माणसाचं शरीर हे आजही उत्क्रांतीच्या टप्प्यात आहे हेही आपल्याला माहित आहे. पण आपल्या या मानवी शरीरात छोटे- छोटे बदल घडत नाहीयेत तर नवीन अवयवांचा चक्क शोध लागत आहे. ऐकुन आश्चर्य वाटलं ना !
नेदरलँडमधल्या शास्त्रज्ञांनी 2020 साली माणसाच्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या या नवीन अवयवाचा शोध लावला. हा अवयव कसा निर्माण झाला हे ठाऊक नाही. पण या अवयवामुळे माणसाला आरोग्यदायी फायदे होणार आहेत, हे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. पाहुयात हे फायदे काय आहेत.
माणसाच्या गळ्यात नवीन अवयवाची निर्मिती
नेदरलँडमधील शास्त्रज्ञांना माणसाच्या गळ्यामध्ये एक नवीन अवयव आढळलेला आहे. या अवयवाच्या मदतीने डोक्याच्या आणि गळ्याच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी मदत होईल असं आता शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
या नवीन अवयवाचं नाव ‘ट्यूबरियल लाळ ग्रंथी’ असं आहे. हा अवयव आपल्या नाकाच्या मागे जो नासोफरीनक्स म्हणून जो भाग आहे तिथे निर्माण झाला आहे. या ग्रंथीची लांबी ही 1.5 इंच आहे. यामुळे आपल्या नासोफरीनक्स भागात सातत्याने ओलावा राखला जातो.
डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या अवयवाचा शोध 2020 मध्ये घेतला होता. यापूर्वी पॅरोटिड, सबमँडिब्युलर आणि सबलिंग्युअल या तीनच प्रमुख लाळग्रंथी म्हणून ओळखल्या जातात. तर नासोफरीनक्स या भागात केवळ विखुरलेल्या ग्रंथी आहेत असं मानलं जायचं. त्यामुळे या ग्रंथींचा शरीरशास्त्रामध्ये उल्लेख नसायचा. त्यामुळे त्याविषयीची माहिती नोंदवली गेली नाही. मात्र, नासोफरीनक्समधील एकमेव लाळ किंवा श्लेष्मल ग्रंथी सूक्ष्मदृष्ट्या लहान आहेत आणि श्लेष्मल त्वचेत 1 हजार पर्यंत समान रीतीने पसरलेल्या आहेत ते उघड झाल्यावर शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं.
अनावधनाने लागला नव्या अवयवाचा शोध
संशोधकाना या अवयवाचा शोध अनपेक्षितपणे लागला. नेदरलँडमधले संशोधक PSMA PET-CT नावाच्या नवीन प्रोस्टेट कर्करोग इमेजिंग तंत्राची चाचणी घेत होते. संगणकीय टोमोग्राफी (CT) आणि पॉझिट्रॉन उत्सर्जन टोमोग्राफी (PET) यांच्या साहय्याने उपचार केले जातात. या प्रक्रियेत, रेडिओअॅक्टिव ट्रेसर शरीरात सोडले जातात. त्यातून शरीरातील कॅन्सरच्या क्रियेवर लक्ष ठेवलं जातं.
या स्कॅनचं परिक्षण करताना शास्त्रज्ञांना नासोफरीनक्स भागात दोन ग्रंथी चमकताना दिसल्या. या ट्यूबरियल ग्रंथीं असल्याचं शास्त्रज्ञांना समजलं. या ग्रंथी केवळ एक दोन रुग्णांमध्ये नाहीतर या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या 100 रुग्णांमध्ये आढळून आल्या. शरीरातील अन्य तीन प्रमुख लाळग्रंथीशी असलेलं साधर्म्य लक्षात घेऊन गळ्यात असलेल्या या नवीन अवयवाची नोंद करण्यास सुरूवात झाली.
कर्करोगाच्या उपचारावर मदत होणार का?
नव्याने सापडलेल्या या ट्यूबरियल ग्रंथींचा उपयोग कर्करोग उपचारासाठी होणार आहे. प्रामुख्याने जे रुग्ण रेडीएशन थेरपी घेत आहेत अशा रुग्णांना या ग्रंथींचा अधिक उपयोग होणार आहे. अनेकदा डोक्याचा, गळ्याचा कर्करोग असलेल्या रुग्णांना रेडीएशन थेरपीने उपचार दिले जातात तेव्हा त्यांच्या लाळग्रंथीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्यांना गिळताना, खाताना आणि बोलताना फार त्रास सहन करावा लागतो. यामुळे रुग्ण कायमचे बोलु शकत नाहीत किंवा त्यांच्या जगण्याचा कालावधी कमी होतो.
डॉ. व्होगेल आणि त्यांचे सहकारी, सर्जन मॅथिज एच व्हॅलस्टार यांनी 700 हून अधिक कर्करोग रुग्णांचं परिक्षण केलं. यामध्ये त्यांनी नव्याने ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथींना रेडिएशनच्या संपर्कात येणं आणि उपचारांमध्ये गुंतागुंत वाढवण्याच्या पद्धतीचा संबंध आढळून आला. यामध्ये असं स्पष्ट झालं की, या भागात रेडीएशनचे उपचार करताना या ट्यूबरियल ग्रंथींपर्यंत रेडीएशन न पोहोचू देणं याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर या ग्रंथीं रेडिएशन थेरपीपासून सुरक्षित ठेवल्या तर रुग्णांना उपचार पूर्ण झाल्यावर खाताना, बोलताना ज्या अडचणी येतात त्या येणार नाहीत.
कर्करोगग्रस्त रुग्णांचं जीवनमान वाढवण्याचा प्रयत्न
या ट्यूबरियल ग्रंथीचा उलगडा झाल्यानंतर आता रेडीएशन थेरपीपासून या ग्रंथींना कशाप्रकारे सुरक्षित ठेवलं जाईल, यावर संशोधन सुरू आहे. या रेडीएशन थेरपीमध्ये आवश्यक ते बदल करुन या ग्रंथींना नुकसान पोहोचविण्यापासून वाचवलं जाईल. यातून रुग्णांचा बरे होण्याचा टक्का वाढवला जाईल. जर संशोधकांना यामध्ये यश मिळालं तर, रुग्णांवरील रेडिएशन थेरपी जास्त यशस्वी होईल. तसेच बरे झालेल्या रुग्णांना पुढे चांगल्या पद्धतीने आयुष्य जगता येईल.
या 21 शतकात माणूस तंत्रज्ञानात्मक शोधांनी, रोज नव्याने निर्माण होणाऱ्या टेक्नो डिव्हाईसमुळे हुरळून जात आहे, आश्चर्य व्यक्त करत असतो. मात्र, अवकाशाचा उलगडा करणाऱ्या माणसाच्या शरीरातही ट्यूबरियल ग्रंथीसारख्या गोष्टी अस्तित्वात आहेत आणि या शरीरातल्या भागाचा शोध आता लागत आहे हेही नवलपूर्ण आहे.