आसाम इथल्या जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव संरक्षक पौर्णिमा देवी बर्मन यांनी टाइम मासिकाने अलिकडेच ‘विमेन ऑफ द इयर 2025’ पुरस्काराने सन्मानित केलं. जगामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या सारस पक्ष्याच्या ‘हार्गिल’ प्रजातीचं त्या रक्षण करतात. या पक्ष्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्यासोबत स्थानिक महिलांना सोबत घेतलं आहे. पौर्णिमा या स्थानिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुद्धा कार्य करतात. पौर्णिमा देवी यांनी प्राणीमात्रांसाठी असलेली तळमळ आणि महिला सक्षमीकरण यांची सांगड घालत आपल्या कामाची दिशा ठरवली.
स्टॉर्क सिस्टर
पौर्णिमा देवी यांच्या आजीकडून त्यांना वन्यजीवाविषयीच्या आपुलकीचा वारसा मिळाला. पौर्णिमा देवी यांच्या आजींना पक्ष्यांविषयी खूप कुतूहल आणि प्रेम होतं. आजीकडूनच पौर्णिमा देवी यांनाही या पक्ष्यांची काळजी घेणं, त्यांच्याविषयी जाणून घेणं, निरीक्षण करण्याची गोडी लागली. यातूनच त्यांनी वन्यजीवांचं संरक्षण करण्याची प्रतिज्ञा करत हार्गिल सारस पक्षांचं संवर्धन करण्याचं ठरवलं. या हार्गिल सारस पक्षाला इंग्रजी भाषेमध्ये ‘ग्रेटर एडजुटेंट स्टॉर्क’ म्हणतात. या हार्गिल सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पौर्णिमा देवी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना ‘स्टॉर्क सिस्टर’ म्हणून ओळखलं जातं.

स्थानिकांमध्ये पक्षाविषयी जनजागृती
पौर्णिमा देवी यांचा जन्म आसाममधल्या कामरुप इथे झाला. गुवाहाटी विद्यापीठातून त्यांनी इकोलॉजी आणि वन्यजीवशास्त्रात स्पेशलायझेशन करत प्राणीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
सन 2007 मध्ये पौर्णिमा देवी याचं पीएचडीचं शिक्षण सुरू होतं. त्यावेळी त्यांनी एका व्यक्तीला त्यांच्या परिसरातील एका झाडावरचं हार्गिल सारस पक्ष्याचं घरटं पाडताना पाहिलं. त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी आपल्या पीएचडीच्या प्रबंधाचं काम थांबवत स्थानिक लोकांना पर्यावरणीय आणि पक्ष्यांच्या अस्तित्वाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहिम सुरू केली.

सारस पक्षाबद्दल स्थानिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. हार्गिल सारस हे दुर्मिळ प्रवर्गातून नामशेष प्रवर्गात जात असल्याचं पौर्णिमा देवी यांनी ‘इंटरनॅशनल यूनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ या संस्थेला पटवून दिलं.
हे ही वाचा : समाधानाच्या ‘इलेक्ट्रिक’ तारा
पक्षी संवर्धनासाठी महिला आर्मी
पौर्णिमा देवी यांनी ‘अरण्यक’ या वन्यजीव संरक्षण संस्थेमध्ये जीवशास्त्रज्ञ म्हणून काम केलं आहे. ‘विमेन इन नेचर नेटवर्क इंडिया’ या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर संस्थेमध्ये सारस, आयबिस, स्पूनबिल या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या समितीच्याही त्या सदस्या आहेत.

पक्षी संवर्धनासोबतच पौर्णिमा देवी या महिला सशक्तीकरणासाठी सुद्धा सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असतात. याच महिला शक्तीच्या जोरावर त्यांनी ‘हार्गिल आर्मी’ संघटना स्थापन केली आहे. या संघटनेमध्ये जवळपास 10 हजार महिला आहेत. गेल्या 16 वर्षापासून या सर्व महिलांच्या साथीने त्या हार्गिल पक्षाच्या रक्षणासाठी काम करतात.
ज्या झाडावर हार्गिल पक्ष्यांची घरटी आहेत, त्या झाडाचं या हार्गिल आर्मीद्वारे संरक्षण केलं जातं. तर काही झाडांवर आर्टिफिशियल घरटी ठेवलेली आहेत. जी पिल्लं घरट्यातून पडली आहेत त्यांच्यावर उपचार करुन त्यांची काळजी घेतली जाते. या पक्ष्यांची घरटी असलेल्या झाडांच्या आसपासच्या परिसरात जिथं जिथं पडीक जमीन होती, अशा 500 एकर जागेवर या आर्मीतर्फे वृक्षारोपण केलं आहे.
पक्षी संवर्धन कार्याचा गौरव
2017 मध्ये त्यांना भारत सरकारद्वारे ‘नारी शक्ती पुरस्काराने’ गौरविलं आहे. त्यांना युनायटेड किंगडमकडून ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून ओळखला जाणारा ‘व्हाईटली गोल्ड अवार्ड’ ने सन्मानित केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून त्यांना सर्वोच्च पर्यावरणीय पुरस्कार ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने गौरविलं आहे. तसेच नॅशनल जिओग्राफिक इंडिया चॅनलनेही त्यांच्यावर डॉक्युमेंटरी तयार केली आहे.

महिला सशक्तीकरणासाठी कार्य
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पौर्णिमा देवी या महिलांसाठी विणकाम कार्यशाळेचं आयोजन करतात. या कार्यशाळेतून महिलांना प्रशिक्षण दिलं जातं. पारंपारिक पद्धतीने आसामी गमछा (उपरण) आणि मेखला चादर (साडी) वर सारस पक्ष्यांचं चित्र रेखाटलेलं असतं. याद्वारे हार्गिल आर्मी संघटनेतल्या अनेक महिलांना रोजगार मिळत आहे.
