अघोरी! शब्द उच्चारताच आपल्या मनात नकारात्मक भीतीदायक प्रतिमा उभी राहत असेल. पण अघोरी या शब्दाचा अर्थ असा आहे की, कोणत्याही प्रकारची भय-भिती नसणे. महाकुंभच्या निमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीचे साधू या मेळाव्यात दिसत असतात. केसाच्या जटा, अंगभर राख आणि गळ्यात मानवी कवट्यांची माळ असं अघोरी साधूंचं रुप असतं. त्यांच्याबद्दल अनेक समज प्रचलित आहेत.
अघोरी साधू नेमके कसे असतात? ते कुठे राहतात? काय करता हे जाणून घेऊयात.
अघोरी साधूंचं तत्वज्ञान
आध्यात्मिक ज्ञान मिळवून ईश्वराला भेटायचं असेल तर शुद्धतेच्या नियमांच्या पलिकडे गेलं पाहिजे, हे अघोरी समुदायाचं तत्वज्ञान आहे. त्यानुसार, माणसाला ज्या – ज्या गोष्टी अस्वच्छ, घाणेरड्या वाटतात अशा गोष्टींचा सामना करुन त्याबद्दलची घृणा हे साधूं नष्ट करतात. ते असं मानतात की, आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हा माणसांचं मांस खाणं अशा चित्रविचित्र कृत्यांतून जातो. सामान्य लोकांनी वर्ज्य केलेल्या गोष्टींचं भक्षण करुन ते परम चेतना प्राप्त करतात असा या साधूंचा विश्वास आहे.
अघोरी साधूं हे भगवान शिव यांचे अनुयायी आहेत. ते महादेवाची आणि त्यांची पत्नी शक्तीचीही उपासना करतात.
स्मशानात वास्तव्य करणारे साधू
मनातली भीती पूर्णत: दूर सारून तपस्या करण्यासाठी हे साधू स्मशानात राहतात. स्मशान हे भीती, दुःख आणि निराशेने भरलेलं स्थळ मानतो. मात्र, याच ठिकाणाहून हे साधू आपली तपस्या सुरू करतात. ते सहसा काळे कपडे घालतात किंवा निर्वस्त्र राहतात. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करीत असताना कपडे परिधान करतात.
तर जीवन आणि मृत्यू या चक्राचं प्रतिक म्हणून हे साधू गळ्यामध्ये मानवी कवट्यांची माळ घालतात.
या साधूंविषयी समाजात अनेक समज प्रचलित आहेत. यापैकी अनेक समज खरे असून या अघोरी साधूंनी ते मान्यही केले आहेत. मात्र, त्यांच्या प्रत्येक कृत्यामागे असलेल्या कारणांची स्पष्टता दिली आहे.
‘अघोरी: अ बायोग्राफिकल नॉवेल’ या पुस्तकाचे लेखन मनोज ठक्कर यांनी या अघोरी साधूंविषयी असलेल्या अनेक समज आणि त्यामागचे कारणं स्पष्ट केली आहेत. ते सांगतात की, अघोरी साधू हे निसर्गाच्या खूप जवळ असतात. ते कोणत्याच गोष्टीत भेद करत नाहीत. एवढं की ते प्राणी आणि मानवाच्या मासांमध्येही भेद करत नाहीत. त्यामुळे ते मृत माणसाचं मांस अन्न म्हणून खातात. मात्र, अघोरी साधूंचा मृत्यू झाल्यावर त्यांचं मांस खाल्लं जात नाही. त्या मृतदेहाचं विधीवत अंत्यसंस्कार केले जातात.
हे साधू गांजाची नशा करतात, मात्र ही नशा त्यांच्यावर कब्जा मिळवत नाही. गांजा ओढल्यावरही त्यांना त्यांच्या स्वत:बद्दल पूर्ण जाण असते.
संन्यासी आयुष्यात सर्व वर्गामध्ये ब्रह्मचर्यला महत्त्व दिलं जातं. आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळणं हा सगळ्यात महत्त्वाचा नियम असतो. मात्र, या समुदायामध्ये ब्रह्मचारीपणाविषयीचे नियम वेगळे आहेत. शारीरिक संबंधाविषयी त्यांचे नियम हे वेगळे आहेत. काही साधूंनी मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं मान्य केलं आहे. मात्र, समलैंगिकतेला ते मान्यता देत नाहीत.
महिला अघोरी साधू
महिला नागा साधूंप्रमाणे महिला अघोरी साधूही असतात. त्यांचे नियम, पद्धती या पुरुष अघोरी साधूंसारख्याच असतात. मात्र, महिला साधू या कपडे परिधान करतात.
सामाजिक कार्य
या अघोरी साधूंचं रुप आणि त्यांच्या सवयी या जरी मनात धडकी भरवणाऱ्या आहेत. तरी सामाजिक कार्यात या साधूंचं चांगलं योगदान आहे. सामान्यत: कुष्ठरोग्यांवर उपचार करणे, त्यांची सेवा करण्यासाठी पुरेशी औषधोपचार केंद्र नाहीत. मात्र, अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी अघोरी साधूंनी खास हॉस्पिटल्स बांधले आहेत. अशाप्रकारे समाजाने अस्पृश्य मानलेल्या रुग्णांची सेवा करुन कुष्ठरोगाविषयी असलेल्या भीतीवर हे साधू मात करतात.