मुघल आक्रमणापासून हिंदू मंदिरांचे आणि जनतेचे रक्षण करण्यासाठी आदी शंकराचार्यांनी आखाड्यांची निर्मिती केली. या आखाड्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना धार्मिक, आध्यात्मिक ज्ञानासह शस्त्र हाताळण्याचंही शास्त्रोक्त शिक्षण देऊ केलं. आखाड्यातील साधूंनी या शस्त्र शिक्षणाच्या साहाय्याने मुघल राज्यकर्त्यांविरोधात लढून उत्तर भारतातील अनेक मंदिरांचं रक्षण केल्याच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात.
आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार आखाड्यापासून आज 13 आखाडे स्थापन झाले आहेत. या 13 आखाड्याचे मूळ तीन संप्रदायात वर्गीकरण होते.
पाहुयात हे तीन मुख्य संप्रदाय कोणते आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे.
शैव संप्रदाय
शैव संप्रदाय हा भगवान शिव यांची पूजा करतात. या संप्रदायायतील साधूगण हे भगवान शिव शिवाय अन्य कोणत्याही देवाला सर्वोच्च स्थान देत नाहीत. ते केवळ शिव आणि त्यांच्याच विविध अवताराचं पूजन करतात.
या संप्रदायातील साधूगणांचं रुप हे भगवान शिव यांच्याशी मिळत-जुळत ठेवलं जातं. निर्वस्त्र राहणे किंवा भगव्या रंगाचे कपडे या संप्रदायातील लोक वापरत असतात. अंगाला राख लावणे, गळ्यात माळा घालणे, केसाच्या जटा ठेवणं, हातात आयुध घेणं अशा रुपात ते वावरत असतात. शैव संप्रदायांच्या परंपरांविषयी वेद आणि उपनिषिधामध्ये नोंद केलेल्या गोष्टीनुसार चालते. महाभारतामध्ये सुद्धा शैव संप्रदायाचा उल्लेख आढळतो.
या संप्रदायातील साधूंना नाथ, अघोरी, अवधूत, बाबा, औघड, योगी किंवा सिद्ध नावाने ओळखलं जातं. या संप्रदायामध्येच नागा साधू असतात. तसंच या संप्रदायात अघोरी साधूही असतात.
उपनिषदं, शिव पुराण, आगम ग्रंथ आणि तिरुमुराई हे शैव संप्रदायाचे विशेष ग्रंथ आहेत. तसंच बनारस, केदारनाथ, सोमनाथ, रामेशश्वरम, चिदंबरम, अमरनाथ आमि कैलाश मानसरोवर हे शैव संप्रदायाचे मुख्य तीर्थस्थान आहेत.
या संप्रदायाचे निर्वाणी, अटल, निरंजनी, आनंद, जुना, आवाहन, अग्नी असे एकूण 7 आखाडे आहेत. त्यापैकी जूना अखाडा हा शैव संप्रदायातील सर्वात मोठा आखाडा आहे.
वैष्णव आखाडा
भगवान विष्णु यांची उपासना करणाऱ्या मठवासियांचा समावेश वैष्णव संप्रदायात होतो. या समुदाय भगवान विष्णुसह त्यांच्या विविध रुपांची आराधना करतात. रामानुज, माधवाचार्य आणि वल्लभाचार्य हे या संप्रदायाचे तीन प्रमुख संत होते.
वैष्णव आखाड्यांच्या परंपरांमध्ये पवित्र ग्रंथांचे संरक्षण, अनुष्ठान आणि परंपरा जपणे यांचा समावेश आहे. वैष्णव आखाडे कुंभमेळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वैष्णव आखाड्यांची परंपरा कायम ठेवण्यासाठी दैवी अधिकाराचे प्रतीक असलेली पवित्र काठी घेऊन मिरवणूक काढण्यात येते. वैष्णव आखाड्यांनी परकीय आक्रमणे परतवून लावण्यासाठी शस्त्रास्त्रे चालवणाऱ्या लष्करी संत संघटना उभारल्या होत्या. या आखाड्यांना आध्यात्मिक आणि युद्ध प्रशिक्षणाची परंपरा आहे. या संप्रदायातील संन्यासी ब्रह्यचारी असतात.
श्री पंच निर्मोही आखाडा, श्री पंच निर्वाणीआखाडा आणि श्री पंच दिगंबर आखाडा हे तीन वैष्णव संप्रदायाचे आखाडे आहेत.
या आखाड्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिंना संन्यास घेतल्यावर तीन वर्ष ‘टहल’ म्हणजे तेथील साधू-संतांची सेवा करावी लागते. खूप वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना नागा हे पद मिळतं. तेव्हा त्यांच्यावर आखाड्याशी संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या जातात. या जबाबदाऱ्या यशस्वी पूर्ण केल्यावर त्यांना पुजारी ही पदवी मिळते. या संप्रदायात महंत पदवी मिळवण्यासाठी वर्षोनुवर्षे धर्माची सेवा करावी लागते. महंत हेच या संप्रदायातील आखाड्यांचं सर्वोच्च पद आहे. या संप्रदायातील तिन्ही आखाड्यांचे तीन वेगवेगळे श्रीमहंत असतात. त्यानंतर महामंडलेश्वर असतात. महामंडलेश्वर हे संन्यासाकरता दीक्षा देतात. तसंच धर्म प्रचार करण्याची जबाबदारी या महामंडलेश्वरांवर असते.
या संप्रदायातील संन्यासी हे आपल्या कपाळावर भगवान विष्णु यांचं प्रतिक असलेला चंदनाचा टिळा लावतात. तर गळ्यात तुळशीची माळ घालतात. पवित्रता आणि भक्तीचं प्रतिक म्हणून ही माळ घालतात. जन्माष्टमी, राम नवमी आणि वैकुंठ एकदशीला या संप्रदायामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. तसंच भगवान विष्णु यांच्याशी संबंधित असलेले वृंदावन, मथुरा आणि तिरुपती ही स्थळं या संप्रदायांची प्रमुख तीर्थस्थानं आहेत.
उदासीन संप्रदाय
सनातन धर्मासह शीख धर्माचे आणि त्यांची प्रार्थनास्थळ गुरुद्वाराच्या रक्षणासाठी सुद्धा विशेष आखाडा अस्तित्वात आहे. या आखाड्याच्या संप्रदायांना उदासीन किंवा उदासी संप्रदाय असं म्हणतात. या संप्रदायाचं केंद्र हे उत्तर भारत आहे. याची स्थापना शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचे पुत्र चंद यांनी केली आहे. त्यांना बाबा श्री चंद्र किंवा भगवान श्री चंद्र नावानं संबोधलं जातं.
जल, अग्नी, पृथ्वी, वायु आणि आकाश या पंचभूतांची ते उपासना करतात. आणि शिख धर्मियांचा ‘आदिग्रंथ” हा त्यांचा धार्मिक ग्रंथ आहे.
श्री पंचायती आखाडा बडा उदासीन, श्री पंचायती आखाडा नया उदासीन आणि श्री निर्मल पंचायती हे तीन आखाडे उदासीन संप्रदायातील आहेत. या संप्रदायातील साधू ही संन्यासी आणि गृह संसारापासून दूर असतात. ते अहिंसक प्रवृत्तीचे असतात. त्यांना नानक पुत्र म्हणून संबोधलं जातं. ते हिंदू आणि शिख अशा दोन्ही धर्माचं पालन करतात. सकल हिंदू समाजाप्रमाणे या संप्रदायातील साधूही विविध व्रत आणि उत्सव साजरे करतात. ते देश-विदेशात भारतीय संस्कृतीचा प्रसार करतात.
कुंभ मेळाव्यादरम्यान उदासीन संप्रदायातील श्री पंचायती आखाडा नया उदासीन या आखाड्यामध्ये दर दिवशी हजार लोकांसाठी लंगरची सुविधा दिली जाते. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर आणि संतांच्या प्रवचनाचं आयोजन केलं जातं.