इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिका संघर्षात उतरली; रशिया ही इराणच्या हाकेला ‘ओ’ देईल का?इराण आणि इस्रायलच्या संघर्षामध्ये आता अमेरिकेने उडी घेतली आहे. रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी अमेरिकेने इराणच्या विरोधात ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर ‘ राबवलं. या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेने लढाऊ विमानं आणि पाणबुड्यांच्या साहय्याने इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केले. इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात लढण्यासाठी आता इराण रशियाकडे मदत मागणार आहे. पाहुयात मध्य पूर्वेत नेमकं काय घडत आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री व्लादिमिर पूतीन यांची घेणार भेट
रविवारी पहाटे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पूतीन यांची भेट घेण्यासाठी मॉस्कोला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. भारतीय वेळेनुसार, सोमवारी दिनांक 23 जून 2025 रोजी ते पूतिन यांची भेट घेऊ इच्छित होते.
“अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. इराणच्या आण्विक प्रकल्पावर हल्ला करुन त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अमेरिका फक्त धमकी आणि बळाचा वापर करते.” असा आरोप अराघची यांनी केली आहे.
दरम्यान, इराणचे लष्कर सतर्क असून देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्री अराघची यांनी तुर्की दौऱ्यावर असताना माध्यमांना माहिती दिली.
या घटनेनंतर ट्रम्प यांना नोबल पुरस्कार मिळणार नाही
“राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करुन अमेरिकेसाठी नवीन युद्ध सुरु केलं आहे,” अशी प्रतिक्रिया रशियाचे सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी शांतीप्रिय नेते म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. मात्र, सत्तेत येताच त्यांनी अमेरिकेवर नवीन युद्ध लादलं आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करुन युद्ध सुरु करुन ट्रम्प हे शांतीचे नोबल पुरस्कार मिळवू शकत नाही.
अमेरिकन नागरिकांना सावध राहण्याचे निर्देश
अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र विभागाने अमेरिकन नागरिकांना “जगभरात सावध राहण्याचा इशारा” जारी केला आहे.
“इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशातलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. अमेरिकन नागरिकांना आणि परदेशातील हितसंबंधांना लक्ष्य करून निदर्शने होण्याचा धोका आहे.” असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने या प्रदेशातील अमेरिकन तळांना धमकी दिली आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याचे सल्लागार अली अकबर वेलायाती यांनी सांगितलं आहे की, इराणवरील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अमेरिकन सैन्यांना मदत करणाऱ्या कोणत्याही देशाला कायदेशीर लक्ष्य मानलं जाईल.
या सगळ्या घटनेनंतर अमेरिकेने इस्रायलमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे इराक आणि लेबनॉन मधल्या अमेरेकी दुतावासातील अधिकाऱ्यांना अमेरिकेत परतण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : इराण – इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार
इराणसाठी ट्रम्पची ‘MIGA’ चळवळ उभारण्याची इच्छा
अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर इराणमध्ये सत्ताबदल घडवण्याचं वक्तव्य राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलं. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “शासन बदल’ हा शब्द वापरणे राजकीयदृष्ट्या योग्य नाही, पण जर सध्याची इराणी राजवट इराणला पुन्हा महान बनवू शकत नसेल, तर राजवट बदल का होणार नाही???” मेक इराण ग्रेट अगेन (MIGA) अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली होती.
तर दुसरीकडे, रविवारी सकाळी संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये, अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांचे तपशीलवार वर्णन केलं होतं. तसच हे हल्ले इराणमध्ये सत्ताबदलासाठी केला नसल्याचंही स्पष्ट केलं.
हेगसेथ यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, अमेरिका इराणशी “युद्ध करू इच्छित नाही”. तर उपाध्यक्ष जेडी व्हान्स म्हणाले की हल्ल्यांमुळे तेहरानला वॉशिंग्टनशी वाटाघाटी परत करण्याची संधी मिळाली आहे.
या सगळ्या घटनेतून अमेरिका ही इराणशी नक्की का संघर्ष करतेय हे स्पष्ट होत नाही. एकीकडे धमकी, हल्ले करुन इराणला चिथावण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, त्यांना संवाद साधण्याचं आवाहन देत आहे.
दरम्यान, परिस्थिती पूर्णपणे वॉशिंग्टनच्या नियंत्रणात नाही. हवाई हल्ल्यांना प्रतिसाद देण्यासाठी तेहरानकडे अनेक मार्ग आहेत जे ते वापरू शकतात. अमेरिकेप्रमाणे, रशियाही त्याचं हित जपण्यासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या या संघर्षामध्ये उतरु शकतो. जर रशियासुद्धा या संघर्षात उतरला तर हा संघर्ष आणखीन चिघळेल. ज्यामुळे मध्य पूर्वेतील भूमी आणखीन रक्तलांछित होईल, ज्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील.