सर्व पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेक भाविक कुंभमेळ्यादरम्यान पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. यासाठी धार्मिकदृष्ट्या ‘कुंभ मेळावा’ हा उत्तम काळ मानला जातो. देश-विदेशातून अनेक साधू संत, भाविक या कुंभ मेळाव्यासाठी एकत्र जमतात. या कुंभ मेळाव्यामध्ये केवळ नद्यांमध्ये पवित्र स्नान करणं, केवळ या एकाच गोष्टीसाठी साधू-संत याठिकाणी येत नसतात. पवित्र स्नानासह खास ‘कल्पवास’ करण्यासाठी अनेक जण कुंभ मेळाव्यामध्ये येत असतात. पाहुयात ‘कल्पवास’ म्हणजे नेमकं काय असते.
कल्प आध्यात्मिक ‘व्रत’
धर्माच्या रक्षणासाठी, आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधासाठी संन्यास स्वीकारलेले साधू-संत हे कुंभ मेळाव्याच्या काळात पवित्र नद्यांच्या तीरावर कठोर तपस्या करतात. कल्प या शब्दाचा अर्थ आहे ‘व्रत’. या कुंभ मेळाव्यामध्ये आपलं खाणं-पिणं, झोप, विश्रांतीचा वेळ या सगळ्या गोष्टींवर काटेकोर नियंत्रण ठेवत अधिकाधिक वेळ तपस्या, ध्यानसाधना करण्यावर भर दिला जातो. कल्पवास व्रत स्वीकारणारे लोक पवित्र नद्यांतील स्नानासोबत कल्पवास तपस्येच्या मार्गातून आत्मशुद्धी आणि मोक्ष प्राप्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात.
गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रमाकडे
भाविक जेव्हा गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रमामध्ये वाटचाल करण्याचं ठरवतात, त्यावेळेला त्यांना कल्पवासाचं व्रत करावं लागतं. या व्रताच्या माध्यमातून ती व्यक्ती त्यांच्या आतापर्यंतच्या दैनंदिन संसारातून, आयुष्यातून बाहेर पडून संन्यास घेत असल्याचं दर्शवलं जातं. पूर्वी एकदा का संसारातून बाहेर पडण्यासाठी कल्पवास व्रत केलं की, पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये परतता येत नसे. मात्र काळानुरूप कल्पवासाचं व्रत केल्यावर पुन्हा गृहस्थाश्रमात परतता येतं. संन्याशी व्यक्ती हे कल्पवास व्रत मोठ्या प्रमाणात करतात, कारण याच पद्धतीच्या जीवनशैलीचं ते नित्य आचरण करत असतात.
हे ही वाचा : महाकुंभ 2025 : कथा आखाड्यांची
कल्पवास तपस्येची पद्धत
कुंभ मेळाव्याच्या काळात पवित्र नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान आणि कल्पवास तपस्या करणं, अधिक पवित्र मानलं जातं.
कल्पवास तपस्या ही 1 महिन्यासाठी केली जाते. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा हा एक महिन्याचा काळ असतो. कल्पवासाच्या 21 नियमांसह, धार्मिक क्रिया आणि जप करत व्रत पूर्ण करावं लागतं. या तपस्येसाठी सफेद किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात.
पौष पौर्णिमेच्या दिवशी सहभागी होणारे साधू हे गंगा नदीमध्ये स्नान करतात. त्यानंतर पुरोहितांच्या नेतृत्वात पूजा करुन संकल्प केला जातो. शिबिरामध्ये विष्णु सहस्त्रनाम, राम रक्षा, नारायण कवच पठण करतात. शाळिग्रामाची पूजा आणि रुद्राभिषेक करण्यात येतो.
कल्पवासाचे 21 नियम
आत्मशुद्धी आणि पापमुक्ती मिळवून देणाऱ्या या तपस्येचे 21 नियम पाळणं खूप कठीण असते. यासाठी स्वनियंत्रण आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. पद्म पुराणामध्ये गुरू दत्तात्रेय यांनी या कल्पवासाच्या 21 नियमांविषयी माहिती दिली आहे. सत्यवचन, अहिंसा, आपल्या इंद्रियांवर नियंत्रण, सर्व प्राणीमात्रांवर दयाभाव, ब्रह्मचर्याचं पालन, विविध व्यसनांपासून मुक्ती, ब्रह्म मुहूर्ताला दिवसाची सुरुवात करणं, दिवसातून तीन वेळा पवित्र नदीमध्ये अंघोळ करणे, त्रिकाल संध्या उपासना करणे, पूर्वजांचं पिंडदान, दानधर्म, अंतर्मुख जप, सत्संग, ठरवलेल्या क्षेत्राच्या बाहरे न जाणे, कुणाचीही निंदा न करणे, साधु संन्यासांची सेवा करणे, जप आणि किर्तन करणे, दिवसातून एकदाच जेवणे, जमिनीवर झोपणे, शिजवलेलं अन्न खायचं नाही, देव पूजा करणे असे हे 21 नियम आहेत. यामध्ये ब्रह्मचारी राहणे, व्रत पाळणे, उपवास ठेवणे, देव पूजा, सत्संग आणि दानधर्म हे महत्वाचे नियम मानले जातात.
हे ही वाचा : महाकुंभ 2025 : नागा साधू
कल्पवासाचा कालावधी
शास्त्रानुसार, कमीतकमी 1 रात्र तरी कल्पवास व्रत करता येते. त्याचप्रमाणे, तीन रात्री, तीन महिने, सहा महिने, सहा वर्ष, 12 वर्ष किंवा आयुष्यभर सुद्धा कायाकल्प तपस्या करता येते. मात्र, महाकुंभ मेळाव्याच्या काळात केल्या जाणाऱ्या कल्पवास तपस्येचं महत्त्व जास्त असतं, अशी नोंद वेदांमध्ये आणि पुराण ग्रंथामध्ये आहे.
तुळस,जवाच्या लागवडीसह शाळिग्रामची प्रतिष्ठापना
कुंभ मेळाव्याच्या ठिकाणी कल्पवासी शिबिराच्या ठिकाणी पहिल्या दिवशी विधीवत तुळस आणि जवाची लागवड केली जाते. त्याचवेळी भगवान विष्णुची शाळिग्राम रुपात प्रतिष्ठापना केली जाते. या तपस्येचा पूर्ण एक महिना संपल्यावर या शिबिरातील साधू गण तुळशीच्या रोपाचं गंगा नदीमध्ये विसर्जन करतात. तर जवाचं झाड हे ते आपल्या सोबत प्रसाद म्हणून घेऊन जातात.