गणेश चतुर्थी म्हटलं की, सर्वात पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य ‘मोदक’. या दिवसांत घराघरांतून मोदकांचा सुगंध दरवळत असतो. बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची आपली खास परंपरा आहे.
तुम्हीही यंदाच्या गणेशोत्सवात पारंपारिक उकडीच्या मोदकासोबत काहीतरी वेगळं ट्राय करू शकता. पारंपारिक उकडीच्या मोदकांपासून ते आधुनिक चॉकलेट मोदकांपर्यंत, चला तर मग जाणून घेऊया बाप्पाच्या आवडत्या मोदकांचे 21 खास प्रकार, जे तुम्ही नैवेद्यासाठी नक्की करून पाहा.
1.उकडीचा मोदक
हा गणपती बाप्पाचा सर्वात लाडका आणि पारंपरिक मोदक प्रकार आहे. तांदूळ धुवून ते सावलीत वाळवून ते दळले जातात. या पिठाची उकड काढून पारी बनवतात. यात खवलेलं ओलं खोबरं आणि गूळ यांच्या मिश्रणाचं गोड सारण भरतात आणि मोदकाला हाताने सुंदर कळ्या पाडून ते वाफवून घेतात.
2.तळणीचे मोदक
हे मोदक खुसखुशीत आणि चविष्ट असतात. हे मोदक मैदा किंवा गव्हाच्या पिठाचे करतात. या पिठाची पुरी लाटून त्यात ओलं किंवा सुक्या खोबरं आणि गूळ किंवा साखरेचं सारण भरतात. नंतर हे मोदक तुपात किंवा तेलात सोनेरी होईपर्यंत तळतात.
3. ड्रायफ्रूट्स मोदक
हा मोदकाचा प्रकार पारंपरिक मोदकाला एक पौष्टिक आणि आधुनिक रूप देतो. यात गूळ-खोबऱ्याच्या सारणात काजू, बदाम, पिस्ता, मनुके असे सुकामेवा वापरला जातो. खजूर आणि अंजीरही यात घालू शकता.
4. चॉकलेट मोदक
चॉकलेट मोदक लहान मुलांचे आवडीचे आहेत. यात नारळ-गुळाच्या सारणात कोको पावडर किंवा वितळलेलं चॉकलेट मिसळतात. त्यामुळे मोदकाला चॉकलेटची वेगळी चव येते.
5. खवा मोदक
हा मोदक दूध आणि खव्याच्या चवीमुळे खास आहे. यात ओल्या नारळासोबत खवा आणि साखर वापरतात. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून सारण तयार करतात. नंतर पारंपरिक मोदकाप्रमाणेच वाफवून घेतले जातात. किंवा हे सारणंच मोदकाच्या साच्यात भरून त्याला मोदकाचा आकार देतात.
6. रवा मोदक
रव्याची पारी करून त्यात गूळ आणि खोबऱ्याचं सारण भरून हे मोदक उकडून किंवा तळून तयार करतात.
7. पनीर मोदक
पनीर, पिठीसाखर आणि आवडीनुसार इसेन्स वापरून हे मोदक करतात. हे मोदक दिसायला आकर्षक आणि चवीला वेगळे लागतात.
8. बेसन मोदक
बेसनाचे लाडूंचीच रेसिपी या मोदकांकरता वापरतात. बेसनाच्या लाडवाचं मिश्रण मोदकाच्या साच्यात घालून हे मोदक तयार केले जातात.
9. गूळ-कोहळ्याचे मोदक
गूळ आणि लाल भोपळ्याचे मिश्रण वापरून हे मोदक तयार होतात. विदर्भात हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे.
10. खवा-केशर मोदक
खव्यात केशर, वेलची आणि पिस्त्याचे काप घालून हे मोदक तयार करतात. यामुळे मोदकांना शाही आणि सुंदर रंग येतो.
11. पुरणाचे मोदक
ज्याप्रमाणे पुरणपोळीसाठी पुरण करून हे सारण तांदूळ किंवा कणकेच्या पारीत भरतात. ते मोदकही वाफवतात. कणकेचे करत असाल तर तुम्ही हे मोदक तळूही शकता.
12. काजू मोदक
काजू पावडर आणि पिठीसाखर एकत्र करून त्यात थोडं दूध घालून मिश्रण मळून हे मोदक करतात.
13. ओट्स मोदक
आरोग्य जपणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ओट्स भाजून त्याची पूड करून त्यात गूळ आणि सुकामेवा घालून हे मोदक करतात.
14. पान मोदक
पुण्या-मुंबईत हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. यात पानाचा अर्क, गुलकंद आणि बडीशेप वापरली जाते.
15. रसमलाई मोदक
रसमलाईची चव मोदकात देण्यासाठी पनीर, मिल्क पावडर आणि रसमलाई इसेन्स वापरून हे मोदक तयार केले जातात.
16. गाजर मोदक
ज्याप्रमाणे गाजराचा हलवा तयार करतो, त्याचप्रमाणे मिश्रण तयार करून त्याचे मोदक वळतात. गाजराची चव मोदकात खूप छान लागते.
17. नारळ-वेलची मोदक
पारंपरिक नारळाच्या सारणात वेलचीचे प्रमाण वाढवून हे मोदक करतात, ज्यामुळे मोदकांना अधिक सुगंध येतो.
18. ब्लूबेरी मोदक
पांढऱ्या रंगाच्या मावा किंवा खव्याच्या मोदकात ब्लूबेरी क्रश किंवा इसेन्स घालून हे मोदक बनवतात. त्यामुळे मोदकांना आकर्षक रंग आणि चव येते.
19. खोया-पिस्ता मोदक
खवा आणि पिस्त्याची पूड एकत्र करून हे मोदक तयार करतात. हे मोदक दिसायला हिरवे आणि चवीला छान लागतात.
20.तिळगुळाचे मोदक
या मोदकाचे सारण भाजलेल्या तीळ, गूळ आणि शेंगदाण्यांपासून तयार करतता. हे मोदक चवीला गोड आणि पौष्टिक असतात.
21.बेक केलेले मोदक
मोदक तळण्याऐवजी किंवा वाफवण्याऐवजी ओव्हनमध्ये बेक केले जातात. यासाठी मैदा, रवा किंवा गव्हाचे पीठ वापरले जाते. सारण पारंपरिक मोदकासारखंच असतं. बेक केल्यामुळे हे मोदक कमी तेलकट आणि खुसखुशीत होतात. डाएट पाळणाऱ्या लोकांसाठी हे मोदक चांगला पर्याय आहेत.