लहान मुलांना होणारा ‘हँड, फूट माऊथ डिसीज’ (HFMD) – काळजी, लक्षणं आणि उपाय

HFMD in Children : एचएफएमडी हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा व्हायरसमुळे होतो. साधारणपणे 1 ते 10 वर्षांच्या लहान मुलांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. पण कधीकधी मोठ्या माणसांनाही याची लागण होऊ शकते.
[gspeech type=button]

उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये अनेकवेळा लहान मुलांना या काळात सतत काही ना काही आजार होत असतात. अंग तापणे, सर्दी-खोकला, त्वचेवर पुरळ, थकवा असं काही ना काही सुरुच असतं. अशाच आजारांपैकी एक म्हणजे ‘हँड, फूट अँड माऊथ डिसीज’ ज्याला HFMD असं म्हणतात. हा आजार नेमका काय आहे, तो कसा पसरतो आणि त्यावर काय उपाय करता येतात, हे आज आपण सविस्तरपणे आणि अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

काय आहे ‘हँड, फूट माऊथ’ आजार?

एचएफएमडी हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा व्हायरसमुळे होतो. साधारणपणे 1 ते 10 वर्षांच्या लहान मुलांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. पण कधीकधी मोठ्या माणसांनाही याची लागण होऊ शकते, पण तो सौम्य स्वरूपात असतो. विशेषतः 5 वर्षांखालील मुलांना याची लागण होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती त्या वयात पूर्णपणे विकसित झालेली नसते. हा आजार मुख्यतः “कॉक्सॅकी व्हायरस” नावाच्या विषाणूमुळे होतो.

एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार खूप वेगाने पसरतो. स्पर्श, शिंका किंवा खोकल्यातून याचे विषाणू सहज पसरू शकतात. त्यामुळे, शाळा किंवा पाळणाघरात जिथे अनेक लहान मुलं एकत्र येतात,अशा ठिकाणी याचा प्रसार लवकर होतो. तज्ज्ञांच्या मते, हा आजार कोणत्याही ऋतूत होऊ शकतो, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात याची शक्यता जास्त असते, कारण या वातावरणात विषाणूंची वाढ जास्त होते.

लक्षणं काय आहेत?

– सुरुवातीला हलका ताप येतो, जो साधारणपणे 2 ते 3 दिवस राहतो. मुलांमध्ये भूक कमी होणे आणि थकवा येणे ही सामान्य लक्षणं दिसतात. काही मुलांना नाक वाहणे, घसा दुखणे किंवा लाळ गळणे असा त्रासही होऊ शकतो.

– ताप आल्यानंतर 1-2 दिवसांनी मुलांच्या घशात आणि तोंडात लालसर फोड (sores/ulcers) येतात. हे फोड खूप दुखतात, ज्यामुळे मुलांना गिळायला किंवा खायला खूप त्रास होतो. त्यामुळे मुलं भीतीने कधी कधी खाणं सोडून देतात. आणि साधारणपणे 5 ते 6 दिवस हे फोड अंगावर राहतात.

– या आजाराचं मुख्य आणि वेगळं लक्षण म्हणजे तळहात, तळपाय, तोंड आणि घशात बारीक पुटकुळ्या (Blisters) येतात. या पुळ्या लालसर रंगाच्या असतात आणि त्यांमध्ये पाणी भरलेलं असतं, त्यांना सहसा खाज सुटत नाही. काहीवेळा ओठांच्या आणि गालाच्या आसपासही हे पुरळ दिसू शकतात. नितंब , हात आणि पायांवरही पुरळ येतात.

– लहान मुलांना अंगदुखीचा त्रासही होऊ शकतो आणि त्यामुळे ते खूप थकून जातात. तसंच काही मुलांना मळमळ किंवा उलटीचाही त्रास होऊ शकतो.

– साधारणपणे 6 ते 7 दिवस ही लक्षणं दिसतात. पुरळ गेल्यानंतरही काही दिवस त्याचे डाग शरीरावर राहू शकतात. पण नंतर ते आपोआप नाहीसे होतात. हा आजार सहसा सौम्य असतो पण, काहीवेळा काही विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे मज्जासंस्था, फुफ्फुसे किंवा हृदयाशी संबंधित क्वचित गंभीर परिणाम दिसून येतात.

हा आजार पसरण्याची मुख्य कारणं

– ज्या मुलाला या आजाराचा संसर्ग झाला आहे त्याच्या नाकातून येणारे पाणी , लाळ किंवा शिंकांमधून आणि खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून हा व्हायरस पसरतो.

– तसंच, त्या व्यक्तीने वापरलेल्या वस्तू, जसे की रुमाल, टॉवेल, खेळणी किंवा इतर कोणत्याही वस्तूंना स्पर्श केल्याने आणि त्यानंतर स्वतःच्या तोंडाला, नाकाला स्पर्श केल्याने हा आजार पसरू शकतो.

– काहीवेळा बाधित व्यक्तीच्या विष्ठेतील विषाणूंमुळेही हा आजार पसरतो. त्यामुळे डायपर बदलताना विशेष काळजी घ्यावी लागते.

– विषाणू शरीरात शिरल्यापासून साधारणपणे 3 ते 7 दिवसांनी आजाराची लक्षणं दिसू लागतात. रुग्ण आजारी असतानाच्या पहिल्या आठवड्यात तो सर्वात जास्त संसर्गजन्य असतो.

एचएफएमडीवर उपचार आणि घ्यायची काळजी

– एचएफएमडी हा सहसा गंभीर आजार नाही आणि बहुतांश मुलांना तो सौम्य स्वरूपात होतो. यावर कोणतंही वेगळं असे व्हायरस विरोधी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे, मुलांमध्ये दिसणाऱ्या लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार केले जातात.

– तापासाठी पॅरासिटामॉल किंवा वेदना कमी करण्यासाठी आयबुप्रोफेन सारखी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावी लागतात. तोंडातील फोडांमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी माउथ जेल चा वापरही केला जातो.

– घशात पुळ्या असल्यामुळे मुलं काही खायला किंवा प्यायला टाळतात. यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. हे टाळण्यासाठी मुलांना भरपूर पाणी किंवा इतर द्रव पदार्थ जसे की, सरबत, नारळ पाणी, सूप, ताक वारंवार द्या. थंड पदार्थ जसे की आईस्क्रीम, फ्रोझन योगर्ट, तसेच मऊ आणि पातळ पदार्थ खिचडी, डाळीचे पाणी, पातळ भाज्यांचे सूप देण्याचा प्रयत्न करा.

– हा विषाणूजन्य आजार असल्याने यावर अँटिबायोटिक्स चा काहीही उपयोग होत नाही. अँटिबायोटिक्स फक्त जिवाणूजन्य संसर्गावर काम करतात.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

1. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हात स्वच्छ धुणे. हा एचएफएमडीला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कुटुंबातील प्रत्येकाने, विशेषतः टॉयलेट वापरल्यानंतर, डायपर बदलल्यानंतर, जेवण करण्यापूर्वी आणि अन्न तयार करण्यापूर्वी आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी 20 सेकंद चांगले धुवावे.

2. जर तुमच्या मुलाला एचएफएमडीची लक्षणं दिसली, तर त्याला शाळेत किंवा पाळणाघरात पाठवू नका. यामुळे इतर मुलांना संसर्ग होण्यापासून रोखता येईल. जोपर्यंत शरीरावरील सर्व पुळ्या पूर्णपणे सुकून जात नाहीत तोपर्यंत मुलांना घरीच ठेवा आणि इतर मुलांपासून दूर ठेवा.

3. मुलांना शॉपिंग मॉल्स, खेळाची मैदाने, बस, ट्रेन यांसारख्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाऊ नका.

4. घरात जर बाधित लहान मूल असेल तर त्यांनी वापरलेल्या वस्तू, खेळणी, भांडी नियमितपणे स्वच्छ करा आणि जंतुनाशकाने पुसून घ्या. विषाणू या वस्तूंवर काही दिवस जिवंत राहू शकतात.

5. जर तुमच्या मुलामध्ये एचएफएमडीची लक्षणं दिसली, तर कोणताही घरगुती उपाय न करता लगेच बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या मुलाच्या शाळेला किंवा पाळणाघरालाही याबद्दल माहिती द्या, जेणेकरून ते इतर मुलांवर लक्ष ठेवू शकतील आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतील.

6. मोठ्या व्यक्तींना किंवा शाळकरी वयाच्या मुलांनाही हा आजार सौम्य प्रमाणात होतो. काहीवेळा त्यांना लक्षणंही दिसत नाहीत पण , ते नकळतपणे विषाणू पसरवू शकतात. त्यामुळे, मोठ्यांनीही स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचे आहे.

वेळेवर काळजी घेतल्यास आणि योग्य उपचार केल्यास या आजारातून लवकर बरे होता येतं. त्यामुळे घाबरून न जाता, योग्य खबरदारी घ्या आणि आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Louis Vuitton Handbag : लुई व्हिटॉन' (Louis Vuitton) या जगप्रसिद्ध ब्रँडच्या स्प्रिंग/समर '26 मेन्सवेअर कलेक्शनमध्ये' चक्क मिनी ऑटो रिक्षाच्या आकाराच्या
ChatGPT psychosis : एआय चॅटबोटच्या त्यातही चॅटजीपीटीच्या अतिवापरामुळे अनेकांना मनोविकाराने घेरलं आहे. या आजाराचं नाव आहे, ‘चॅटजीपीटी सायकोसिस’.
Us Visa: अमेरिका तुम्हाला तुमची सोशल मीडिया खाती पब्लिक करण्यासाठी किंवा त्यांची माहिती देण्यासाठी सक्ती करू शकत नाही. पण जर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ