2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा 14 जुलै 2028 ते 30 जुलै 2028 या काळात होणार असून, त्यात पुरुष आणि महिला क्रिकेट संघही सहभागी होणार आहेत.
या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक गटात 6 संघ सहभागी होतील आणि प्रत्येक संघात 15 खेळाडू असतील. क्रिकेटचा टी-20 फॉरमॅट या स्पर्धेसाठी निवडण्यात आला आहे. त्यामुळे खेळ अधिक वेगवान, थरारक आणि प्रेक्षकांना आकर्षित करणारा ठरेल.
क्रिकेटचा ऑलिम्पिकमधील इतिहास
क्रिकेटचा ऑलिम्पिकमधील इतिहास 1900 सालचा आहे. त्या वर्षी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. त्यावेळी केवळ एकच क्रिकेट सामना खेळवण्यात आला. तो सामना ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात झाला होता. आणि ग्रेट ब्रिटनने तो सामना 158 धावांनी जिंकला.
या नंतर क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले नाही. अनेक दशके क्रिकेट हे फक्त काही देशांमध्ये लोकप्रिय राहिले. मात्र, आता या खेळाची जागतिक लोकप्रियता वाढल्याने, 128 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवत आहे.
क्रिकेटच्या पुनरागमनावर प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी क्रिकेटच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले, “लॉस एंजेलिस 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश ही स्वागतार्ह गोष्ट आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवला जाणार असल्याने तो अधिक रोमांचक ठरेल. ऑलिम्पिकमुळे नवीन प्रेक्षकांना आकर्षित करण्याची ही एक शानदार संधी असेल.
कसे ठरवले जातील सहा संघ?
ऑलिम्पिकसाठी कोणते सहा संघ निवडले जातील, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, याबाबद काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. सध्या आयसीसीचे 12 सदस्य देश आहेत – भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे.
संभाव्य नियोजनानुसार, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील पहिल्या पाच संघांना थेट प्रवेश दिला जाऊ शकतो. सहावा संघ हा यजमान देश म्हणजेच अमेरिका असेल. मात्र, अंतिम निर्णय ऑलिम्पिक समिती आणि ICC कडून लवकरच जाहीर केला जाईल.
क्रिकेटचा ग्लोबल प्रभाव
आज जगभरात क्रिकेट हा प्रचंड लोकप्रिय खेळ आहे. विशेषतः भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये या खेळाला प्रचंड पसंती आहे. आयपीएल, बीबीएल, पीएसएल अशा टी-20 लीग्समुळे क्रिकेटचे आकर्षण अजून वाढले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाल्यामुळे क्रिकेटला नवीन उंची मिळणार आहे.
क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये आल्याने जिथे हा खेळ अजून फारसा लोकप्रिय नाही अशा देशांमध्येही क्रिकेट पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भविष्य अधिक भक्कम होईल.
क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह
या घोषणेमुळे सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. भारतातील लाखो चाहत्यांना आता 2028 च्या ऑलिम्पिकची उत्सुकता लागली आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करताना पाहणे ही अभिमानास्पद गोष्ट असेल. त्यामुळे 2028 मधील ऑलिम्पिक केवळ खेळाडूंनाच नाही, तर प्रेक्षकांनाही संस्मरणीय ठरणार आहे.