एआय.. कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवनवीन आविष्काराबद्दल आपण दररोज ऐकत असतो. एआय या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये दररोज बदल घडत आहेत. एखादा बदल आपण अंगवळणी पडून घेत नाही तोवर नवीन काहितरी ऐकायला, पाहायला मिळतं. वैद्यकीय क्षेत्रातही एआय तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. याचे अनेक उदाहरणे आपण ऐकत असतो. यात आता भर पडली आहे ती एआय स्टेथोस्कोपची. जाणून घेऊयात काय आहे हा एआय स्टेथोस्कोप आणि नेमका कसं काम करणार आहे?
स्टेथोस्कोपचा उगम
सन 1816 मध्ये स्टेथोस्कोपची निर्मिती झाली. या स्टेथोस्कोपचा मूळ वापर हा आपला हृदयाचे ठोके मोजण्यासाठी, हृदयाची गती तपासण्यासाठी केला जातो. तुम्ही डॉक्टर होताच तुमच्या हातात सगळ्यात पहिल्यांदा स्टेथोस्कोप दिला जातो. वैद्यकीय क्षेत्रातलं हे महत्त्वपूर्ण मूलभूत टूल आहे. याच स्टेथोस्कोपचं आता एआय स्टेथोस्कोपमध्ये रुपांतर केलं आहे.
इंपीरियल कॉलेज लंडन आणि इंपीरियल कॉलेज हेल्शकेअर एनएचएस ट्रस्ट यांनी एकत्रितरित्या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत अत्याधुनिक असं एआय स्टेथोस्कोप तयार केला आहे.
एआय स्टेथोस्कोपचा उपयोग
एआय स्टेथोस्कोपच्या साहय्याने अवघ्या काही मिनिटात आपल्याला हृदयाशी संबंधित तीन गंभीर आजारांची माहिती मिळू शकते. हे स्टेथोस्कोप खेळण्यातील पत्त्यांच्या आकाराचा आहे. या टूलला रुग्णाच्या छातीवर ठेवून हृदयाची गती तपासली जाते. त्यातून ईसीजी रेकॉर्ड केला जातो. तर या टूलला असलेल्या मायक्रोफोनने हृदयातून वाहणाऱ्या रक्ताचा आवाज रेकॉर्ड केला जातो. यातून मिळालेली माहिती विश्लेषणासाठी एआय एल्गोरिदमच्या माध्यमातून क्लाऊडला पाठवली जाते. तिथे या माहितीचं तात्काळ विश्लेषण होऊन त्यांचे रिपोर्ट त्याच स्मार्टफोनवर पाठवले जातात.
अशा पद्धतीने रुग्णाला हृदयरोगाशी संबंधित हार्ट फेल्यूयर, हार्ट वाल्वची स्थिती आणि अब्नॉर्मल हृदयाची गती याची काही क्षणात माहिती मिळते.
सामान्य आणि एआय स्टेथोस्कोपमधला फरक
सामान्यत: डॉक्टरांकडे आता वापरात असलेल्या स्टेथोस्कोपच्या साहय्याने हृदयाचे ठोके, गती तपासली जाते. पण या एआय स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना सामान्य स्टेथोस्कोपमधून जे ऐकू येऊ शकलं नाही इतक्या बारीक आवाजातील ठोके त्यातील गती याची माहिती घेऊन विश्लेषण करता येते. ही तपासणी करत असतानाच तात्काळ ईसीजीही केला जातो. त्यामुळे जर एखादा रुग्ण हृदय रोगा संदर्भात गंभीर स्थितीत असेल तर त्याचं तातडीने रोग निदान करता येऊ शकते. जलदगतीने तपासणी झाल्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करून त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळतं.
इंपीरियल कॉलेज हेल्शकेअर एनएचएस ट्रस्टचे डॉक्टर पॅट्रीक बैच्टिगर यांनी प्रतिक्रिया दिली की, एआय स्टेथोस्कोप निर्माण करणं हा वैद्यकीय क्षेत्रातला मोठा शोध आहे. कारण याच्या साथीने अवघ्या 15 मिनीटामध्ये रुग्णाच्या हृदयरोगाची तपासणी करुन त्यांना उपचार दिले जाऊ शकतात.
तर अनेक हार्ट फेल्यूअर रुग्णांना अटॅक येतो, तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर त्यांना हृदयरोग असल्याचं समजते. काही वेळेला उपचारासाठी उशीर झालेला असतो. परिणामी रुग्णाचा मृत्यू होतो किंवा परिस्थिती आणखीन गंभीर होते. अन्य वेळी सामान्य स्टेथोस्कोपच्या साहय्याने सामान्य तपासणी करताना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची नेमकी माहिती, स्थिती समजत नाही. मात्र, या एआय स्टेथोस्कोपमुळे ही परिस्थिती बदलू शकते.
सामान्य फिजीशीयन सुद्धा या नावीन्यपूर्ण एआय स्टेथोस्कोपचा वापर करुन प्रत्येक रुग्णांच्या हृदयाचं आरोग्य तपासणी करून शकतात. आणि वेळीच धोका असलेल्या रुग्णांना उपचार मिळवून देऊन वाचवू शकतात.