महाराष्ट्रातील गौरी मुखवट्यांची परंपरा

कोकणातील खड्यांची गौर, फुलांची गौर, तेरड्याची गौरसह मुखवट्याची गौर प्रसिद्ध आहे.
[gspeech type=button]

2009 साली पुराणातील ज्येष्ठा आणि कनिष्ठा या देवतांचा अभ्यास करताना, माझी गौरीव्रताशी तोंडओळख झाली. त्यानंतर मी दरवर्षी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये अभ्यासदौरे करत राहिले. पुराणांमध्ये आणि निबंधग्रंथांमध्ये सांगितलेल्या मूळ व्रतामध्ये ज्येष्ठादेवीची पूजा सांगितली आहे. पण सध्या महाराष्ट्रात हे व्रत विविध प्रकारे केले जाते. 

प्रांतावार फरक

कोकणातील खड्यांची गौर, फुलांची गौर, तेरड्याची गौर प्रसिद्ध आहेतच. पण याव्यतिरिक्त क्वचित गौरीचे चित्रही काढले जाते. सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ती म्हणजे मुखवट्याची गौर. देशावर ज्येष्ठागौरीसोबतच कनिष्ठा गौरीचीही केवळ मुखवट्यांच्या रूपात पूजा केली जाते. इथं त्या महालक्ष्म्या म्हणून प्रसिद्ध आहेत. गौरीपूजनाशी संबंधित परंपरा आणि चालीरीतींचा अभ्यास करताना माझे लक्ष मुखवट्यांच्या वैविध्याकडे गेले. पुढे 2017 साली भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे गौरी मुखवट्यांच्या परंपरेचे दस्तऐवजीकरणासाठी मला शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीदरम्यान गौरी मुखवट्यांचा केलेल्या अभ्यासातील काही मुद्दे मी इथं मांडत आहे.

मुखवट्यांचे वर्गीकरण 

कोकणात आणि देशावर गौर बनवण्यासाठी मुखवट्यांचा वापर केला जातोहे मुखवटे टेराकोटा, माती, प्लास्टर, लाकूड किंवा धातू यांसारख्या सामग्रीपासून तयार केले जातात. आतून पोकळ असल्याने त्यांना साडी आणि दागिन्यांनी सजवलेल्या धडावर ठेवतात. अशाप्रकारे गौरीची पूर्ण प्रतिमा तयार केली जाते. व्रतादरम्यान केले जाणारे सर्व पूजा-उपचार ह्या मुखवट्यांवरच केले जातात. देशावर मुखवट्यांच्या हावभावांवरून ज्येष्ठा आणि कनिष्ठांमधील फरक ओळखला जातो. यातून व्रतामध्ये मुखवट्यांना असलेले महत्व लक्षात येते. विधीमध्ये वापरल्या जाणा-या मुखवट्यांचे डेव्हिड शुलमन आणि डेबोराह तियागराजन यांनी प्रतीकात्मक, अभिव्यक्त आणि प्रदर्शनात्मक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे. गौरी पूजनामध्ये वापरल्या जाणाऱ्या मुखवट्यांना प्रतिकात्मक महत्व आहे.

भांड्यांवरच नाक, डोळे काढून बनवलेला मुखवटा

घागरींच्या उतरडींवर गौर

सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे मुखवटे उपलब्ध आहेत आणि ते बनविण्याचे तंत्र दर दिवशी प्रगत होत आहे. पण फार पूर्वी व्रताचे स्वरूप नक्की कसे होते, मुखवटे कसे बनविले जात, याबद्दल नक्कीच आपल्या मनात कुतूहल निर्माण होते. याचे उत्तर सरोजिनी बाबरांच्या लिखाणात आढळते.

पूर्वी मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यालाच नाक, डोळे काढून मुखवटा बनविला जायचा आणि घागरींच्या उतरंडीवर ठेवून गौरी मांडल्या जायच्या. कालौघात मुखवटा बनविण्याचे तंत्र जरी विकसित झाले असले आणि बाजारात विविध प्रकारचे मुखवटे उपलब्ध असले, तरीही ही जूनी पद्धत अजूनही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचलित आहे. 

‘महालक्ष्म्या लिहिणे’ प्रथा

वाई आणि परिसरात तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांवर गौर रंगवण्याची परंपरागत प्रथा, विधीचा एक भाग म्हणून अजूनही टिकून आहे. हा विधी ‘महालक्ष्म्या लिहिणे’ ह्या नावाने प्रचलित आहे. मुखवट्यांच्या जुन्या परंपरांचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रथांचा मला फार उपयोग झाला. अशाच प्रकारे एका वर्षी मी पुण्याच्या नदीपात्रात गौरी विसर्जनाचे दस्तऐवजीकरण करीत फिरत होते. त्यावेळी एका विशेष प्रकारच्या मुखवट्यांकडे माझे लक्ष गेले. मातीच्या सुगडावर अतीशय रेखिव पद्धतीने गौरी रेखाटल्या होत्या. विचारपूस केल्यानंतर त्या प्रसिद्ध चिंटूकार चारुहास पंडितांच्या बायकोच्या माहेरच्या आहेत असे कळले. पुढच्यावर्षी मी भाग्यश्री पंडितांच्या घरी त्यांच्या गौरींच्या अभ्यासासाठी पोहोचले. त्यांच्या माहेरीही हीच महालक्ष्म्या लिहिण्याची पद्धत आहे. फक्त तांब्या किंवा पितळेच्या भांड्याऐवजी, मातीची सुगडं रेखाटली जातात, आणि पूजेनंतर त्यांचे विसर्जन केले जाते. भाग्यश्री पंडित जात्यात कलाकार असल्याने त्या दरवर्षी मुखवटे त्यांच्या शैलीत रंगवतात.

गौरी मुखवट्यांवर शिष्यवृत्ती

या शिष्यवृत्तीदरम्यान मी राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली, राजा दिनकर केळकर संग्रहालय पुणे, झपूर्झा संग्रहालय पुणे आणि उल्हास वस्तुसंग्रहालय टिटवाळा येथे भेटी दिल्या. या संग्रहालयात जतन केलेल्या एकूण 47 मुखवट्यांचा अभ्यास केला. आधी म्हटल्याप्रमाणे मला चारही संग्रहालयात विविध सामग्रींपासून तयार केलेले मुखवटे जतन केलेले आढळले.

राष्ट्रीय संग्रहालयातील गौरीचा मुखवटा

व्यावसायिकरणात हरवलेले पारंपरिक रुप

राजा दिनकर केळकर संग्रहालयात एक सावंतवाडी शैलीत बनवलेला लाकडी मुखवटा जतन केलेला आहे. मुखवट्याच्या चेहऱ्याची ठेवण मराठी पद्धतीची होती. कपाळावर चंद्रकोरीचे गोंदण आणि केसांचा खोपा घातलेला आहे. अतिशय सुबक पद्धतीने बनविलेला हा मुखवटा संग्रहालयामध्ये आपले लक्ष वेधून घेतो. त्यानंतर मी गौरीचे लाकडी मुखवटे पहाण्यासाठी सावंतवाडीला भेट दिली. लाकडाच्या वस्तू बनविण्याची कला सावंतवाडीमध्ये व्यावसायिक पद्धतीने सुरु आहे. स्थानिक राजघराणे ह्या कलेचे जतन करण्यासाठी प्रोत्साहनही देत आहे. सावंतवाडीतील चितार आळीतील प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये गौरींचे मुखवटे फार आढळले नाहीत. गौरी व्रताच्या हंगामात मुखवटे मिळतात असे मला सांगण्यात आले. एका दुकानात गौरीचा मुखवटा आढळला, पण तो केळकर संग्रहालयातील मुखवट्यापेक्षा फारच वेगळा होती. व्यावसायिकीकरणादरम्यान मुखवटा बनविण्याच्या जुन्या पद्धतींचा आणि शैलींचा वापर सध्या केला जात नाही, असे मला आढळले. 

कर्नाटकातील किन्नळ शैलीतील मुखवटे

पुण्यातील झपूर्झा संग्रहालयात असाच एक किन्नळ शैलीतील लाकडी मुखवटा जतन केलेला आहे. किन्नळ कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पु.ना.गाडगीळ अँड सन्सचे श्री. अजित गाडगीळ यांनी एक उपक्रम हाती घेतलेला. या उपक्रमादरम्यान एका कलाकाराने हा मुखवटा घडविला आहे. त्यामुळे तो किन्नळ कलेच्या नवीन शैलीत उपलब्ध आहे. उत्तर कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील किन्नळ गावावरून या कलेला हे नाव पडले आहे. किन्नळ कला विविध देवांच्या लाकडी मूर्ती बवविण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या अनुषंगानेच किन्नळ शैलीतील गौरीचे मुखवटे कर्नाटक राज्याच्या उत्तर भागात प्रसिद्ध आहेत. व्रतादरम्यान बाजारपेठांमध्ये  विक्रीस उपलब्ध होतात.

कांस्यच्या भांड्यावर कोरलेले गौरचे मुखवटे

लोकप्रिय मुखवटे

बाजारपेठांमध्ये आणि पूजेत विशेष लोकप्रिय असलेला मुखवट्यांचा प्रकार म्हणजे, पितळी मुखवटे. हे मुखवटे ओतीव तंत्र वापरून बनवले जातात. सर्वसाधारणपणे पितळी म्हणून प्रसिद्ध असले तरी यांत कांस्य आणि पितळ असे दोन प्रकार आढतात. संग्रहालयांमध्ये पितळी मुखवट्यांचे विविध प्रकार जतन केलेले आहेत. कांस्य आणि पितळ या दोन प्रकारांसोबतच केळकर संग्रहालयांमध्ये तांब्याचे मुखवटे सुद्धा जतन केलेले आहेत. संग्रहालयांमध्ये जतन केलेल्या सर्व जुन्या मुखवट्यांचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की, मूळ भांड्याला मुखवट्यांमध्ये रूपांतरीत केले आहे. यासर्व मुखवट्यांच्या चेहेरेपट्टी, अलंकरण आणि कुंकवाचा प्रकार यात वैविध्य आढळते. 

उत्तर भारतीय शैलीचे मुखवटे

राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे मातीचे मुखवटे जतन केलेले आहेत. संग्रहालयाच्या नोंदीनुसार ते गौरींचे मुखवटे असून उत्तरप्रदेशातील आहेत. शैलीचा विचार केल्यास ते उत्तरभारतीय बनावटीचेही आहेत असे दिसून येते. तांत्रिकदृष्ट्या हे  गौरींच्या मुखवट्यांसारखेच दिसतात आणि त्यांची संग्रहालयांमध्ये नोंदही गौरीचे मुखवटे अशीच आहे. पण तरीही उत्तरप्रदेशात त्यांचा वापर नक्की कसा आणि कशासाठी केला गेला असेल हा प्रश्न मला पडला. 

वाराणसीत स्थायिक मराठी कुटुंबं

अभ्यासांतर्गत असे लक्षात आले की, काही मराठी कुटुंबे फार पूर्वी वाराणसीत जावून स्थायिक झालेली आहेत. स्थानिक संस्कृतीशी ही कुटुंबे एकरूप झाली असली, तरी त्यांनी त्यांची व्रत-वैकल्ये आणि पद्धती सुरु ठेवल्या. राष्ट्रीय संग्रहालयांमध्ये जतन केलेल्या मातीच्या मुखवट्यांसारखेच मुखवटे मला वाराणसीत स्थायिक झालेल्या कुटुंबातील गौरीपूजनात आढळले. गरजेनुसार वाराणसीत स्थायिक झालेल्या कुटुंबांनी स्थानिक कारागिरांकडू्न मुखवटे बनवून घेण्यास सुरुवात केली. आणि अशा प्रकारे गौरी मुखवट्यांचा एक वेगळा प्रकार मला राष्ट्रीय संग्रहालयात पहायला मिळाला.

2 Comments

  • प्रदीप वर्मा

    लेख माहिती पूर्ण आहे. वाराणाशीच्या भारत कला संग्रहालयात पूर्वी मुखवटे होते

    • Tanashree Redij

      मी नक्की पाहीन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 Responses

  1. लेख माहिती पूर्ण आहे. वाराणाशीच्या भारत कला संग्रहालयात पूर्वी मुखवटे होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

छत्रपती शिवराय: इ. स. 640 नंतर तत्कालीन हिंदुस्थानवर मुस्लिम आक्रमणे सुरू झाली. धर्मविस्तार आणि इथल्या संपत्तीची लूट इतकाच उद्देश घेऊन
वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ