सिरीयामध्ये सुरू असलेल्या नागरी युद्धातून 75 भारतीय नागरिकांची सुटका करून त्यांना मायदेशी सुखरूप परत आणण्यात आलं आहे. रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सिरीयातील बंडखोरांनी सिरीयाच्या राजधानीचे शहर दमास्कासवर आक्रमण करत शहर ताब्यात घेतलं. राष्ट्राध्यक्ष बाशर अल – असाद यांनी कुटुंबियांसह रशियाला पलायन केलं. या घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सिरीयामध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस सुरू आहे. या सर्व परिस्थितीतून भारत सरकारने सिरीया मध्ये वास्तव्यास असलेल्या 75 भारतीय नागरिकांची सुटका केली आहे.
भारत सरकारने बैरूत आणि दमास्कास येथे असलेल्या भारतीय दुतावासाच्या मदतीने या भारतीय नागरिकांची माहिती मिळवून त्यांना सुखरूपपणे मायदेशी आणलं आहे. सिरीयातल्या सायदा झैनाब येथे अडकलेल्या जम्मू-काश्मिर येथल्या 44 झहरीन नागरिकांचा समावेश आहे. सिरीयामध्ये आणखीनही भारतीय अडकलेले आहेत, त्यांना भारतीय दुतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, सिरीयामध्ये गेल्या 50 वर्षापासून बाशर अल – असाद कुटुंबाची सत्ता होती. या सत्ताकाळातल्या गेल्या 14 वर्षापासून सिरीयामध्ये नागरी युद्ध सुरू होते. या युद्धकाळात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.
रविवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी बंडखोर विरोधकांचा पक्ष हयात ताहिर अल-शेम पक्षाने राजधानी दमास्कास वर हल्ला करत सत्तेची सूत्रे हाती घेतली. आणि गेल्या 50 वर्षापासून सुरू असलेली राजेशाही सत्ता संपुष्टात आणली. सध्या मोहम्मद अल-बाशिर यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आलं आहे.