इराण – इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार

Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण कोसो दूर असलो तरी हे युद्ध थांबलं नाही तर भारताला याचा जोरदार फटका बसू शकतो. समजून घेऊया या युद्धाचा भारतातवर नेमका काय परिणाम होणार आहे?
[gspeech type=button]

गेल्या चार वर्षापासून मध्य-पूर्व ( मिडल ईस्ट) मध्ये इस्रायल हा सतत युद्धामध्ये खेळतो आहे. गाझा पट्टीवरुन पॅलेस्टाईन, हमासशी संघर्ष आणि आता इराणशी युद्ध सुरू आहे. 12 जूनच्या मध्यरात्रीपासून इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मिसाईल हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलची राजधानी तेल अवीववर हल्ले केले आहेत. इस्रायलने या युद्धाला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ हे नाव दिलं आहे. तर इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’ असं नाव दिलं आहे. 

या आखातातल्या देशापासून आपण कोसो दूर असलो तरी हे युद्ध थांबलं नाही तर भारताला याचा जोरदार फटका बसू शकतो. समजून घेऊया या युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे?

तेलाच्या किंमती वाढणार

इराण – इस्रायल दरम्यानच्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 13 जून 2025 रोजी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये 8 टक्क्याची वाढ झाली. हे युद्ध जर असंच सुरु राहिलं तर या दरांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते हे स्पष्ट आहे.  

भारत सरकार देशाच्या एकूण तेलाच्या गरजेपेक्षा 80 टक्के वाढीव तेल खरेदी करत असतो. त्यामुळे सध्या तरी देशात तेलाचा साठा आहे. त्यामुळे या किंमतीवर तत्काळ परिणाम दिसले नाहीत. पण या दिवसांमध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या तेलासाठी जास्त डॉलर मोजावे लागतील. परिणामी आगामी काळात तेलाच्या किंमती वाढतील हे निश्चित आहे. 

भारत हा इराणकडून थेट तेल आयात कमी प्रमाणात करतो. इराक, सौदी अरेबिया आणि युएई हे आपले मुख्य तेल पुरवठादार देश आहेत. यामध्ये सुमारे 20 टक्के तेल हे होर्मुझच्या सामुद्रधूनीमार्गे भारतात येतं. ही सामुद्रधुनी उत्तर इराण आणि दक्षिण अरबी द्विपकल्प यांच्या मध्ये आहे. याच मार्गातून इराक, सौदी अरेबिया आणि युएई इथून भारताला तेल निर्यात करतात. त्यामुळे या मार्गाजवळच्या भूभागावर जर कोणता अडथळा वा युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर, त्याचा परिणाम तेल निर्यातीवर होतो. 

या मार्गाऐवजी दुसरा एक पर्याय आहे तो सुएझ कालवाचा. या आखाती प्रदेशात तणाव वाढल्यावर सुएझ कालव्यातील माल वाहतूक थांबवली जाते. लाल समुद्रामध्ये प्रवेश बंद केला जातो. यामुळे मग भारतीय जहाजांकरता तेलाची आयात करण्यासाठी केप ऑफ गुड होप हा मार्ग उरतो. या मार्गातून जर तेलाची आयात करायचं ठरवलं तर, प्रत्येक जहाजाला साधारण 15 ते 20 दिवस लागू शकतात. यामुळे प्रत्येक कंटेनरमागे 500 ते 1000 डॉलर खर्च येईल. ज्यामुळे नियमीत खर्चात 50 ते 60 टक्क्याची वाढ होऊ शकते. परिणामी पेट्रोल – डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. 

हे ही वाचा : इस्त्रायल – हिजबुल्लाह युद्धाला स्वल्पविराम

तेलसाठ्याचा आढावा घेण्याची GTRI ची भारताला सूचना

इराण- इस्रायलच्या या संघर्षामध्ये भारताने कच्च्या तेलाच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणावी, तेलाचे साठे सुरक्षित करणं आणि एकूणच तेल उपलब्धतेचा आढावा घेण्याचा सल्ला ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह संस्थेने दिले आहेत. याशिवाय अरबी समुद्रामध्ये महत्त्वाच्या सागरी मार्गाभोवती आणि चोक पॉइंट्सभोवती लष्करी सुरक्षा तैनात करण्याचं सुचवलं आहे. 

भारताचा इराण आणि इस्त्रायलशी व्यापार 

भारताचे आखातातल्या या दोन्ही देशांसोबत व्यापारी संबंध आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताने इराणला 1.24 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली आहे. तर 444.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची  इराणमधून आयात केली आहे. 

इस्रायल सोबतच्या व्यापाराची व्याप्ती खूप जास्त आहे. भारताने या आर्थिक वर्षात इस्रायलमध्ये 2.15 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात तर 1.61 अब्ज डॉलरची आयात केली आहे. हा व्यापार जरी स्थिर राहिला तर आयात – निर्यातीच्या खर्चात वाढ होऊ शकते. 

विमान प्रवास महागणार

भारत – पाकिस्तान तणाव स्थितीमुळे दोन्ही देशांनी एकमेकांसाठी हवाई क्षेत्राचा वापर बंद केला आहे. यातच इस्रायल सोबत सुरु असलेल्या संघर्षामुळे इराण – इराकचे हवाई क्षेत्र काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे युरोप, कॅनडा आणि अमेरिकेला जाण्यासाठी भारतीय विमानांना मोठी गवसणी घालून जावं लागेल. ज्याचा परिणाम वेळ आणि तिकीटांच्या दरांवर होईल. जोपर्यंत इराण – इराकचे हवाई क्षेत्र प्रवासी विमानांसाठी सुरु होणार नाही, तोपर्यंत विमान तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता आहे. 

रुपयाच्या तुलनेत डॉलर आणखीन महागणार

या सगळ्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाच्या तुलनेत डॉलरचं मूल्य आणखीन वधारेल. यामुळे देशाच्या व्यापार तुटीत आणि चालू खात्यातील तुटीवरही परिणाम होऊ शकतो. थोडक्यात परकीय चलनाच्या गंगाजळीवर मोठा परिणाम होईल. एकूणच रुपयाचं मूल्य आणखीन घसरलं तर आयात केल्या जाणाऱ्या वस्तू महाग होतील.

हे ही वाचा : लेबनॉन नवीन युध्दभूमी म्हणून का उदयास येत आहे?

आखाती देशांतील भारतीयांची आणि त्यांच्या नोकऱ्यांची सुरक्षा  

भारतातील सुमारे 1 कोटी लोक  रोजगारानिमित्त आखाती देशामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांची सुरक्षा ही सरकारसाठी महत्त्वाची आहे. शिवाय परिस्थिती आणखीन गंभीर झाली तर, त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारला पाऊल उचलावं लागेल. याशिवाय आखाती देशात काम करणाऱ्या भारतीयांकडून गेल्या आर्थिक वर्षात 45 अब्ज डॉलर्स मिळाले होते. मात्र, या युद्ध परिस्थितीमुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला झळ बसली, भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली तर या भारतीर कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या रेमिटन्सवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि 'MAGA' चा नारा हे एक गुंतागुंतीचं
World lung cancer day : एआय, अ‍ॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार
World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ