समृद्धता, विद्वत्ता, संपन्नता आणि समाधान घेऊन अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन घराघरांमध्ये होईल. प्रत्येक घराच्या कुलाचार आणि प्रांतांप्रमाणे गौरीची वेगवेगळ्या रुपात स्थापना केली जाते. त्या अमूक एका स्वरुपातच असाव्यात याचं ठोस काही कारण दिसून येत नाही. सर्व परंपरा, पद्धतींप्रमाणे हा कुलाचारही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होताना दिसतो. गणपतीचं आगमन हे तिथीनुसार होत असलं तरी गौरींच आगमन, पूजन आणि विसर्जन हे नक्षत्रांवर आधारित आहे. गौरीपूजनात माहेरवाशीणींना खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याकडील पितृसत्ताक पद्धतीत मुलीची नाळ माहेरच्या कुटूंबाशी जोडलेलीच आहे. ती लग्न होऊन सासरी जरी गेली असली तरी, तिचं माहेरचं स्थानही अबाधित आहे. तिला अंतर नाही हेच आपल्याला गौरीच्या सणात पाहायला मिळतं. म्हणूनच सासरवाशीण आणि माहेरवाशीण सोबत जाऊन गौरीला घरी घेऊन येतात.
गौरीला घरी आणताना तोंडात पाणी का धरतात?
कुणाकडे खड्यांच्या रूपात, कुठे उभ्या, कुठे नुसतेच मुखवटे तर कुठे मडकी अशा वेगवेगळ्या प्रकारे गौरीला पूजल जातं. पण सगळीकडे एक गोष्ट सारखीच पाहायला मिळते, ती म्हणजे गौर तलाव, नदी, विहीर अशा कोणत्याही पाणवठ्याहूनच आणतात. याबाबत एक दंतकथा सांगितली जाते. एक दरिद्री ब्राह्मण परिस्थितीला कंटाळून नदीवर आत्महत्या करायला जातो. त्याची अवस्था पाहून गौरीला दया येते. आणि ती त्याला म्हणते, “तू मला तुझ्या घरी ने, घरभर फिरव, जे जे दाखवशील तिथे मी ‘तथास्तू’ म्हणेन. पण याची कुठेही वाच्यता करायची नाही”. याकरताच बहुदा तोंडात पाणी धरून ठेवून गौरीला घेऊन येतात.
खड्यांच्या गौरीत आलेलं व्यापारीकरण
ज्या घरांमध्ये खड्याच्या गौरी असतात, त्या घरातील लेकी-सूना पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा नऊ अशा विषम संख्येत खडे गोळा करतात. खडे धुवून एका ताम्हणात ठेवतात. हे ताम्हण धरणारी महिला पाणवठ्यावरच तोंडात पाणी धरून ठेवते. गौरीला घरी आणून तिची प्रतिष्ठापना होईपर्यंत पाणी तोंडातच धरून ठेवायचं असतं. कोणतीही गोष्ट नीट समजून उमजण्याकरता, सारासार विचार करण्याकरता लागणारा संयम यातून शिकायला मिळतो. उंबरठ्यात औक्षण झालं की, गौरीच्या पुढे पुढे रांगोळीने पावलं काढत काढत जात तिला संपूर्ण घर दाखवतात. आणि मग तिची प्रतिष्ठापना करायची. पूजनाच्या दिवशी पूरणा-वरणाचा नैवेद्य दाखवायचा. रोज दोन वेळा आरती करून तिसऱ्या दिवशी पुन्हा पाणवठ्यावर त्यांचं विसर्जन करायचं. ही झाली खड्याच्या गौरिंची पारंपरिक पद्धत. पण हल्ली सगळ्याच सणांप्रमाणे यातही व्यवहार आलाय. परंपरेतला साधेपणा संपवून उगीचच दिखाऊपणाही आलाय. हौसेला मोल नसतं हेच हेरून काही व्यापाऱ्यांनी चक्क चांदीचे खडे विकायला सुरू केलंयं. आणि लोकही पाणवठ्यावर जायचे कष्ट नको म्हणून हे चांदीचे खडे एकदाच आणून ठेवतात. आणि त्यांची पूजा करतात.
खान्देशात ज्येष्ठा, कनिष्ठा या गणपतीच्या बहिणी आणि त्यांची बाळं
खान्देशातल्या घरांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोघी बहिणी, आपल्या भावाकडे गणपतीकडे येतात, असं समज आहे. या दोघीही आपल्या बाळांसोबत माहेरी येतात. त्यामुळे इथं गौरी आल्यावर गणपतीला उचलून दोन्ही बहिणींच्या मध्ये ठेवलं जातं. प्रथम मुखवट्यांची पूजा करतात. मग त्यांना अंगणात नेऊन, उंबरठ्यातून आत आणून घर दाखवलं जातं. ज्येष्ठाच्या पोटात 16 करंज्या तर कनिष्ठाच्या पोटात 8 करंज्या एका डब्यात भरून ठेवतात. मग साडी नेसवून गौरी उभ्या केल्या जातात. बाळांच्या पोटात पाच-पाच करंज्या ठेवतात. त्यांचं पोट भरलेलं असू देत जेणेकरून आपल्या घरातही अन्नधान्याची आबाळ होणार नाही. या भागात फुलांची कमतरता असल्याने, गुळाच्या साटोऱ्यांचा फुलोरा करण्याची प्रथा आहे. गौरी समोर हळदी-कुंकू, कंगवा, आरसा, 5-5 पानांचा गोविंद विडा ठेवतात. तर येणाऱ्या महिलांकरता 3-3 विड्यांचा गोविंद विडा देतात. संध्याकाळी सुकं खोबरं आणि पिठी साखरेची खिरापत असते. गौरी पूजनाच्या दिवशी ज्येष्ठाची ओटी नारळ आणि तांदळाने भरतात, तर कनिष्ठाची ओटी ज्वारी आणि मक्याच्या कणसाने भरतात. नैवेद्याकरता 16 प्रकारच्या भाज्या, भज्या, खीर, पुरणपोळी असते.

कोल्हापूरात गौरी उत्सवात निसर्ग संवर्धनाची परंपरा
कोल्हापूर भागात गौरीला पाणवठ्यावरून आणायला आळीतल्या सर्व घरातील महिला एकत्रच वाजत गाजत निघतात. अगदी आळीतली शंभर घरं असली तरी त्या त्या आळीतल्या महिला एकत्रच निघणार. पाणवठ्यावरून तेरडा वनस्पतीच्या रुपातली गौर वाजत गाजत घरी आणतात. तेरड्याच्या रोपांसोबत मातीच्या दोन मडक्यांमध्ये तांदूळ भरायचे, त्यावर झाकण ठेवून ते एकावर एक ठेवायचे. त्यावर कापडाचा गोलसर गोळा बनवून, एरंडच्या पानांनी तो गोळा व्यवस्थित झाकायचा, अशा पद्धतीची पारंपरिकरित्या गौर या भागात असते. ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी म्हणजेच गौरी पूजनाच्या दिवशी, ‘जावई शंकरोबा’ म्हणजेच शंकराचं आगमन होतं. या भागातल्या डोंगरांवर आढळणारं एक प्रकारचं ‘तण’ शंकर म्हणून पूजतात. काही घरांमध्ये शंकरोबासोबत गंगाही असते. हल्ली पीओपीच्या मूर्त्याही ठेवतात. या दिवशी नैवेद्याला शेपू पोपळीची भाजी, भाकरी, थालीपीठाचे वडे, खीर, पुरणपोळीचा नैवेद्य असतो. महिला वर्ग तीन वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या एकत्र बांधून त्याचं तोरण करतात. आणि याने घरातील महिलेची ओटी भरतात. या कलमांची लागवड करायची. उत्सवासोबत निसर्ग संवर्धनाची किती छान परंपरा आहे. रात्री जागरण करताना महिला अनेक खेळ खेळतात.

हुबळी, धारवाडमध्ये नैवेद्यात उडदाचा प्रभाव
हुबळी धारवाड भागातही माती किंवा चांदीची दोन सुगडं तांदूळ, गहू, सुपारी, नाणं भरून एकावर एक ठेवतात. त्यावर पणतीच्या आकाराची मातीची लहान थाळी गौरीचा चेहरा म्हणून ठेवतात. या थाळीवर चुना, केशरी रंग, काजळ, कुंकू यांनी चेहरा, डोळे काढायचे. चेहऱ्याच्या मागे केवडा, चाफ्याने सजावट करायची. गौराईला चित्रान्न, शेवयाची खीर, उडदाचे पापड, उडदाची गोल भजी, सांबार, कढी, पूरण, कडबूचा नैवेद्य दाखवतात.
काही घरांमध्ये गौरी म्हणजेच गणपतीच्या पत्नी रिद्धी-सिद्धी
काही घरांमध्ये गौरी नवसाच्याही असतात. तर काही घरांमध्ये गौरींना गणपतीच्या पत्नी म्हणजेच रिद्धी-सिद्धी मानतात. गणपतीसमोर पाट मांडून त्यावर गौरीचे मुखवटे ठेवून पूजा करतात. डोक्यावर कापसाचं वस्त्र ठेवतात. मग हे मुखवटे घेऊन घराबाहेर जायचं. एक माहेरवाशीण आणि एक सासरवाशीण एक-एक मुखवटा दोन्ही हातात धरते. गौरीच्या डोक्यावर अंगठा आणि मागून मानेकडच्या भागात चारही बोटं येतील, अशा विशिष्ट प्रकारेच धरले जातात. आणि मग त्यांचं नेहमीप्रमाणे औक्षण करून घर दाखवून आगमन होतं. धातूचं स्टँड, कपड्याचं धड आणि त्यावर मुखवटा अशाप्रकारे गौरीला उभं करतात. गौरीला साडी नेसवण्यापूर्वी डब्यात पेढे आणि बर्फी भरून तो छोटा डबा तिच्या पोटात बांधला जातो. मखरात ठेवून आरती करून बेसन लाडू, ओल्या नारळाच्या करंज्यांचा नैवेद्य दाखवल्यावर विसर्जनापर्यंत या गौरींना स्पर्श करत नाहीत. पूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. पूजनाच्या रात्री गौरींसमोर वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू वाट्यांमध्ये भरून सपाट करून ठेवलं जातं. रात्री गौरी भेट देते आणि घरात सौख्य नांदतं, असा समज आहे. मूळ नक्षत्रावर गौरींपुढे 2 कानवले, दही भात, पानाचा विडा ठेवून अक्षता टाकून गौरींना हलवल जातं.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ‘ओसे’
कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गौरी पूजनाच्या दिवशी ‘ओसे’ असतात. या भागात बहुतांशपणे ज्येष्ठा गौरीच्या रुपात एकच गौर असते. आणि ती मुखवटा लावून साडी नेसून उभ्या रूपात असते. या काळात पश्चिम घाटावर जिथे तिथे तेरडा दिसून येतो. त्यामुळे तेरड्याच्या स्वरूपात पाणवठ्यावरून गौर आणतात. काही जण तेरड्यासोबत हळद आणि तुळशीचं रोपही आणतात. काही घरांमध्ये पाणवठ्यावरून पाच खडे कलशात घालून शंकर पण येतात. तर काही ठिकाणी शंकर म्हणून कलशात केवळ पाणी आणलं जातं.

ओस्यांच्या सुपातील साहित्य
ओस्यांकरता एका सूपात भोपळा, काकडी, कारलं, पडवळ, करंज, विड्याच पान यांची प्रत्येकी पाच पान ठेवतात. प्रत्येक पानावर पाच प्रकारच्या स्थानिक भाज्या आणि फळ, 1 नारळ ठेवतात. सूपाला दोऱ्याची पाच सूत बांधून हळदी कुंकूवाची बोटं लावतात. गौरीला दूध, लाह्या अर्पण करून, औक्षण करून एक पान अर्पण करतात. याला ‘गौर ओवसणे’ असं म्हणतात. घर फळाफुलांनी नेहमी भरलेलं असू देत, सौख्य नांदू देत हाच यामागचा उद्देश. मग घरातल्या वडीलधाऱ्यांना देतात. नवविवाहितेचा पहिला ओसा असतो तेव्हा फारच गंमत असते. ‘पूर्वा’ नक्षत्रावर गौरी पूजन आलं तरच लग्नानंतरचा पहिला ओसा करतात. नंतर मग ती विवाहीता दरवर्षी ओसा करते. कोकणात आणखी एक प्रकार पाहायला मिळतो तो म्हणजे, ‘गाठी बांधणे’. सुती दोरा घेऊन आपल्या सलग नऊ चिमटीच्या मापाचा एक पदर, असे नऊ पदर घ्यायचे. असंच 16 मुठींच्या मापांचा एक पदर, असे 16 पदर घ्यायचे. या पदरांचा एक एक सेट घेऊन, त्यात ओश्यामधील एक एक जिन्नस गाठीत बांधायचा. त्यांना घरात उघडंच ठेवायचं. दसरा ते दिवाळीच्या दरम्यान या गाठींची पूजा करायची. त्यांना उकडीचे दिव्यांनी ओवाळून प्रत्येकी सोळा आणि नऊ भाज्या, तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखवायचा. आणि मग एक-एक गाठ सोडवून त्या जिन्नसांचं विसर्जन करायचं. उकडीचे दिवे प्रसाद म्हणून खायचे.
विदर्भात गौरींकरता 16 भाज्या, पुरणपोळी, घारी, ज्वारिची आंबिल
विदर्भात गौरींना महालक्ष्मी म्हणतात. इथंही गणपतीची आई ज्येष्ठा आणि कनिष्ठा रूपात येतात. मुखवटे आणि साडी नेसलेल्या या उभ्या महालक्ष्मी आपल्या सोबत आपली दोन बाळंही आणतात. कनिष्ठा उंबरठ्याच्या आत थांबून, बाहेरून येणाऱ्या ज्येष्ठाचं स्वागत करते. साडी नेसवण्याच्या आधी कोथळात आपल्या इच्छेनुसार सव्वा किलो ते पाच किलो तांदूळ भरायचे. पूजनाच्या दिवशी नैवेद्याला 16 भाज्या, पुरणपोळी, घाऱ्यांसोबत ज्वारिची आंबिलही हवीच. महालक्ष्मीच्या फुलोऱ्याकरता करंजा, मोदक, पाती आणि रव्याने बनवलेली वेणी, गवा, करंडाही असतो. इथेही कोकणातल्या गाठींसारखाच पोतं प्रकार असतो. सुती दोऱ्याचे 16 पदर घेऊन त्यांना सोळा गाठी मारुन महालक्ष्मींच्या गळ्यात घालतात. तर बाळांच्या गळ्यामध्ये 8 पदरी दोरा घेऊन 8 गाठी घालून घालतात. विसर्जन झाल्यावर ही पोतं प्रसाद म्हणून गळ्यात घालतात.
गौरींच्या रुपात, पूजनात घराघरात, विभागावार विविधता आढळते. पण गौरी पूजनामागचा मूळ उद्देश एकच, स्त्रियांना आनंद, उत्साह मिळावा, मंगलमय वातावरण असू देत. त्यामुळे परंपरांचं, चालीरितींचं पालन करताना त्यांचं ओझं स्त्रियांवर येणार नाहीना, याचं भान सर्वांनी ठेवलं तर गौरीपूजनाचं खरं फलीत नक्कीच मिळेलं.