सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलाच्या डान्सने धुमाकूळ घातला आहे. ज्याने सगळ्या जगाला त्याच्या डान्स स्टेपने वेड लावलंय. हा मुलगा आहे इंडोनेशियाचा आणि त्याचा ‘ऑरा फार्मिंग’ डान्स सध्या सोशल मीडियावर वायरल होतं आहे. पण हा मुलगा नक्की आहे तरी कोण? आणि ‘ऑरा फार्मिंग’ म्हणजे नेमकं काय, हे आपण जाणून घेऊया.
‘ऑरा फार्मिंग’ म्हणजे काय ?
आजकाल सोशल मीडियावर तुम्ही ‘ऑरा’ हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. खासकरून जेव्हा ॲनिमे कॅरेक्टर्स किंवा हॉलिवूड स्टार टिमथी चालमेटसारख्या सेलिब्रिटींबद्दल बोललं जातं, तेव्हा हा शब्द कानावर येतोच. ‘ऑरा फार्मिंग’ म्हणजे स्वतःला इतकं कूल दाखवणं की तुमची एक वेगळीच ‘छबी’ सगळ्यांसमोर तयार होईल.
मेरियम-वेबस्टर डिक्शनरीनुसार, ‘ऑरा’ म्हणजे एकदम स्टायलिश असणं. जेव्हा एखादा खेळाडू किंवा कलाकार त्याच्या टॅलेंटने, स्वभावाने, चांगल्या वागण्याने इतरांना इंप्रेस करतो, तेव्हा त्याला ‘ऑरा’ आहे असं म्हणतात. आजच्या सोशल मीडियाच्या जगात तुम्ही काहीतरी भारी काम केलं की तुमचे ‘ऑरा पॉइंट्स’ वाढतात आणि काही गोंधळ केला की ते ‘ऑरा पॉइंट्स’ कमी होतात.
इंडोनेशियाच्या या मुलाचा ‘ऑरा फार्मिंग’ डान्स का व्हायरल झाला?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या लहान मुलाचं नाव रेयान अर्कान डीखा (Rayyan Arkan Dikha) आहे. अवघा 11 वर्षांचा हा मुलगा एका बोटीच्या पुढच्या टोकावर, एकदम डॅशिंग स्टाईलमध्ये नाचत होता. पूर्णपणे काळ्या पारंपरिक कपड्यांमध्ये आणि डोळ्यांवर गॉगल लावून बोटीच्या पुढच्या टोकावर उभं राहून आधी डावीकडे-उजवीकडे फ्लाइंग किस देत, त्याने त्याचा जबरदस्त डान्स सुरू केला. त्याचा हा व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, डीखा इंडोनेशियाच्या रियाऊ प्रांतातील कुआंतन सिंगिंग्गी रीजन्सीमधील एका गावात राहतो. त्याने ‘टेलुक बेलांग्गा’ नावाचा पारंपरिक पोशाख घातला होता आणि सोबत ‘मलय रियाऊ हेडक्लॉथ’ हे त्याचं पारंपरिक डोक्याला गुंडाळायचं कापडही घातलं होतं.
हा व्हायरल झालेला व्हिडिओ मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या ‘पाकू जालूर’ (Pacu Jalur) राष्ट्रीय बोट शर्यती मधला आहे. हा अनेक शतकांपासून चालत आलेला वार्षिक उत्सव आहे. यात मोठ्या, लांब बोटींच्या शर्यती होतात. या शर्यतीत, डीखा हा ‘तुकांग तारी’ असतो. ‘तुकांग तारी’ म्हणजे बोटीच्या पुढच्या टोकावर नाचून वल्हवणाऱ्यांना ऊर्जा देणारा नर्तक. प्रत्येक बोटीचा स्वतःचा तुकांग तारी असतो, असं ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
या मुलाचा मूळ व्हिडिओ सर्वात आधी जानेवारीमध्ये ‘लेन्सा रॅम्स’ नावाच्या एका टिकटॉक वापरकर्त्याने पोस्ट केला होता. डीखा, हा नऊ वर्षांपासून या बोट शर्यतीत भाग घेत आहे. त्याला सोशल मीडियावर आता ‘द अल्टीमेट ऑरा फार्मर’ असं नाव मिळालं आहे. जून महिन्याच्या शेवटपासून #ऑराफार्मिंगकिडऑनबोट आणि #बोटरेसकिडऑरा या हॅशटॅगसह त्याच्या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळत आहेत.
खेळाडू आणि स्पोर्ट्स टीम्सही डीखाच्या स्टेप्स कॉपी करतायत!
डीखाच्या डान्स स्टेप्सनी जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे. अनेक सोशल मीडिया युझर्स, इन्फ्लुएंर्स आणि प्रसिद्ध खेळाडू त्याच्या स्टेप्स कॉपी करून व्हिडिओ बनवत आहेत.
या लहान मुलाला मिळालेल्या जगभरातील लोकप्रियतेमुळे इंडोनेशिया सरकारच्याही भुवया उंचावल्या आहेत. रियाऊच्या राज्यपालांनी डीखाला प्रांताचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केलं आहे. त्यांनी सांगितलं की, डीखाने ‘स्थानिक मुलांना त्यांच्या परंपरा स्वीकारण्यासाठी आणि जपण्यासाठी प्रेरणा दिली आहे.’
या मुलाला त्याच्या शिक्षणासाठी 1.06 लाखांपर्यंतची शिष्यवृत्तीही मिळाली आहे. बीबीसी इंडोनेशियाशी बोलताना, त्याने सांगितलं की, त्याने ज्या डान्स स्टेप्स केल्या त्या त्याला अचानक सुचल्या. त्या डान्स स्टेप्स त्याने त्याचवेळी स्वतः तयार केल्या होत्या.