ही टूरसाठी 5 जणांची टीम असणं अनिर्वाय आहे. शाही स्नानाचे दिवस सोडले तर इतर कोणत्याही दिवशी ही टूर करता येते. शाही स्नानाच्या दिवशी खूप गर्दी असते म्हणून त्या दिवसात कोणतेच उपक्रम राबवले जात नाहीत.
प्रयागराज इथल्या परेड ग्राउंडमधल्या टेंट कॉलनीपासून या टूरला सुरुवात होते. या टूरमध्ये सगळ्या ठिकाणी चालत प्रवास करावा लागतो. पर्यटकांसोबत टूर गाईड, मेळाव्याचा नकाशा, इको-फ्रेंडली पिशवी आणि पाण्याची बाटली दिली जाते.
पण जर का प्रयागराजमध्ये हवामान बदल झाला किंवा अन्य कोणत्या घटनेमुळे राज्य सरकारने एखाद्या दिवशीची टूर रद्द केली. तर त्यादिवशी नोंदणी केलेल्या पर्यटकांना अन्य उपक्रमात सामावून घेतलं जातं. मात्र रिफंड दिला जात नाही.