विदर्भाचे पर्यटन वैभव

गाविलगड, अमरावती
Vidarbha : वाकाटकांच्या ऐतिहासिक राजवटीपासून ते आधुनिक काळातील निजामशाहीपर्यंतचा इतिहास या विदर्भाला लाभला आहे. ब्रिटिशांच्या काळात ‘सेंट्रल प्रोव्हिन्स ॲन्ड बेरर’असा हा प्रांत होता. कालिदासाच्या ‘मेघदूता’पासून ते श्रीकृष्णाला पत्र पाठवून आपले हरण करण्यासाठी निमंत्रित करणाऱ्या रुख्मिणीपर्यंत अनेक भावमधूर आख्यानांची ही जन्मभूमी आहे.

आपल्या महाराष्ट्राची भौगोलिक ( आणि राजकीय सुध्दा ! ) विभागणी कोकण, देश, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा अशी केली जाते. या प्रत्येक भागाची काही नैसर्गिक-भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे हवामानापासून ते निसर्ग संपदेपर्यंत प्रत्येक भाग वेगळा, स्वतःचा स्वतंत्र चेहरा असलेला आहे. मात्र तरिही यातल्या काही भागांकडे पर्यटनाच्या बाबतीत विनाकारणच जरा जास्त दुर्लक्ष केलं गेलंय. अशा जरा मागे राहिलेल्या भागांमध्ये ‘विदर्भ’ आघाडीवर आहे म्हणता येईल. 

रुख्मिणी ते कालिदासच्या मेघदूताची जन्मभूमी 

वास्तविक वाकाटकांच्या ऐतिहासिक राजवटीपासून ते आधुनिक काळातील निजामशाहीपर्यंतचा इतिहास या विदर्भाला लाभला आहे. ब्रिटिशांच्या काळात ‘सेंट्रल प्रोव्हिन्स ॲन्ड बेरर’असा हा प्रांत होता. ज्यामध्ये आजच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, वऱ्हाड यांचा समावेश होता आणि या भागाची राजधानी नागपूर होती. विदर्भाला फार मोठा इतिहास आहे. मेघाला दूत करुन प्रिय पत्नीला संदेश पाठवणाऱ्या यक्षाची विरहव्यथा सांगणाऱ्या कालिदासाच्या ‘मेघदूता’पासून ते श्रीकृष्णाला पत्र पाठवून आपले हरण करण्यासाठी निमंत्रित करणाऱ्या रुख्मिणीपर्यंत अनेक भावमधूर आख्यानांची ही जन्मभूमी आहे.

संत्री आणि कापसासाठी प्रसिध्द असलेला विदर्भ झणझणीत आणि चटकदार सावजी जेवणासाठीही ओळखला जातो. मात्र पर्यटनाच्या संदर्भात विदर्भातील ताडोबा, नागझिरा, उमरेड-करहांडला, पेंच अशा व्याघ्र प्रकल्पांचाच बोलबाला भरपूर आहे. त्यामुळे त्याशिवाय जणू विदर्भात पर्यटनासाठी फार काही नाहीच अशीच समजूत झालेली पाहायला मिळते.

किचकवध आणि हिल स्टेशन चिखलदरा

उन्हाळ्यात वर वर चढणाऱ्या पाऱ्यासाठी प्रसिध्द असलेल्या विदर्भाच्या पदरात निसर्गानं एक लहानसं गिरीस्थान म्हणजे ‘हिल स्टेशन’ ही टाकलेलं आहे. हे ठिकाण म्हणजे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील ‘चिखलदरा’. विदर्भातील आकारानं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या अमरावतीला अकराव्या शतकापासूनचा इतिहास लाभलेला आहे. या शहरापासून साधारण तीन तासांच्या अंतरावर ‘चिखलदरा’ आहे. महाराष्ट्रातील माथेरान- महाबळेश्वर या हिल स्टेशन्स प्रमाणेच चिखलदऱ्याला ही प्रकाशात आणलं ते ब्रिटिशांनी. 1823 मध्ये हैद्राबाद रेजिमेंट मधील कॅप्टन रॉबिन्सन याने या 3898 फूटांवरील हिल स्टेशनचा शोध लावला असं मानलं जातं. या ठिकाणची गर्द वनराई पाहून या कॅप्टनला इंग्लंडमधली हिरवाई आठवली आणि त्याने या ठिकाणी भारताच्या गव्हर्नरचं निवासस्थान करावं असाही प्रस्ताव तेव्हा दिला होता. आता गोऱ्या साहेबाला कुठे माहिती होतं की त्याला ही जागा सापडायच्या आधीपासून म्हणजे महाभारत काळापासून ही जागा प्रसिध्द होती.

                                            चिखलदरा

या जागेबद्दलचा संदर्भ थेट महाभारतामधील किचक वधाशी आहे. अज्ञातवासात असताना पांडव विराट राजाच्या दरबारात आपलं खरं रुप दडवून राहात असतात. तेव्हा द्रौपदीवर वाईट नजर टाकणाऱ्या विराट सेनापती किचक याचा वध भीम करतो. त्यानंतर भीमाने इथल्याच दरीत किचकाचा देह भिरकावला होता आणि त्यामुळे या परिसराला ‘किचक दरा’ हे नाव मिळालं. काळाच्या ओघात त्याचं ‘चिखल दरा’ झालं असं मानलं जातं.

महाराष्ट्रातलं कॉफी प्लांटेशन

त्यामुळे चिखलदराच्या स्थळ दर्शनातही महाभारताचा संबंध असलेल्या जागा आहेत. इथलं भिमकुंड प्रसिध्द आहे, याच कुंडात किचकाचा वध केल्यानंतर भीमानं आंघोळ केली होती असं मानलं जातं. या कुंडाची खोली मोजता येत नाही अशी स्थानिकांची समजूत आहे. इतर कोणत्याही हिल स्टेशनप्रमाणे इथेही सन राइझ आणि सन सेट पॉइंट आहेतच. त्याचबरोबर भोवतालच्या परिसराचं रम्य दर्शन घडवणारे वैराट पॉइंट, हरिकेन पॉइंट, प्रॉस्पेक्ट पॉइंट, देवी पॉइंट, मोझारी पॉइंट असे इतर पॉइंटसही आहेत. आज चिखलदरा ओळखले जाते ते महाराष्ट्रातील एकमेव कॉफी प्लँटेशनसाठी. 

गाविलगडावरील पर्शियन शिलालेख

चिखलदऱ्याचे खास आकर्षण म्हणजे ‘गाविलगड’ हा भक्कम तटबंदी असलेला किल्ला. सन 1803 मध्ये हा किल्ला मराठ्यांकडून ब्रिटिशांनी जिंकला. या प्रदेशातील गवळ्यांचं ठाणं म्हणून या किल्ल्याला गवळी गड असं नाव होतं. त्याचं पुढे गाविलगड झालं.

15 व्या शतकात उभारलेल्या या किल्ल्यातील फतेह दरवाजा, दिल्ली दरवाजा, बारा दरवाजा, किचकदरा दरवाजा अशी ऐतिहासिक प्रवेशद्वारे आजही पाहायला मिळतात. तसेच या किल्ल्यावर पर्शियन भाषेतील काही शिलालेखही आहेत.

गाविलगड किल्ला चिखलदऱ्याच्या जवळ असला तरी येतो मेळघाट वनक्षेत्रामध्ये. कारण मेळघाटाचे जंगल चिखलदऱ्याला लागून पसरलेलं आहे. भारतातल्या पहिल्या नऊ प्रोजेक्ट टायगर्सपैकी एक म्हणजे मेळघाट टायगर रिझर्व्ह. मेळघाटच्या समृध्द अरण्यात भटकंती करायची असेल तर सिपना नदीकाठच्या सेमाडोह येथील वनखात्याच्या निवासस्थानात मुक्काम ठोकायचा.

इथे भोवतालच्या अरण्याचा परिचय करुन देणारे वन खात्याचे एक म्युझियमही आहे.

मेळघाटच्या अरण्यात पट्टेरी वाघाबरोबरच गवे, चितळ, भेकर, सांबर, कोल्हा, रानडुक्कर, वानरं, बिबट्या, फ्लाइंग स्क्विरल असे अनेक प्रकारचे वन्यपशू पाहायला मिळतात.

तर मग या पुढचा पर्यटनाचा बेत आखताना विदर्भातील या ठिकाणांचा अवश्य विचार करा आणि महाराष्ट्राचा वेगळा चेहरा बघण्याचा आनंद घ्या.

2 Comments

  • Shrirang Samant

    खूप छान आणि महितीपूर्ण लेख.

  • दीपक देशपांडे

    आता चिखलदऱ्यात अत्यंत दुर्मिळ गणेश मूर्ती चे संग्रहालय आहे. नक्कीच भेट द्यावी असे. भारतातील विविध प्रांतातील तसेच देश विदेशातील विविध देखण्या मूर्ती आहेत. श्री नंद यांनी ते उभारले आहे. प्रेक्षणीय आहेएकदा तरी पाहिलेच पाहिजे असे. You tube वर अधिक माहिती मिळेल ऑगस्ट सप्टेंबर मध्ये वातावरण थेट काश्मीर ची आठवण करून देणारे आहे. जरूर भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 Responses

  1. आता चिखलदऱ्यात अत्यंत दुर्मिळ गणेश मूर्ती चे संग्रहालय आहे. नक्कीच भेट द्यावी असे. भारतातील विविध प्रांतातील तसेच देश विदेशातील विविध देखण्या मूर्ती आहेत. श्री नंद यांनी ते उभारले आहे. प्रेक्षणीय आहेएकदा तरी पाहिलेच पाहिजे असे. You tube वर अधिक माहिती मिळेल ऑगस्ट सप्टेंबर मध्ये वातावरण थेट काश्मीर ची आठवण करून देणारे आहे. जरूर भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Perfumes : अत्तर म्हणजे तर हवाहवासा सुगंध. देवघरात दरवळणारा चंदनाच्या अत्तराचा गंध असो, किंवा आजी-आईच्या रेशमी साड्यांना येणारा जुन्या खस/हीना/केवड्याच्या
Diwali Magazines - दिवाळी म्हणजे सगळ्या भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये
Poetry : कविता वाचनाने सौंदर्यदृष्टी विकसित होते. कवितेतून आपण आपल्या सभोवतालचे सौंदर्य अनुभवू शकतो. कविता वाचल्याने समजून घेण्याची आणि विश्लेषण

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई : इलेक्शन फंडसाठी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या – आ. जितेंद्र आव्हाड