प्रयागराज हे उत्तरप्रदेशमधील ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असलेलं शहर आहे. गंगा, यमुना या नद्यांचा संगम प्रयागराजमध्ये होतो. याच ठिकाणी सरस्वती नदी या नद्यांना येऊन मिळते अशी धारणा आहे. या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानाला तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. 144 वर्षानंतर प्रयागराजला महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात येतो. या धार्मिक उत्सवामुळे प्रयागराजला अलौकिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
महाकुंभ मेळाव्या निमित्ताने देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना प्रयागराजमधली महत्त्वपूर्ण स्थळं पाहता यावी, त्यांची माहिती व्हावी आणि प्रयागराजमधील स्थानिक कलाकसुरीच्या वस्तू पाहता याव्यात यासाठी उत्तरप्रदेश पर्यटन विभागाकडून ‘विशेष प्रयागराज दर्शन’चं आयोजन केलं जातं.
तर पाहुयात प्रयागराज दर्शन टूर मध्ये कोणकोणती स्थळं दाखवली जातात? त्यासाठी आकारले जाणारे दर आणि अन्य माहिती.
त्रिवेणी संगम
सकाळी 7 वाजता प्रयागराज मधल्या इलावर्त हॉटेलमधून या टूरला सुरुवात होते. 7 वाजून 15 मिनिटांनी पर्यटकांना गंगा, यमुना आणि सरस्वती एकत्र येतात त्या त्रिवेणी संगमावर घेऊन येतात. इथंच कुंभ मेळाव्याचं आयोजन करतात. याठिकाणी साधारण 45 मिनिटाचा वेळ पर्यटकांना दिला जातो. त्यानंतर नाश्तासाठी फ्लोटिंग रॅस्टोरंटमध्ये घेऊन जातात.
अक्षयवट कॉरिडोर
अक्षयवट हे भाविकांच्या श्रध्देचं ठिकाण आहे. पुराण कथांमध्ये अक्षयवटची नोंद आढळते. प्रयाग येथील भारद्वाज मुनींच्या आश्रमात प्रभू रामाने भेट दिली मुनींनी प्रभू राम यांना अक्षयवट वटवृक्षाचे महत्त्व सांगितले. सीता मातेने तेव्हा या वटवृक्षाला आशीर्वाद दिला आणि प्रलयाच्या वेळी पृथ्वी बुडाली तेव्हा हा एकमेव वृक्ष चिरकाल टिकला होता. हा पवित्र वृक्ष आज अक्षयवट या नावाने ओळखला जातो. महान कवी कालिदास यांच्या ‘रघुवंश’मध्ये तसेच चिनी प्रवासी ह्युएन त्सांगच्या प्रवासवर्णनातही अक्षयवटाचा उल्लेख आहे. असं मानतात की, केवळ अक्षयवट पाहिल्याने एक ‘अक्षय पुण्य’ (शाश्वत पुण्य) प्राप्त होते.
सन 1583 साली मुघल सम्राट अकबर यांनी यमुनेच्या काठावर अलाहाबाद किल्ला बांधला. हा किल्ला बांधल्यानंतर या वृक्षाच्या परिसरात कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता. ब्रिटिश राजवटीत आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतरही हा किल्ला लष्करांच्या ताब्यात राहिल्यामुळे याठिकाणी लोकांना प्रवेश दिला जात नव्हता.
सन 2018 साली उत्तरप्रदेश सरकारने हे निर्बंध उठवले आणि भाविकांना या अक्षयवट वृक्षाचे दर्शन घेण्यासाठी खुला केला. या परिसरात भाविकांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात व या स्थळाचं जतन व्हावं म्हणून सरकारने या परिसराचे सुशोभिकरण केलं आहे. या स्थळावर पर्यटकांना 30 मिनिटांचा वेळ दिला जातो.
बडे हनुमान दर्शन
प्रयागराजमधल्या संगम नगरामध्ये बडे हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये 20 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. जगातलं हे एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानाची मूर्ती ही ‘निद्रावस्थेत’ आहे. आणखी एक खास बाब म्हणजे मंदिराच्या तळघरात ही मूर्ती असल्याने भरतीच्या वेळी नदीचं पाणी हे तळघरात शिरतं आणि मूर्ति पूर्णपणे या पाण्यात न्हाऊन उतरते. या मंदिरात पर्यटकांना 30 मिनिटाचा अवधी दिला जातो.
भारद्वाज आश्रम
ऋषी भारद्वाज यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला हा आश्रम आहे. भारद्वाज ऋषींनी पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी गंगा नदीच्या प्रवाहात अडथळा आणण्यासाठी याच ठिकाणी भगवान शिवकडे प्रार्थना केली होती, अशी आख्यायिका आहे. हा परिसर पाहण्यासाठी पर्यटकांना 30 मिनिटाचा वेळ दिला जातो.
चंद्रशेखर आझाद पार्क
हे उत्तर प्रदेशमधलं सार्वजनिक उद्यान आहे. सन 1870 मध्ये प्रिन्स आल्फ्रेड हे अलाहबाद शहराला भेट देणार होते, तेव्हा हे उद्यान खास बांधलं गेलं होतं. या उद्यानाचा परिसर एकूण 133 एकर क्षेत्रफळ आहे. या उद्यानाला कंपनी बाग असंही म्हटलं जायचं. पुढे 1931 साली क्रांतिकारण चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानाची आठवण म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यावर या उद्यानाला चंद्रशेखर आझाद पार्क असं नाव दिलं. याठिकाणी पर्यटकांना 15 मिनिटांचा वेळ देतात.
अलाहाबाद संग्रहालय
सन 1931 साली चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये अलाहाबाद संग्रहालय उभं केलं. राष्ट्रीय पातळीवरचं हे संग्राहलय आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, पुरातत्व, साहित्यिक आणि आर्किटेक्चर अशा विविध क्षेत्रातील समृद्ध कलाकृती या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात.
या स्थळांना भेटी दिल्यावर पर्यटकांना जेवण्यासाठी पुन्हा राही येथील इलावर्त हॉटेलवर आणलं जातं. इथून पुन्हा पुढची स्थळं पाहण्यासाठी 2 वाजता प्रवास सुरू केला जातो.
श्रृंगवरपूर धाम
इथे पर्यटकांना दोन तासामध्ये राम घाट, श्रृंगवरपूर महादेव मंदिर आणि राम शयन आश्रम दाखवलं जातं.
निषादराजाची राजधानी
पौराणिक कथेनुसार, केवट समाजाचे निषादराज यांनी प्रभू राम यांना वनवासात जाताना गंगा नदी पार करण्यासाठी मदत केली होती. यावेळी प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांनी याठिकाणी एक रात्री साठी वास्तव्य केलं होतं. त्यामुळे या जागेला धार्मिक महत्त्व आहे.
शॉपिंग
या स्थळाला भेट दिल्यावर पर्यटकांना प्रयागराज इथले स्थानिक पदार्थ खाण्यासाठी, विकत घेण्यासाठी वेळ दिला जातो. तसचं प्रयागराज इथे स्थानिक कलाकुसर केल्या जाणाऱ्या वस्तू जसं की, ह्रॅन्डलूम साड्या, वेताच्या टोपल्या, लाकडी खेळणी यांच्या खरेदीसाठी वेळ दिला जातो.
प्रयागराज दर्शनचे दर
या संपूर्ण ट्रिपसाठी 2020 रूपये आकारले जातात. यासाठी तीन जणांचा ग्रुप असणं बंधनकारण आहे. या संपूर्ण टूर मध्ये पर्यंटकांना विविध स्थळांची माहिती देण्यासाठी गाइड दिलेला असतो. या ट्रिपमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण हे इलावर्त हॉटेलवर स्वखर्चाने करावं लागतं.