बुधवारी 29 जानेवारीच्या पहाटे प्रयाग संगमावर मौनी अमावस्येनिमित्त भाविकांच्या प्रचंड संख्येमुळं चेंगराचेंगरी झाली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
मौनी अमावस्येचे अमृत स्नान हे महाकुंभमध्ये खूप विशेष मानलं जातं. त्यामुळे प्रयागराज संगमावर स्नानाकरता दहा कोटी भाविक जमण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार भाविक येतही आहेत. मंगळवारी रात्रीपासून संगमावर प्रचंड गर्दी जमायला सुरूवात झाली होती. देश आणि जगभरातून भाविक इथं जमले आहेत. काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार या प्रचंड गर्दीत काही महिलांना गुदमरण्यासारखं व्हायला लागलं. संगमावर उभारण्यात आलेले संरक्षक कठडे गर्दीच्या दबावामुळे तुटले. आणि एकदम घबराट पसरून लोकं मिळेल तिथे जाण्याचा प्रयत्न करू लागले. यात धांदलीत लोक एकमेकांवर पडू लागले. यात सकाळी 11 वाजेपर्यंत 17 जणांचा मृत्यू आणि जखमींचा नेमका आकडा समजला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
संन्यासी जनांचे शाही स्नान रद्द
मौनी अमावस्येच्या दिवशी सर्व संन्यासी आपापल्या आखाड्याच्या क्रमानुसार संगमावर शाही स्नान करतात. संन्यासीजनांचे शाही स्नान झाल्यावर इतर भाविकांना स्नानाकरता संगमात जाता येते. यंदा अमाप गर्दी लक्षात घेऊन संन्यासीजनांचे स्नान पहाटे चार वाजता आणि त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास भाविकांकरता स्नानाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्याआधीच रात्री दोनच्या सुमारास झालेली चेंगराचेंगरी लक्षात घेता, आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी मोठ्या प्रमाणातील गर्दी लक्षात घेता संन्यासीजनांचे मौनी अमावस्येचे शाही स्नान रद्द करत असल्याची घोषणा केली. मात्र, सकाळी साडेनऊच्या सुमारास मर्यादित स्वरुपात शाही स्नान करत असल्याची माहिती, आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली. यापुढील शाही स्नान वसंत पंचमीला असेल. ठरल्यानुसार महानिर्वाणी आखाडा आणि अटल आखाडा हे दोन्ही आखाडे मिरवणुकीनं पीपा पूल ओलांडून पुढं येत होते. मात्र रात्री दोनच्या सुमारास चेंगराचेंगरीची बातमी आली. आणि या दोन्ही मिरवणुका रामघाटाहून परतल्या होत्या.
उपचाराकरता आणि खबरदारी
जखमींना मेळाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. पोलीस आणि स्वयंसेवकांकडून जखमींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपर्कात असून बचावकार्याची माहिती घेत आहेत.
अमृतस्नान
महाकुंभच्या दरम्यान 6 दिवस हे शाही स्नानाकरता विशेष महत्त्वाचे आहेत. त्यातील एक दिवस म्हणजे मौनी अमावस्या. या आधी 13 जानेवारी आणि 14 जानेवारी या दोन दिवशी शाही स्नान झाले होते. 29 जानेवारीला तिसरे शाही स्नान होते. मौनी अमावस्येच्या शाही स्नानाला अमृत स्नानाचा दर्जा आहे. त्याकरता देशातूनच नाही तर परदेशातूनही भाविक प्रयागमध्ये आले आहेत. मौनी अमावस्येच्या शाही स्नानाकरता भाविक 26-27 जानेवारीपासून प्रयागमध्ये तळ ठोकून आहेत.