महाकुंभ 2025 : कथा आखाड्यांची

Mahakumbh 2025 : आदीशंकराचार्य यांनी ख्रिस्तपूर्व काळात देशभरातील संन्यासी आणि साधूचं एकत्रिकरण व्हावं, यासाठी महाकुंभ मेळाव्याला सुरुवात केली. केवळ साधूचा सहभाग असलेल्या या कुंभमेळाव्यांना हळूहळू अन्य भाविक सुद्धा उपस्थित राहून सहभागी राहू लागले.

आदीशंकराचार्य यांनी ख्रिस्तपूर्व काळात देशभरातील संन्यासी आणि साधूचं एकत्रिकरण व्हावं, यासाठी महाकुंभ मेळाव्याला सुरुवात केली. केवळ साधूचा सहभाग असलेल्या या कुंभमेळाव्यांना हळूहळू अन्य भाविक सुद्धा उपस्थित राहून सहभागी राहू लागले. काळाच्या ओघात कुंभ मेळाव्यामध्ये अनेक बदल घडले. तरिही, या मेळाव्याच्या निमित्ताने देश-परदेशातून येणारे साधू, त्यांच्यातील पंथ, विविध आखाडे हा विषय सगळ्यांसाठीच कुतूहलाचा विषय असतो.

जाणून घेऊयात हे 13 आखाडे कोणते असतात आणि त्याचं वेगळंपण काय असते?

श्री पंचदशम जूना आखाडा

श्री पंचदशम जूना आखाडा हा सगळ्यात जूना आणि अधिक महत्त्वपूर्ण असलेला आखाडा आहे. हा शिव संन्यासी पंथातला आखाडा आहे. सन 1145 मध्ये उत्तराखंडमधल्या कर्णप्रयाग इथं या आखाड्याच्या पहिल्या मठाची स्थापना केली. या आखाड्यातील संन्यासी हे भगवान शिव आणि गुरु दत्तात्रय यांचं पूजन करतात.

या मठामध्ये जवळपास 5 लाख नागा साधू आणि महामंडलेश्वर संन्यासी आहेत. या आखाड्याचं मुख्यालय हे वाराणसीमध्ये आहे. सध्या प्रेमगिरी महाराज हे या आखाड्याचे अध्यक्ष आहेत. आखाड्यामध्ये महामंडलेश्वर पद हे सर्वोच्च असतं. आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी जी महाराज हे या आखाड्याचे महामंडलेश्वर आहेत. आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी जी महाराज यांनी आतापर्यंत लाखो अनुयायांना संन्यासाची दीक्षा दिली आहे.

श्री पंचायती आखाडा निरंजनी –

निरंजन म्हणजे निर्मळ, पवित्र असा आहे. ऐहिक जीवनाचा त्याग करुन आत्म्याच्या शुद्धीसाठी आध्यात्मिकतेकडे वळतात. श्री पंचायती आखाडाचं वैशिष्ट्य म्हणजे, या आखाड्यातील आध्यात्मिकता आणि शिस्त. 13 आखाड्यामध्ये या आखाड्याला विशेष स्थान आहे. या आखाड्यामध्ये सर्वाधिक साधू हे उच्चशिक्षीत आहेत. हाही आखाडा शिव संन्यासी पंथातला आखाडा असून शैव पंथातला आहे. या आखाड्यातील संन्यासी भगवान शिव यांचे पुत्र कार्तिकेय यांची उपासना करतात.

या आखाड्यात जवळपास 10 हजारहून अधिक नागा साधू आहेत. याशिवाय 33 महामंडलेश्वर आणि 1 हजारहून अधिक महंत आहेत.

धर्माच्या रक्षणासह धर्माची शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे, धर्माचे पालन करणे आणि आध्यात्मिक ज्ञान मिळवणे हा या आखाड्याचा मूळ उद्देश आहे. या आखाड्याचं मुख्यालय प्रयागराजला असून उज्जैन, हरिद्वार, त्र्यंबकेश्वर आणि उदयपूर येथे या आखाड्याचे आश्रम आहेत.

हे ही वाचा : महाकुंभ 2025 : नागा साधू

श्री पंच अटल आखाडा –

आदी शंकराचार्य यांनी या श्री पंच अटल आखाड्याची स्थापना केली असं म्हटलं जातं. हा दशमी संन्यास परंपरेतला आखाडा आहे. या आखाड्यातील महंत बलराम भारती यांच्या माहितीनुसार, 569 इसवी सनापूर्वी या आखाड्याची स्थापना झाली आहे. या आखाड्यातूनच अनेक संतांनी बाहेर पडून वेगवेगळ्या आखाड्याची निर्मिती केली.

अटल आखाड्यामध्ये 500 संत आहेत. या आखाड्यामध्ये सहभागी होणाऱ्या संन्यासींची संख्या मर्यादीत असते. या आखाड्यामध्ये आचार्य महामंडलेश्वर हे सर्वोच्च पद नसतं. या आखाड्याची शिस्त्र, प्रशासन हे प्राचीन स्वरुपातच सुरू आहे. या आखाड्यातील साधू हे दिवसाची सुरुवात गणेश पुजनाने करतात. 4 श्री महंत, महासचिव आणि सचिव हे या आखाड्याचं नेतृत्व करतात. तर चार महंत 4 कारभार पाहणारे, 2 पुजारी आणि 1 कोठारी हे आखाड्या संबंधित निर्णय घेतात. या आखाड्यातील नागा साधूंनाच महंत महामंत्री आणि मंत्री पदावर लोकाध्यक्ष पद्धतीने नियुक्त केलं जातं.

अन्य आखाड्यांपेक्षा या आखाड्याचे नियम हे खूप कठोर आहेत. या आखाड्यामध्ये साधूंच्या संख्येपेक्षा योग्य साधूंना सहभागी करुन देण्यावर भर दिला जातो. यासाठी 41 दिवसाची परिक्षा घेतली जाते. माघ महिन्यातल्या थंडीच्या दिवसात पहाटे 4 वाजता उठून थंड पाण्याने अंघोळ करुन पूजापाठ करावी लागते. तर मे आणि जून महिन्यातल्या उष्णतेच्या दिवसात 41 दिवस धगधगत्या उन्हामध्ये फिरुन अग्नि तपस्या करावी लागते. यातून पास झालेल्या संन्यासांवर वरिष्ठ लोकांचं लक्ष असते. हे संन्यासी संसाराच्या सर्व मोहपाशातून मुक्त झाल्याची खात्री झाल्यावरच त्यांना आखाड्यातील विविध पदावर जबाबदारी दिली जाते.

श्री पंचायती महानिर्वाण आखाडा –

अटल आखाड्यातील 8 संतांनी बाहेर पडून बिहार येथे श्री महानिर्वाण आखाड्यांची स्थापना केली. बिहारमधल्या हजारीबाग जिल्ह्यातल्या गडकुंडा गावातल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये या आखाड्याची स्थापना केली. प्रयागराज इथं या आखाड्याचं आश्रम उभारल्यावर अटल आखाड्यातील अनेक साधूंनी या आखाड्यात प्रवेश केला. त्यानंतर या आखाड्याचं नाव श्री पंचायती महानिर्वाण आखाडा असं करण्यात आलं. यावेळी या आखाड्याला शक्ती आणि संरक्षणासाठी दोन भाले दिले होते. या आखाड्याचं दैवत कपिल देव भगवान आहेत. या आखाड्यातील साधू भगवान कपिल देव सोबत भाल्यांचीही पूजा करतात.

या आखाड्यांच्या आश्रमांमध्ये गोशाला असते. आध्यात्मिकतेसोबत हे साधू गोसेवा करतात. आश्रमांमध्ये पारंपारिक सात्विक पद्धतीने जेवण तयार केलं जातं. चूलीवर जेवण बनवण्यासाठी गोवऱ्यांचा वापर केला जातो. या आखाड्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची पूर्वायुष्याची पूर्ण पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जातो. तर आखाड्यातील विविध पदावर लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन नियुक्ती केली जाते.

श्री तपोधिनी आनंद आखाडी

शैव संप्रदायातल्या सात आखाड्यापैकी हा एक महत्त्वपूर्ण आखाडा आहे. महाराष्ट्रातल्या विदर्भ इथं या आखाड्याची स्थापना केली. कथा गिरि, हरिहर गिरि, रामेश्वर गिरि, देवदत्त भारती, शिव श्याम पुरी, श्रवण पुरी यांनी या आखाड्याची स्थापना केली आहे. प्रतिष्ठा, शिस्त आणि परंपरा हे या आखाड्याचे वैशिष्ट्य आहे. या आखाड्याचे दैवत सूर्य नारायण भगवान आहेत.

सनातन धर्माचे रक्षण करताना, धर्मातर करणाऱ्यां विरोधात मुघल राज्यकर्त्यां विरोधात या आखाड्यातील साधूंनी अनेकदा युद्ध लढली आहेत. अशा अनेक घटनांची नोंद इतिहासात आहे. या आखाड्यामध्ये टिव्ही पाहण्यावर पूर्ण बंदी आहे. जे साध आतापर्यत टिव्ही, सिनेमा पाहताना आढळून आले आहेत, अशा साधूंना आखाड्यातून काढून टाकलं आहे.

या आखाड्यात प्रवेश देण्यापूर्वी ब्रह्मचारी म्हणून त्या सदस्याला तीन ते चार वर्षे आश्रमामध्ये राहावं लागतं. चार वर्षानंतर त्या सदस्याची वागणूक पाहून मग ज्या ठिकाणी कुंभमेळा असेल तेथील पवित्र नदीमध्ये 151 वेळा डुबकी लावावी लागते. त्यानंतर पिंडदान करुन दीक्षा दिल्यावर आखाड्यात प्रवेश देतात.

हे ही वाचा : महाकुंभ मेळाव्यातील उच्चशिक्षित साधू

श्री पंचदशनम आवाहन आखाडा –

आदी शंकराचार्यांनी सहाव्या शतकामध्ये काशी इथल्या दशाश्वमेध घाटावर या आखाड्याची स्थापना केली असं म्हटलं जातं. हा शैव संप्रदायातला आखाडा आहे. सनातन धर्माचे रक्षण आणि धार्मिकतचे जनजागृती करणे यासाठी या मठाची स्थापना केली. या आखाड्याला पूर्वी ‘आवाहन सरकार’ असंही म्हटलं जायचं. या आखाड्यामध्ये महंत हे सर्वोच्च पद असते.

श्री पंचदशनम अग्नी आखाडा –

श्री पंचदशनम अग्नी आखाडा हा शैव संप्रदायातला आखाडा आहे. तरिही, जूना आखाडा आणि आवाहन आखाड्यापेक्षा या आखाड्याचे नियम, प्रशासन पद्धतीमध्ये फरक आहे. या आखाड्याचं केंद्र गिरनार पर्वतावर आहे. आखाड्याची दैवत गायत्री देवी आहे.

या आखाड्यामध्ये नागा साधू ऐवजी ब्रह्मचारी असतात. या ब्रह्मचाऱ्यांना गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते. या आखाड्यातील साधूंना मादक पदार्थाचे सेवन करण्यावर पूर्ण निर्बंध असतात. या आखाड्यामध्ये ठरावीक जणांनाच ब्रह्मचारी म्हणून प्रवेशी देऊन त्यांना प्रशिक्षण देतात. या आखाड्यातील संन्यासी स्वत:चं अन्न स्वत: शिजवून खातात. कपाळावर टिका आणि अंगातल्या जानवं वरुन त्यांची ओळख पटते. हे ब्रह्मचारी संत 16 माळ्याची गायत्री जप करत असतात.

श्री दिगंबर अनी आखाडा –

वैरागी वैष्णव संप्रदायातल्या तीन मुख्य आखाड्यांपैकी श्री दिगंबर अनी आखाडा हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वपूर्ण असलेला आखाडा आहे. या आखाड्यातील साधू हे सफेद रंगाचे वस्त्र वापरतात. त्यांच्या कपाळावर उर्ध्वपुंड्र टिळा असतो. या आखाड्यातील संन्यासी भगवान विष्णु प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्णाचे उपासक आहेत. या आखाड्याची स्थापना अयोध्यामध्ये केलेली. गुजरात इथल्या साबरमाला मध्ये या आखाड्याचं मुख्यालय आहे. देशभरात या आखाड्याचे एकूण 450 केंद्र आहेत. चित्रकूट, अयोध्या, नाशिक, वृंदावन, जगन्नाथपूरी आणि उज्जैनमध्ये या आखाड्याची केंद्र आहेत.

या आखाड्यातील साधूंना रामानंदी आणि श्यामानंदी असं संबोधलं जातं. ते गळ्यात तुळशीची माळ घालतात. एकमेकांना ते जय श्रीराम-जय श्रीकृष्ण बोलुन अभिवादन करतात. या आखाड्याचा झेंडा हा पाच रंगाचा असतो. त्यांच्यावर भगवान हनुमानाचा फोटो असतो. या आखाड्यातील संन्यासी जटा ठेवतात.

श्री निर्वाण अनी आखाडा –

अयोध्या मधला एक प्रभावशाली आखाडा म्हणून श्री निर्वाण अनी आखाड्याची ओळख आहे. संत अबयरामदास जी यांनी या आखाड्याची स्थापना केली आहे. या आखाड्याच्या स्थापनेपासुन हनुमानगढीवर या आखाड्याचं वर्चस्व राहिलं आहे.

श्री पंच निर्मोही अनी आखाडा –

बालानंद महाराज यांनी वृदांवनमध्ये श्री पंच निर्मोही अनी आखाड्यांची स्थापना केली. या आखाड्याचे महंत सुंदर दास महाराज आहेत. आखाड्यातील संन्यासाना आध्यात्मिकतेसोबत आयुधं हातळण्याचंही प्रशिक्षण दिली जाते. झाझी ची राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात या आखाड्यात सामावून घेतलेलं. या आखाड्यातील साधूंनी धर्माच्या रक्षणासाठी मोहम्मद गौरी या मुस्लीम आक्रमणकर्त्याविरोधात लढाई लढलेली.

हे ही वाचा : महाकुंभ मेळाव्यामधील आखाडा पर्यटन !

श्री पंचायती आखाडा बडा उदासीन –

उदासीन संप्रदायातल्या या आखाड्याची स्थापना हरिद्वार येथे 1825 साली केली होती. या आखाड्याचं मुख्यालय प्रयागराज, कीडगंज येथे आहे. तर वाराणसी, हरिद्वार, मथुरा सह देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये या आखाड्याचे केंद्र आहेत. या आखाड्यातील संन्यासी हे संपूर्ण देशभरात यात्रा करत धर्माचा प्रचार-प्रसार आणि सामाजिक कार्य करतात.

भगवान चंद्रदेव हे या आखाड्याचे दैवत आहेत. तरी भगवान चंद्रदेवसोबत विष्णु, शिव, माता भगवती, गणपती आणि सूर्य नारायण या पंचदेवाची ही उपासना केली जाते. या आखाड्यामध्ये चार मुख्य महंत असतात. हे चार महंत आखाड्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेतात. महंत महेश्वर दास जी महाराज हे या आखाड्याचे अध्यक्ष आहेत. या आखाड्यामध्ये अनेक संन्यासी साधू हे उच्चशिक्षित आहेत.

कुंभ मेळाव्यामध्ये या आखाड्यातर्फे भंडारा चालवला जातो. विनाशुल्क शिक्षण, आरोग्य शिबिर आणि लोकांना राहण्याची सुविधा या आखाड्यातर्फे पुरवली जाते.

या आखाड्यातील महंत दुर्गादास यांनी सांगितलं की, या आखाड्यामध्ये गुरू हे आपल्या शिष्याची निवड करतात. वयाच्या पाचव्या वर्षी, दहाव्या वर्षी, 12 व्या वर्षी आणि 24 व्या वर्षी जेव्हा आखाड्यातील वरिष्ठ गुरूला एखादा सदस्य शिष्य म्हणून योग्य वाटेल तेव्हा त्याला दीक्षा देऊन आखाड्यामध्ये सामावून घेतलं जातं.

कुंभ मेळाव्यामध्ये निर्वाण संत बनन्याची परंपरा आहे. जे 24 पेक्षा कमी वयाचे बाल युवा संत असतात त्यांना कुंभ मेळाव्यात दीक्षा दिली जाते. पंच परमेश्वरद्वारा त्यांना शपथ दिली जाते. निवस्त्र अवस्थेत अंगभर राख लावून ते तपस्या करतात. कुंभ मेळाव्याचा कालावधी संपल्यावरही ते त्याची तपस्या सुरू ठेवतात. या काळात ते शस्त्र आणि शास्त्र अशा दोन्ही पद्धतीचं शिक्षण घेतात.

श्री पंचायती आखाडा नया उदासीन –

श्री पंचायती आखाडा नया उदासीन आखाडा उदासीन पंचायती नया आखाडा म्हणून ही ओळखला जातो. 6 जून 1913 साली या आखाड्याची स्थापना झाली आहे. सन 1902 मध्ये उदासीन आखाड्यातील साधूंमध्ये झालेल्या मतभेदातून या आखाड्याची निर्मिती झाली. शीख धर्माच्या शिकवणूकीवर आधारीत हा आखाडा आहे.

हरिद्वारमधल्या कनखल येथे या आखाड्याचं मुख्यालय आहे. तर देशभरात 700 ठिकाणी याचे केंद्र आहेत. या आखाड्यामध्ये दर दिवशी हजार लोकांसाठी लंगरची सुविधा दिली जाते. कुंभ मेळाव्या दरम्यान, या आखाड्याकडून आरोग्य शिबिराचं, जेवनाची व्यवस्था केली जाते. तसचं संतांच्या प्रवचनाचं आयोजन केलं जातं.

श्री निर्मल पंचायती आखाडा –

सन 1862 साली पंजाब येथल्या पटियालामध्ये महाराजा नरिंदर सिंग, राजा भरपूर सिंग आणि राजा सरुप सिंग यांनी निर्मल पंचायती आखाड्याची स्थापना झाली. हा आखाडाही शीख धर्माच्या शिकवणूकीवर आधारलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Mahakumbh 2025 : नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी अंतराळातून प्रयागराजचा फोटो घेतला आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या जनसमुदयांचा सहभाग असलेला हा
Mahakumbh 2025 Stampede : बुधवारी 29 जानेवारीच्या पहाटे प्रयाग संगमावर मौनी अमावस्येनिमित्त भाविकांच्या प्रचंड संख्येमुळं चेंगराचेंगरी झाली. यात 17 जणांचा
Mahakumbh 2025 : महाकुंभ या धार्मिक मेळाव्यासाठी जगभरातून कोट्यावधी लोक प्रयागराजला एकत्र येत आहेत. या मेळाव्यासाठी विमानातून येणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश