घरात सण- उत्सव असो, पूजा असो की लग्नसमारंभ.. कोणताही सोहळा असो घराच्या उबंरठ्यावर आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावलंच जातं. पण तुम्हाला माहित आहे का, केवळ पद्धत म्हणून हे केलं जात नाही तर या आंब्यांच्या पानांपासून तयार केलेल्या तोरणाला शास्त्रिय कारण आहे.
प्रत्येक पुजेच्या वेळी आंब्यांच्या पानांना विशेष स्थान दिलेलं आहे. जाणून घेऊयात यामागचं योग्य वैज्ञानिक कारण काय आहे.
झाडापासून वेगळं झालं तरी ऑक्सिजन देणारं पान
आपल्याला माहीत आहे की, झाडं दिवसा कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडत असतात. झाडाचा हाच गुणधर्म आंब्याच्या झाडाचं पान शेवटपर्यंत पाळत असतो. आंब्याच्या झाडाचं पान जरी झाडापासून तोडून वेगळं केलं तरी तो निरंतर ऑक्सिजन सोडण्याची क्रिया करत असतो. याशिवाय या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक गुणधर्म असतात.
अशा या बहुगुणी पानाचं तोरण ज्यावेळी आपण लग्नसमारंभ, सोहळा, पुजेच्या वेळी घरात लावतो त्यावेळी त्याचा आपल्या नकळत खूप उपयोग होत असतो. घरातील सण-समारंभाच्या वेळी घरात पाहुण्यांची, मित्रपरिवारांची खूप गर्दी असते. अशावेळी घरात स्वच्छ हवा खेळती राहावी, घरातलं वातावरण शुद्ध, स्वच्छ राहावं यासाठी या आंब्यांच्या पानातून सतत बाहेर पडणारा ऑक्सिजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो.
सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक
आपल्या पुर्वजांनी आंब्यांच्या झाडाला आणि पानाला सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं आहे. आंब्यांचं पान हे शुद्धता, समृद्धी आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे अशी मान्यता दिलेली आहे.
आंब्याचे झाड भरपूर फळे देते आणि त्याची हिरवळ समृद्धी आणि वाढ दर्शवते. त्यामुळे लग्नसमारंभासारख्या मंगल कार्यांमध्ये हे प्रतीक वापरलं जाते.
हिंदू धर्मातचं नाही तर ख्रिस्ती धर्मातही आंब्यांच्या पानांच्या तोरणाला महत्त्व
अनेकदा अनेक रितीभातींचा धर्माशी संबंध जोडला जातो. मात्र, भारतीय संस्कृती म्हणून वैज्ञानिक गरजेतून अनेक पद्धती सर्वच धर्मात, समाजात रुढ असल्याचं पाहायला मिळते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्मिय लोकांच्या लग्नसोहळ्यामध्ये आंब्यांच्या पानांचं तोरण आणि केळ्यांच्या खांबांचे प्रवेशद्वार तयार करण्याची विशेष परंपरा आहे.
महाराष्ट्रातील वसई – विरार भागात राहणाऱ्या ख्रिस्ती समाजातील लग्नसोहळे हे शनिवारी संध्याकाळपासून सुरू होतात. शनिवारी सकाळी मंडप सजवण्याचा छोटा सोहळा असतो. या कार्यक्रमामध्ये शनिवारी सकाळी नातेवाईक आणि गावातील तरुण आणि पुरूष मंडळी लग्न असलेल्या व्यक्तिच्या घरी एकत्र जमतात. त्यानंतर शेतात जाऊन आंब्यांच्या झाडांची पानं आणि केळफूल असलेल्या केळ्यांचे खांब गाणी गात घरी आणले जातात.
त्यानंतर केळ्यांचे खांब हे मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधले जातात. तर आंब्यांच्या झाडांच्या पानांची तीन तोरणं केली जातात. एक तोरण हे नवरदेव वा नवरदेवीच्या घराच्या मुख्य दाराला लावलं जातं. दुसरं तोरण हे मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला जिथे केळीचे खांब बांधले जातात तिथे लावलं जातं. तर तिसरं तोरण हे गावाच्या वेशीवर बांबूची कमान करुन त्यावर लावलं जातं. रविवारच्या दिवशी नवरदेव जेव्हा नवरीला घेऊन वरात आणत असतो तेव्हा नवरीच्या गावाच्या वेशीला लावलेलं आंब्याचं तोरण हे खेचून घेऊन आणलं जातं. तर सोमवारच्या दिवशी नवरी मुलीला तिच्या माहेरची मंडळी घ्यायला येतात, त्यावेळी तेही नवरदेवाच्या गावाच्या वेशीवर लावलेलं आंब्यांच्या पानाचं तोरण खेचून मुलीच्या माहेरी घेऊन जातात. अर्थातच तोरण खेचून घेऊन जाण्याच्या पद्धतीला मनोरंजक करण्यासाठी विविध कृल्प्त्या केल्या जातात.