महाकुंभ मेळाव्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘मौनी अमावस्या’. या दिवशी पवित्र संगमामध्ये स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे गेल्या दोन – तीन दिवसांपासून प्रयागराजमध्ये अलोट गर्दी झाली आहे. भक्तगणांच्या नोंदीसाठी, सुरक्षेसाठी, परिसरातील स्वच्छतेसाठी तंत्रज्ञानाचाही उत्तम उपयोग या महाकुंभ मेळाव्यामध्ये केला आहे. अशा या टेक्नोसेव्ही महाकुंभ मेळाव्याचा थेट अंतराळातून घेतलेला फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धार्मिक उत्सवाचे क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफी
महाकुंभ मेळावा हा धार्मिक आध्यात्मिक मेळावा आहे. या मेळाव्याच्या आयोजनासह अनेक छोट्या – मोठ्या गोष्टी आहेत ज्या पर्यटकांसह विविध क्षेत्रातील लोकांना आकर्षित करत असते. या मेळाव्यातील साधू-संतांच्या मिरवणुका, संगमावर पवित्र स्नान करणारे साधूगण, भाविक, विविध उपक्रम, विविध समुदायातील साधूंचे वेष अशा अनेक गोष्टी कॅमेरामध्ये टिपण्यासाठी सुद्धा फोटोग्राफर्सची गर्दी प्रयागराजला झाली आहे.
प्रयागराजचा हा संपूर्ण परिसर, त्यातील विविध रंग हे एका फोटो मध्ये जतन करणं कठीण आहे. मात्र हा सगळा परिसर रात्रीच्या वेळी कसा रोषणाई मध्ये न्हाऊन निघाल्याचा अंतराळातून घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला आहे.
नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी अंतराळातून प्रयागराजचा फोटो घेतला आहे. त्यांनी हा फोटो आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वरुन हा फोटो घेतला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “गंगा नदीच्या तीरावरील महाकुंभ मेळाव्याचा आयएसएसमधून घेतलेला फोटो. जगातल्या सगळ्यात मोठ्या जनसमुदयांचा सहभाग असलेला हा मेळावा रोषणाई मध्ये उजळून निघाला आहे.”
2025 Maha Kumbh Mela Ganges River pilgrimage from the ISS at night. The largest human gathering in the world is well lit. pic.twitter.com/l9YD6o0Llo
— Don Pettit (@astro_Pettit) January 26, 2025
मौनी अमावस्ये निमित्त महासुरक्षा
मौनी अमावस्येनिमित्त कोट्यावधी लोक प्रयागराजमध्ये असणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसरात कोणतीही चुकीची घटना घडू नये यासाठी पोलिस, सुरक्षा रक्षक आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा पुरवली जात आहे. नदी मार्गातून सुरक्षेसाठी साध्या बोटी, रॉकेट आणि रेस्क्यू बोटी तैनात केल्या आहेत.
प्रयागराजचा संपूर्ण परिसर हा नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या परिसरातल्या हवाई क्षेत्रातून कोणतेच विमान, हेलिकॉप्टर जाणार नाही. ड्रोन कॅमेऱ्यांवरी बंदी घातली आहे. जर कोणता ड्रोन कॅमेरा उडताना दिसला तर तो लागलीच निष्क्रिय करण्यासाठी अँटी ड्रोन सिस्टीम सज्ज ठेवली आहे.
त्याचबरोबर येणाऱ्या सर्व भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी व चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी टीथर ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
हे ही वाचा : महाकुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा आणि सोयीसाठी नवे उपाय
भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलिस ठाणे
महाकुंभ मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांसोबत कोणतीही दुर्घटना घडू नये, त्यांच्या वस्तुंची चोरी होऊ नये, त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक पोलिस प्रशासन पूर्ण सतर्क आहे. पोलिस प्रशासनाकडून संपूर्ण परिसराचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सूचना फलक आहेत. शिवाय ठिकठिकाणी पोलिस चौक्या उभारल्या आहेत. जेणेकरुन कोणताही भाविक हरवू नये, त्यांना लागलीच मदत मिळावी म्हणून पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहे. परिसराच्या प्रवेशद्वारावर संशयित वाहनं आणि लोकांची वेगवेगळ्या प्रकारे तपासणी केली जात आहे.
याशिवाय टीथर ड्रोन आणि एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेराच्या माध्यमातून परिसरावर देखरेख केली जात आहे.