‘बुद्धिबळ हा जुगाराचा खेळ आहे’ असं स्पष्टीकरण अफगाणिस्तानमध्ये या खेळावर अधिकृतरित्या बंदी घातली आहे. तालिबानी राजवटीतील क्रीडा अधिकाऱ्यांनी रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी या निर्णयाची घोषणा केली आहे.
अफगाणिस्तानामध्ये तालिबानी राज्याधिकाऱ्यांनी अफगाणिस्तान नैतिकता कायद्यांतर्गत बुद्धिबळ खेळावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी महिलांनी मोठ्या आवाजात न बोलणं, मोठ्या आवाजात प्रार्थनाही न करणं, महिलांनी वैद्यकीय शिक्षण न घेणं अशी सुद्धा फर्मानं काढली आहेत.
‘बुद्धिबळ म्हणजे जुगार’
तालिबानी सरकारचे क्रीडा प्रवक्ते अटल मशवानी यांनी या बंदीची घोषणा करतेवेळी म्हणाले की, “शरिया या इस्लामिक कायद्यामध्ये, बुद्धिबळ हा खेळ जुगाराचं एक साधन मानलं जाते. त्यामुळे गेल्या वर्षी जाहीर झालेल्या सद्गुणांचा प्रचार आणि दुष्कर्म प्रतिबंधक कायद्यानुसार हा खेळ निषिद्ध मानला जात आहे. बुद्धिबळाच्या खेळाबाबत धार्मिक विचार आहेत, त्यामुळे जोपर्यंत या बाबींवर लक्ष देऊन त्याची शहानिशा केली जात नाही तोपर्यंत संपूर्ण अफगाणिस्तानामध्ये या खेळावर बंदी घालण्यात येईल.”
व्यवसायाचे आणि तरुणांचे नुकसान
या विषयावर अफगाणिस्तानातले नागरिक अजीजुल्लाह गुलजादा यांनी प्रतिक्रिया देली आहे. काबुलमध्ये त्यांचा कॅफे आहे. ते म्हणाले की, “तालिबानी सरकारच्या या निर्णयाचा आदर करतो. मात्र, या निर्णयामुळे माझ्या व्यवसायाचं आणि तरुणांचंही मोठं नुकसान होणार आहे. गेल्या आठवड्यातच माझ्या कॅफेमध्ये बुद्धिबळ अनौपचारिक स्पर्धाचं आयोजन केलं होतं. यामध्ये कोणत्याच प्रकारचा जुगार, बेटिंग असा काही प्रकार झाला नाही. अनेक तरुणांकडे मोकळा वेळ आहे. त्यामुळे ते संध्याकाळच्या वेळेत कॅफेमध्ये येऊन चहासोबत बुद्धीबळ खेळत असतात.”
हे ही वाचा : बुद्धिबळातील सर्वाधिक वजीर ‘तामिळनाडूत’!
तालिबानची अन्य खेळावरही बंदी
तालिबान सरकारने महिलांना कोणत्याही खेळामध्ये भाग घेण्यास पूर्ण बंदी घातली आहे. तसंच मार्शेल आर्ट हा क्रीडाप्रकारही ‘हिंसक खेळ’ असल्याचं कारण देत या क्रीडाप्रकारावरही बंदी घातली आहे.
बुद्धिबळ खेळाचा इतिहास
बुद्धिबळ हा भारताच्या भूमीत जन्मलेला खेळ आहे. जवळपास 6 व्या शतकामध्ये गुप्त राजाच्या काळात भारतात चतुरंग हा खेळ खेळला जायचा. चतुरंग म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ असे चार विभाग. युद्धाची रणनिती असलेला हा खेळ होता. त्यावेळी या खेळात राणी ही सोंगटी नव्हती. त्याऐवजी मंत्री हे खेळाडू असायचे. तर राजा हा या संपूर्ण खेळाचा केंद्रबिंदू असायचा.
मुस्लिम देशाच्या इतिहासातही बुद्धिबळ खेळावर जुगाराचे आरोप
पुढे हा खेळ भारतातून पर्शिया आणि अरब राज्यांमध्ये पोहोचला. तिथे हा खेळ शतरंग म्हणून ओळखला जाऊ लागला. तिथल्या भाषिक संदर्भानुसार राजाला पराभूत केल्यावर ‘शाह मेला’ असं म्हटलं जायचं. याचा अर्थ राजा असहाय्य आहे. यालाच पुढे चेकमेट असा शब्द वापरु लागले.
या शतरंज खेळातील बुद्धिबळाच्या समस्या आणि खेळातील शेवटच्या अभ्यासाच्या नोंदी केल्या गेल्या. त्यावरुन या खेळातील बौद्धिकतेचा होणार उपयोग दिसून आला. त्यावेळीही या खेळाला मुस्लिम धार्मिक नेत्यांकडून हा जुगाराचा खेळ असल्याचा आरोप होऊन त्यावर बंदी घातली गेली.
हे ही वाचा : अफगाणिस्तानात महिलांना ‘मुक्या’ करणारा तालिबानी फतवा
बुद्धिबळ खेळाचा जागतिक प्रवास
मात्र, या खेळाचा प्रवास थांबला नाही. मध्य पूर्व उत्तर आफ्रिका आणि युरोपमध्ये हा खेळ पसरला. चीनमध्ये हा खेळ झियांगकी नावाने ओळखला जाऊ लागला. तर जपानमध्ये त्याला शोगी असं नाव पडलं.
जस जसा हा खेळ जगाच्या पाठीवर पुढे पुढे सरकू लागला तसतसा त्या-त्या ठिकाणच्या भौगोलिक, सांस्कृतीक परिस्थितीनुसार खेळाची नावं आणि त्यातल्या पात्रांची रचना बदलली.
युरोपमधल्या स्पेनमध्ये इसवी सन 1000 च्या आसपास हा खेळ खेळला जाऊ लागला. तिथे या खेळातल्या पात्रामध्ये आणि नावांमध्ये बदल केले गेले. यावरुन तिथल्या तत्कालिन राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचं दर्शन घडतं. तिथल्या खेळाडूंनी पर्शियामधून पुढे गेलेल्या शतरंगच्या पटावर खेळातील पात्राच्या प्रतिनिधीक तुकड्यांऐवजी शाही दरबारांचे प्रतिनिधीत्व होईल असा आकृत्या आणल्या. सल्लागार मंत्री यांच्याऐवजी शक्तिशाली राणी असं पात्र निर्माण केलं. यावरुन त्याकाळात राण्यांचं महत्त्व वाढत होतं. त्याचं प्रतिनिधीत्व करणारा हा बदल होता. त्याकाळात चर्चचा समाजावर खूप प्रभाव होता म्हणून हत्ती ऐवजी बिशप हे खेळाडू उभे केले. आणि रथांचं रुपांतर हे किल्ल्यांच्या बुरुजामध्ये केलं गेलं.
बुद्धिबळ खेळाचे फायदे
बुद्धिबळ या खेळामध्ये मेंदू, बुद्धी याचा कयास लागतो. आपली बौद्धीक क्षमतेचा विकास करण्यासाठी या खेळाचा खूप फायदा होतो. याशिवाय, एकाग्रता, जलग गतीने निर्णय घेणे, स्मरणशक्ती, तणाव कमी करणे, गुंता सोडविणे अशा ज्या दैनंदिन आयुष्य जगताना ज्या कौशल्याची गरज असते ती कौशल्य या खेळाच्या माध्यमातून आपल्याला विकसीत करता येतात.