वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी डेन्मार्कमध्ये अखेर पुस्तकांवरील विक्री कर रद्द केला आहे. युरोपमध्ये ब्रिटनमध्ये पुस्तकांवर कर आकारला जात नाही. त्याउलट, या स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये पुस्तक विक्रीवर सर्वाधिक 25 टक्के कर आकारला जायचा. मात्र आता वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुस्तकांची विक्री वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
वाचन संस्कृती वाढविण्याची गरज
डेन्मार्कचे संस्कृती मंत्री जेकब एंजेल-श्मिट यांनी या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले की, “अलीकडच्या काळात वाचन संस्कृती लोप पावत आहे. अनेक लोकं वाचत नाहीत. त्यांना पुरेशी अक्षरओळख नाही. आणि अशा लोकांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यासाठी वेळीच प्रयत्न करणे गरजेचं आहे.”
सरकारच्या या निर्णयानंतर सरकारला पुस्तक विक्रीतून मिळणारा महसूल बुडणार आहे. यामुळे अंदाजे 330 दशलक्ष क्रोनर म्हणजे 51 दशलक्ष डॉलर्सचा खर्च आता सरकारला करावा लागणार आहे.
डेन्मार्कमध्ये वाचना संबंधित गंभीर संकट
डेन्मार्कमधील आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या (ओईसीडी) शिक्षण अहवालात डेन्मार्कमधील शिक्षणाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. इथे 15 वर्ष वयोगटातील 24 टक्के डॅनिश मुलांना साधा मजकूर वाचता येत नाही, त्यांना काय लिहीलं आहे हेही समजत नाही. दर दहा वर्षामध्ये या टक्केवारीत 4 टक्क्याने वाढ होत आहे.
यापूर्वी डेन्मार्कच्या प्रकाशन उद्योगाने पुस्तकावरील विक्री करात कपात करण्याची मागणी केली होती. तर मे महिन्यामधील एक अहवालात देशातील सर्व लोकांना अभ्यासा व्यतिरिक्त अन्य भौतिक पुस्तके उपलब्ध होतील असं आश्वासन दिलं होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीमुळे अखेर डेन्मार्क सरकारने पुस्तकावरचा विक्रीकर पूर्णत: रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात असा कर आकारतात का?
भारतामध्ये पुस्तक विक्रीवर कर आकारला जात नाही. अभ्यासासह कथा, कांदबऱ्या, कवितांची पुस्तके हे भारतात पूर्णत: करमुक्त आहेत. केवळ कंपनीचे ब्रोशर्स, प्यॅमप्लेट्स असे व्यावसायिक कारणासाठी निर्माण केलेल्या गोष्टींवरच जीएसटी आकारला जातो. तसेच ई-पुस्तकांवरही कर आकारला जातो. मात्र, छापील रुपात मिळणारी पुस्तकं ही करमुक्त आहेत.
राज्यात वाचन संस्कृतीसाठी उचललेली पाऊले
अलीकडे मोबाईल आणि अन्य डिव्हाईसमुळे वृत्तपत्र, पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. पूर्वी प्रत्येकजण प्रवासात, मोकळ्या वेळेत पुस्तकं वाचण्याला प्राधान्य देत असतं. मात्र, आता चित्र वेगळं आहे. वाचन संस्कृती ही पिढ्यान् पिढ्या रुजावी, वाचनाचा छंद प्रत्येकाने लागावा यासाठी महाराष्ट्र सरकारने पुस्तकाच्या गावाची निर्मिती केली.
महाबळेश्वर तालुक्यात भिलार हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी आजमितीला 35 हजारपेक्षा जास्त पुस्तके वाचकांसाठी मोफत उपलब्ध करुन दिलेले आहेत. या पुस्तकांच्या मांडणीकरिता साहित्यप्रकारांनुसार 35 विभाग केले आहेत. ही सगळी पुस्तकं वाचनालयाच्या इमारतीत बंदिस्त नाहीत तर गावातल्या लोकांच्या राहत्या घरातील खोल्या, घरे, निवडक शाळा, उपाहारगृहे आणि मंदिर परिसरामध्ये ठेवलेली आहेत. पुस्तकं ठएवण्यासाठी गावातील लोक कोणताच मोबदला घेत नाहीत. या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने बालसाहित्य, संतसाहित्य, लोकसाहित्य, विज्ञान, इतिहास, कादंबरी, विनोदी साहित्य, शिवकालीन इतिहास, स्त्रीसाहित्य, दिवाळी अंक अशा विविध प्रकारची पुस्तके आहेत.
पर्यटकांना आपल्या आवडीच्या दालनापर्यंत सहज पोहोचता यावं, यासाठी त्या त्या दालनाजवळ साहित्यदर्शक फलक लावले आहेत. वाचकांनी येऊन, स्वत: पुस्तक निवडून तिथेच वाचत बसावं अशी यामागची कल्पना आहे. यासाठी वाचकांकडून ही कोणत्याचं प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही.
याशिवाय छत्रपती संभाजीनगर, सांगली, सिंधुदूर्ग आणि गोंदिया इथेही प्रत्येकी एक पुस्तकाचं गाव निर्माण करण्यात येत आहे.
मुंबई बुकीज
शंतनू नायडू या तरुणाने वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई बूकीज हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये अनेक सार्वजनिक जागांवर शांत वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मुंबईतून या उपक्रमाला सुरूवात केली होती. अनेक बागांमध्ये, मोठ्या कॅफेमध्ये, सेंट्रल लायब्ररी अशा सार्वजनिक ठिकाणी रविवारी अनेक तरुण वाचन करण्यासाठी एकत्र येत असतात. प्रत्येकजण आपापलं पुस्तकं घेऊन येतात. तर अशा ठिकाणी वाचनासाठी पुस्तकं उपलब्धही करुन दिले जातात. मुंबईत या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता पुणे, बँगळुरू, जयपूर या शहरातही हा उपक्रम राबवला जात आहे.