दिवाळी म्हणजे सगळ्या भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आकाशकंदील, पणत्या लावून रोषणाई करतात. खास दिवाळीचे पदार्थ-मिठाई बनवून आप्तेष्टांसह आस्वाद घेतला जातो. एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात आणि सुरू होणाऱ्या नवीन वर्षाचं अभिष्टचिंतन केलं जातं. पण महाराष्ट्रात या सगळ्याबरोबरच दिवाळीचा आनंद द्विगुणित करायला आणखी एक गोष्ट असते आणि जी फक्त महाराष्ट्रातच प्रचलीत आहे. ती गोष्ट म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने खास प्रकाशित होणारे ‘दिवाळी अंक’.
दुर्गापूजा की ख्रिसमस अंकाची मूळकल्पना?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही जशी महाराष्ट्राची खासियत त्याचप्रमाणे दिवाळी अंक ही सुध्दा महाराष्ट्राची विशेषता. 1909 मध्ये संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी आपल्या ‘मनोरंजन’ या मासिकाचा दिवाळी विशेषांक प्रकाशित केला आणि मराठी साहित्य-संस्कृतीला एक नवीन मोहोर आला. आता ही कल्पना मित्र यांना बंगालमधील दुर्गा पुजेनिमित्त निघणाऱ्या खास अंकांवरुन सुचली की इंग्रजीमध्ये ख्रिसमससाठी निघणाऱ्या स्पेशल इश्शूवरुन सुचली याचा वाद बाजूला ठेवून मनोरंजनच्या दिवाळी अंकामुळे मराठी नियतकालिकांच्या आणि एकूणच मराठी वाचन परंपरेच्या प्रवाहाला वेगळं वळण लाभलं हे मान्य करायला हवं.
दरवर्षी सातशे-आठशे दिवाळी अंक प्रकाशित
गेली 115 वर्षे मराठीत सातत्याने दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत. शंभर वर्षांपूर्वी प्रकाशित होणारा दिवाळी अंक आज जरी प्रकाशित होत नसले, तरीही दीपावली-80 वर्षे, नवल -71, हंस – 78, मेनका- 65, धनंजय – 64 हे आकडे सांगतात की, दिवाळी अंक ही जणू मराठी लेखक-प्रकाशक आणि वाचकांची सवय बनली आहे.
वाचकांचे प्रमाण आक्रसत असताना आणि मुद्रित साधनांवर डिजिटल साधनांची कुरघोडी मोठ्या प्रमाणावर झालेली असतानाही मराठीत सातशे-आठशे दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात ही गोष्ट नक्कीच दिलासा देणारी आहे. एकीकडे मराठी भाषा शिल्लक राहिल का ? आणि मराठीतले साहित्य हे नव्या पिढीला आकर्षित करायला कमी पडतंय का ? यावर घनघोर चर्चा सुरू असताना दिवाळी अंकांची परंपरा मात्र जोमाने सुरू आहे, हे पाहून मराठी भाषा आणि साहित्याविषयीचे निराशाजनक विचार तात्पुरते असल्याची खात्री पटते.
नव्या लेखकांची नवी फळी
दोन-तीन दशकांपूर्वी पु.ल.देशपांडे, शं.ना.नवरे, जयवंत दळवी, अरविंद गोखले, रमेश मंत्री, वि.आ. बुवा, द. मा. मिरासदार, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, आशा बगे, कुमुदिनी रांगणेकर, इंद्रायणी सावकार, गौरी देशपांडे अशा साहित्यिकांनी दिवाळी अंकातून वाचकांना दर्जेदार कथा-कादंबरी-ललित लेख याची मेजवानीच दिली. या साहित्यिकांच्या लेखनामुळेच माहेर, मेनका, प्रपंच, मानिनी, स्त्री, किर्लोस्कर, आवाज, दीपावली, मौज, मोहिनी, श्री दीपलक्ष्मी, चंद्रकांत, वसंत असे दिवाळी अंक वर्षानुवर्षे वाचकांच्या पसंतीला उतरले.
काळ बदलला,जीवनशैली बदलू लागली, मनोरंजनाची गंगा सुसाट (आणि फुकट ! )वाहू लागली. साहजिकच अनेक मराठी मासिकांचे महिन्याचे अंक बंद पडले. मात्र त्यांनी आपले दिवाळी अंक टिकवून ठेवले. बदलत्या काळाबरोबर नव्याने लिहिणाऱ्या लेखकांची नवीन फळी निर्माण झाली. त्यातलेही अनेक जण आता जुन्या पिढीत गणले जाऊ लागले आणि नवीन सहस्रकात ताज्या दमाचे नवीन लेखक पुढे सरसावले. काही नावं उदाहरणादाखल घ्यायची तर गणेश मतकरी, प्रणव सखदेव, प्रसाद कुमठेकर, मानसी होळेहोन्नूर, पंकज भोसले, श्रीकांत बोजेवार, किरण येले, डॉ.मुकुंद कुळे, अनिल साबळे, मेघश्री दळवी अशी काही नावं घेता येतील.
प्रिंट ते डिजीटल ते युट्यूब अंक
बदलत्या जमान्याचा परिणाम म्हणजे दिवाळी अंक आता मुद्रित माध्यमाची चौकट सोडून बाहेर पडू लागले आहेत. पद्मगंधा प्रकाशनातर्फे दरवर्षी पद्मगंधा आणि उत्तम अनुवाद हे दोन दर्जेदार दिवाळी अंक मुद्रित स्वरुपात प्रकाशित होतात. त्यात गेल्या वर्षीपासून ‘आभा’ या श्राव्य दिवाळी अंकाची भर पडली आहे. पद्मगंधा प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलवर या अंकाचे दृक श्राव्य भाग रसिकांना बघता-ऐकता येतात. समाज माध्यमांवरील समूह देखील दिवाळी अंकापासून दूर नाहीत.
फेसबुकवरील ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा इतिहास विषयक समूह गेली चार वर्षे डिजिटल स्वरुपात या समूहातर्फे दिवाळी अंक प्रकाशित करत आला आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे साधार लेख असल्यामुळे इतिहासप्रेमी वाचकांना ही पर्वणीच असते. या समूहाच्या पृष्ठावर अंकाची लिंक उपलब्ध करुन दिली जाते.
सगळ्यात आगळा वेगळा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो तो स्वागत थोरात यांच्याकडून, ‘स्पर्शज्ञान’ या नावाने. स्पर्शज्ञान या ‘ब्रेल लिपीतल्या’ पाक्षिकाचे संपादन आणि निर्मिती स्वागत थोरात करतात. त्याच पाक्षिकाचा हा ब्रेल लिपीत प्रकाशित होणारा अंक म्हणजे अनेक दृष्टीहिनांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळीचा ज्ञान दिवा म्हणता येईल.
अभिजात मराठीचा ओघ कायम ठेवुयात
मराठी वाचकांची दिवाळी प्रकाशमान करणाऱ्या आणि मराठी साहित्याची रांगोळी विस्तारत नेणाऱ्या दिवाळी अंकांविषयी खूप काही लिहिता येईल. विस्तार-भयास्तव थांबताना एका गोष्टीची आठवण करुन द्यावीशी वाटते. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मराठीला सरकार दरबारी मिळाला. आता ही अभिजातता टिकवणाऱ्या, भाषेचा ओघ अंखंडित ठेवणाऱ्या दिवाळी अंकांसारख्या उपक्रमांचे बळ आपणच वाढवले पाहिजे. मग या वर्षी किमान एक तरी दिवाळी अंक स्वतःसाठी आणि एक आपल्या वाचनवेड्या मित्राला भेट देण्यासाठी अवश्य घ्यावा.