भारतीय सिनेमाची मुर्हूतमेढ रोवली ती दादासाहेब फाळके यांनी. ‘राजा हरिश्चंद्र’ या सिनेमाच्या माध्यमातून भारतीय सिनेसृष्टीला सुरूवात झाली. या सिनेमाची निर्मिती आणि निर्मितीकार दादासाहेब फाळके यांना भारतीय सिनेसृष्टीचं आदराचं स्थान आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार ही दिले जातात. पण इतक्या मोठ्या सिनेमाची निर्मिती त्यांना एकट्याने करणं शक्य होतं का? साहजिकच आहे याचं उत्तर नाही असंच आहे. तर भारतातल्या या पहिल्या सिनेमा निर्मितीमध्ये दादासाहेब फाळके यांना मोलाची मदत केली त्या होत्या त्यांच्या पत्नी सरस्वती फाळके.
तंत्रज्ञ म्हणून कार्यरत
एका यशस्वी पुरूषाच्या पाठिशी एक स्त्री खंबीरपणे उभी असते. ती स्त्री वेगवेगळ्या पद्धतीने जसं की, मानसिक आधार देणं, तब्येतीची काळजी घेणं, अन्य जबाबदाऱ्या एकटीने सांभाळणं अशा नानाविध मार्गाने पाठिंबा देत असते. पण सरस्वती फाळके यांनी केवळ अशा सहाय्यक स्वरुपाची मदत केली नाही तर प्रत्यक्षात सिनेमा निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञ म्हणून काम करत सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेत हिरीरीने भाग घेतला आहे.
राजा हरिश्चंद्र या सिनेमाचं श्रेय फक्त दादासाहेब फाळके यांना एकट्यानाच दिलं जातं. जरुर, सिनेमाची कल्पना, त्यासाठी लागणारी बरीचशी मेहनत ही दादासाहेबांनी घेतली होती. पण त्यांच्या पत्नी सरस्वती यांनीही संपूर्ण सिनेमा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे.
पहिल्या महिला एडिटर
सरस्वतीबाई फाळके यांनी चित्रपट तंत्रज्ञान आणि संपादन – एडिटिंग क्षेत्रात काम केलं आहे. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला चित्रपट तंत्रज्ञ ठरल्या आहेत. त्यांनी त्याकाळी एडिटिंग हा विषय शिकून घेऊन स्वत: हाताने एक एक फ्रेमची जोडणी केलेली आहे. एवढंच नव्हे तर सिनेमाच्या सेटवर नेपथ्याचे सेट, कलाकारांचे कपडे सांभाळणे अशी सगळी कामं केली आहेत.
चित्रपटासाठी आर्थिक मदत
सरस्वती फाळके यांनी आपले दागिने गहाण ठेवून चित्रपटासाठी आर्थिक मदत केली. ज्यामुळे दादासाहेब फाळके यांना चित्रपट निर्मितीचे त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले.
पुरुष कलाकारांना स्त्री भूमिका शिकवणे
‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटात स्त्री भूमिका करण्यासाठी पुरुष कलाकारांना त्यांनी स्त्रियांसारख्या भूमिका कशा कराव्यात, हे शिकवले. थोडक्यात त्यांनी एका दिग्दर्शकाची भूमिका, जबाबदारीही पार पाडली आहे.
पडद्यामागील आधारस्तंभ
दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासात सरस्वतीबाई यांनी मोलाची साथ दिली आणि त्यांच्याशिवाय चित्रपट निर्मिती शक्य झाली नसती असं म्हटलं जाते, यात तथ्यही आहे.