गणपती, महालक्ष्मी उत्सव : मराठवाड्याचा मांगल्यमय ठेवा

Ganeshotsav : मुंबई पुणे शहराप्रमाणे मराठवाड्यातही सार्वजनिक गणोशोत्सव भव्य दिव्य रुपात साजरा केला जातो. तरिही इथल्या घराघरामध्ये साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाप्रमाणेच घरात येणाऱ्या महालक्ष्म्याचीही पारंपरिक पद्धतीने पूजन केलं जाते. 
[gspeech type=button]

राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम असते. गणेशोत्सव म्हटल्यावर मुंबईकरांमध्ये आणि इथं असलेल्या चाकरमानी (अजित पवारांच्या भाषेतल्या कोकणवासीयांमध्ये) एक वेगळीच ऊर्जा संचारते. अगदी घरगुती गणपतीचं पण अनेकांच्या उपस्थितीत वाजत गाजत आगमन केलं जातं. भव्यता हा इथल्या गणेशोत्सवाचा गाभा आहे असं मला वाटतं. असाच भव्य पण काहीसा वेगळा प्रकार पुण्यातही बघायला मिळतो. पुण्यातली गणेश मंडळं, त्यांच्या विसर्जन मिरवणुका, तिथं होणारी गर्दी, त्यात होणारे वेगवेगळे प्रकार हे आपण पाहिले आहेत.

मुंबई-पुण्यातलं सार्वजनिक गणोशोत्सवातल्या भव्यतेचं हे लोण आता मराठवाड्याच्या गावाखेड्यातही पोहोचलंय. मोठमोठी मंडळे, शेकडो पदाधिकारी, वेगवेगळे महागडे देखावे, भाविकांची गर्दी, ढोल पथकं, त्यातून होणारी लाखोंची उलाढाल ही आता मराठवाड्यातल्या शहरांमध्येही पोहेचलीय. सार्वजनिक गणेशोत्सवाचं रूप भव्यतेकडे जात असताना घरगुती गणपतीने मात्र आपला साधेपणा कायम ठेवलाय.

सांस्कृतिक वारसा जपणारा गणेशोत्सव

मराठवाड्यातल्या मातीचा साधेपणा इथल्या प्रत्येक सण उत्सवात दिसतो. साधेपणा हीच मराठवाड्याची संस्कृती आहे. अलिकडच्या काळात त्यात थोड्या फार प्रमाणात बदल झाले असले तरी संस्कृतीचं मूळ रुप अद्याप बदललेलं नाही.

आमच्याकडे घरांमधले गणपती अगदी छोटे आणि सुबक असतात. सर्वसाधारणपणे एक ते दीड फुटांपर्यंतच्या मूर्ती घराघरांत बसवल्या जातात. देवघरात पाट किंवा चौरंगावर लाल रंगाचा रेखीव कापड अंथरून त्यावर गणपती बाप्पा विराजमान होतात. अलिकडे घरगुती गणपतींना मखर बनवण्याची नवी पद्धत आली आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी हॉलमध्ये किंवा जिथं जागा असेल तिथं टेबलावर आकर्षक मखर मांडून त्यात गणपतीची स्थापना केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती आणि मोदकाचा प्रसाद असतो.

मोदक हा मराठवाड्यातला आणखी एक उल्लेखनीय प्रकार. मला मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा समजलं की मोदक हे उकडलेलेही असतात. त्याआधी सगळं बालपण हे गव्हाच्या पीठाचे तळलेले मोदक खाऊन गेलं. गव्हाच्या पीठाचं कणिक करून त्यात खोबरं आणि (शक्यतो) गूळ किंवा साखरेचं सारण भरलं जातं. त्याला मोदकाचा आकार देऊन नंतर तळलं जातं. मराठवाड्यात साधारणपणे सगळीकडेच असे तळलेले मोदक गणपतीला दिले जातात. बाप्पाही तळणीचे चांगले की उकडीचे या वादात न पडता ते आनंदाने फस्त करतात.

महालक्ष्म्याचं पूजन

गणपतीच्या आगमानानंतर तिसऱ्या दिवशी घरी महालक्ष्मी येतात. मुंबई आणि कोकणात गौरी-गणपती असं म्हटलं जातं. त्याला मराठवाड्यात महालक्ष्म्या असा शब्द रूढ आहे. ज्या घरांत महालक्ष्म्या बसवल्या जातात त्या घरात गणपतीपेक्षा जास्त लगबग महालक्ष्म्यांची असते. बाप्पा विराजमान झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून महालक्ष्म्यांची तयारी सुरू होते. पुरूष मंडळी मखर उभारण्याच्या आणि सजावटीच्या तयारीला लागतात तर महिलावर्ग महालक्ष्यांच्या साड्या, आभूषणं आणि प्रसाद, आरासाचे पदार्थ तयार करण्याच्या मागे लागतात.

महालक्ष्म्या कुणी स्थापन कराव्यात यामागेही शास्त्र आहे. ज्या घरात सून आहे त्याच घरात महालक्ष्म्यांची स्थापना केली जाते. एकत्र कुटुंब पद्धतीत घरात दोन पिढ्यांच्या सून असल्यानं अशा घरांत महालक्ष्मी येते. पण ज्या घरात लक्ष्मी नाही, म्हणजेच सून नाही अशा छोट्या किंवा विभक्त घरांमध्ये महालक्ष्म्या बसवल्या जात नाहीत. घरात येणारी सून लक्ष्मीच्या रूपाने घरात प्रवेश करते. माहेरून येताना आहेरात ती महालक्ष्मीचे मुखवटे घेऊन येते. लग्नाच्या पुढच्या वर्षापासून अशा घरात महालक्ष्मीची स्थापना केली जाते.

आता महालक्ष्म्यांचे मखर बाजारात तयार मिळत असल्यानं ते काम जरा हलकं झालंय. त्यामुळे त्यात वाचलेला वेळ पुरूष मंडळी सजावट अधिक आकर्षक करण्याला देत आहेत. ज्येष्ठा गौरी आवाहनाचा आदला दिवस म्हणजे संपूर्ण कुटुंब घरात लग्नकार्य असल्यासारखं एकत्र येऊन साजरा करतं. घरातल्या दोन-तीन पिढ्या एकत्र येऊन मखर उभारणं, सजावट करणं अगदी उत्साहात करतात.

मराठवाड्यात साधारणपणे दोन महालक्ष्म्या आणि सोबतच एक मुलगा एक मुलगी अशी दोन छोटी पिलं असं स्वरूप असतं. अशीच परंपरा खान्देशातही बघायला मिळते. गौरी पूजनाच्या दिवशी गौरी आणि पिलांना 21 भाज्यांसह पुरणाचा साग्रसंगीत प्रसाद दाखवला जातो. सोबतच आरासामध्ये फळे, फराळाचे पदार्थ, लाडू, करंज्या, चकली, शेव आणि महत्वाचे म्हणजे अनारसे हे असतातच. हे सर्व पदार्थ गणेशोत्सव काळात घरीच तयार केले जातात.

गौरी पूजनावेळी केळीच्या पानावर 21 किंवा 51 अशा संख्येत कणकेचे दिवे लावले जातात. विधिवत पूजा आणि आरत्या झाल्यानंतर केळीच्या पानावरच महालक्ष्म्यांना प्रसाद ठेवला जातो. यावेळी विड्याच्या पानाचाही मान आहे. दोन्ही लक्ष्म्यांच्या हातात लवंग खोचलेले विडे ठेवले जातात. प्रसाद दाखवल्यानंतर संपूर्ण कुटुंब, पाहुणे मंडळी केळीच्या पानावर प्रसाद ग्रहण करतात.

कुटुंब एकत्र ठेवणारे हे उत्सव

गणपतीचे 10 दिवस आणि त्यातही महालक्ष्म्यांचे तीन दिवस हे माणसं जोडणारे आणि कुटुंबातील अनेक पिढ्या एकत्र आणणारे सण आहेत. गरीब असो वा श्रीमंत, पत्र्याचं घर असो वा चकाकता महल, प्रत्येक कुटुंब आपल्या परीने अशाच पद्धतीनं भक्तिभावाने आणि आनंदाने गणपती आणि महालक्ष्म्यांचे दिवस जगतो. हे सण केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित नसून, कुटुंबाची एकता, सामाजिक बंध आणि मराठी संस्कृतीचा गौरवशाली वारसा जपण्याचे माध्यम आहेत. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिला गेला तरच मराठी संस्कृती काळाच्या पडद्यावर टिकू शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Ganeshotsav : गणपती बाप्पा यामध्ये गणपती या शब्दामध्ये गण आणि पती असे दोन शब्द आहेत. यापैकी पति या शब्दाचा अर्थ
Ganeshotsav : मत्सरासूर, दंभासूर, क्रोधासूर, कामासूर, लोभासूर आणि मदासूर हे मानवी अंतःकरणातील षड्रीपू आहेत. या मानवी गुणांवर कशी मात करावी
Ganeshotsav : गणपतीला दुर्वांचाच हार का घालतात, सिंहही गणपतीचं वाहन आहे पण मग उंदीरचं का सतत दाखवला जातो? जास्वंदाचं फूलचं

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ