गणपतीच्या विविध नावाची उत्पती आणि त्याचा अर्थ

Ganeshotsav : गणपती बाप्पा यामध्ये गणपती या शब्दामध्ये गण आणि पती असे दोन शब्द आहेत. यापैकी पति या शब्दाचा अर्थ पालन असा होतो. तर गण या शब्दाचे विविध अर्थ सांगितले जातात. याशिवाय गणेशजींना चिंतामणी, वक्रतुंड, एकदंताय अशा विविध नावांनी संबोधलं जातं.
[gspeech type=button]

गणपती या शब्दामध्ये गण आणि पती असे दोन शब्द आहेत. यापैकी पती या शब्दाचा अर्थ पालन असा होतो. तर गण या शब्दाचे विविध अर्थ सांगितले जातात. याशिवाय गणपतीला चिंतामणी, वक्रतुंड, एकदंत अशा विविध नावांनी संबोधलं जातं. आज आपण ही विविध नावं आणि त्याचे अर्थ जाणून घेऊयात. 

‘गण’ या शब्दाचा अर्थ 

महर्षी पाणिनी यांनी ‘गण’ या शब्दाचा अर्थ ‘अष्टवसूंचा समूह’ असा सांगितला आहे. वसु म्हणजे दिशा, दिक्पाल किंवा दिक्देव. गणपति हा दिशांचा पती, स्वामी आहे. त्याच्या परवानगीशिवाय इतर देवता कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत. म्हणूनच कोणतेही मंगल कार्य किंवा इतर देवतेची पूजा करताना प्रथम गणेशपूजन केलं जातं. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती तिथे येऊ शकते. यालाच महाद्वारपूजन किंवा महागणपतीपूजन असं म्हटलं जातं.  

संस्कृतमध्ये, गण म्हणजे पवित्रक म्हणून गणपतीला पवित्रकांचा स्वामी संबोधलं जातं. 

तर निघंटुकोशानुसार, गण म्हणजे जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या तिर्यक् (रज) किंवा विस्फुटित (तम) लहरींचा समूहावर नियंत्रण ठेवणारा गणपती. 

वक्रतुंड 

सामान्यत: वक्रतुंड या शब्दाचा अर्थ वाकड्या तोडांचा, सोंडेचा असा काढला जातो. पण वक्रतुंड या शब्दाचा हा खरा अर्थ नाही. वक्रतुंड म्हणजे वक्र (चुकीच्या मार्गाने) चालणारे, बोलणाऱ्यांना शिक्षा करुन त्यांना सरळ मार्गाने आणतो तो वक्रतुंड. म्हणूनच ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड:’ अशी ओवी आहे.  तिर्यक् म्हणजे वाकड्या रज – तमात्कक 360 लहरींना सोंडेच्या माध्यमातून 108 लहरींप्रमाणे सरळ, सात्त्विक करतो त्यामुळे त्यांला वक्रतुंड म्हणून ओळखलं जातं. 

एकदंत, एकशृंग 

गणपतीचा एक सुळा अखंड आहे तर दुसरा अर्धा तुटलेला आहे. त्यामुळे एकदंत या नावाने संबोधलं जाते. हे एक ब्रह्माचं प्रतिक आहे. दंतीन हा शब्द दृ-दर्शयति म्हणजे दाखवणे या धातूपासून निर्माण झालेला आहे. ‘एक अशा ब्रह्माची अनुभूती येण्याची दिशा दाखवितो तो’, असाही याचा अर्थ होतो. 

लंबोदर 

लंबोदर हा शब्द लंब म्हणजे मोठे आणि उदर या दोन शब्दांनी निर्माण झालेला आहे. गणपती बाप्पाच्या गोल गरगरीत पोटावरुन हे नाव उच्चारलं जातं. 

भालचंद्र

भाल म्हणजे भुवयांच्या वरचा भाग म्हणजेचं कपाळ. विश्वाच्या निर्मितीवेळी प्रजापति, ब्रह्मा, शिव, विष्णु आणि मीनाक्षी यांच्या लहरी एकत्र येऊन ममता, क्षमाशीलता आणि वात्सल्य यांची जी एकत्रित अवस्था निर्माण झाली ती चंद्रमा म्हणून ओळखली जाते. अशा चंद्रमाला ज्याने भाली धारण केलं तो भालचंद्र असा विचार आहे. मुळात भालचंद्र हे शंकराचं नाव आहे. पण गणपती हा शंकराचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच नावाने गणपती बाप्पालाही संबोधलं जातं. 

विनायक

विनायक हा शब्द ‘विशेषरुपेण नायक:’ असा तयार झाला आहे. याचा अर्थ नायकाची म्हणजे नेत्याची, सर्व गुणवैशिष्ट्ये असलेला असा आहे. विनायकांची सहा ही संख्या सर्वमान्य आहे. मानवगृह्यसूत्र आणि बौधायनगृह्यसूत्र या सूत्रांमध्ये विनायकांची माहिती दिलेली आहे. यानुसार, विनायकगण विघ्नकारी, उपद्रवकारी आणि क्रूर असा आहे. त्याचा उपद्रव सुरू झाला की माणसं वेड्यासारखी वागायला लागतात. त्यांना वाईट स्वप्न पडतात, मनात सतत भिती राहत. या विनायकगणांची बाधा नष्ट होण्यासाठी धर्मशास्त्रात अनेक शांतीविधी सांगितलेले आहेत. गणपती हा विनायक म्हणजेच या विनायकांचा अधिपती आहे, म्हणून त्याला विनायक नावाने संबोधलं जातं. 

मंगलमूर्ती

मं म्हणजे परिपूर्ण आणि ग्लु – गायते म्हणजे शांत किंवा पवित्र करणे. जे आतून आणि बाहेरून पवित्र करते ते मंगल असते. असं सगळं पवित्र करणारी मूर्ती म्हणजे मंगलमूर्ती. 

चिंतामणी

चिंतामणी हे गणपतीचं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा चिंतेच्या पाच भूमिका आहेत. त्यांना प्रकाशित करतो तो चिंतामणी होय. चिंतामणीच्या भजनाने चित्तपंचकाचा नाश होऊन पूर्ण शांतीचा लाभ होतो. हे स्पष्टीकरण मुद्गलपुराणामध्ये दिलेली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Ganeshotsav : मुंबई पुणे शहराप्रमाणे मराठवाड्यातही सार्वजनिक गणोशोत्सव भव्य दिव्य रुपात साजरा केला जातो. तरिही इथल्या घराघरामध्ये साधेपणानेच गणेशोत्सव साजरा
Ganeshotsav : मत्सरासूर, दंभासूर, क्रोधासूर, कामासूर, लोभासूर आणि मदासूर हे मानवी अंतःकरणातील षड्रीपू आहेत. या मानवी गुणांवर कशी मात करावी
Ganeshotsav : गणपतीला दुर्वांचाच हार का घालतात, सिंहही गणपतीचं वाहन आहे पण मग उंदीरचं का सतत दाखवला जातो? जास्वंदाचं फूलचं

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ