चांगल्या आरोग्यासाठी अतिशय झोप ही अतिशय महत्त्वाची आहे. झोप पूर्ण होत नसेल तर अनेक आजार जडतात. अनेक जणांची तक्रार असते की, मला झोपायचं आहे पण झोपच येत नाही. यावर उपाय म्हणून अनेकजण झोपेच्या गोळ्या घेतात. मोठ्या माणसांसह छोट्या मुलांनाही या गोळ्या दिल्या जातात. याला स्लीप गमीज असं म्हणतात. या गोळ्यामध्ये मेलाटोनिन हा घटक असतो. जाणून घेऊयात या स्लीप गमीज किती सुरक्षित आहेत?
स्लीप गमीजचा ओव्हरडोस
ऑस्ट्रेलियामध्ये लहान मुलांना स्लीप गमीजच्या ओव्हरडोस झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेतून या स्लीप गमीज ऑस्ट्रेलियात पाठवल्या जायच्या. मात्र, आयहर्ब या ऑनलाइन मेडिसीन स्टोअरने याची विक्री थांबवली आहे. ऑस्ट्रेलियातील बरेच पालक डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर अशा गोळ्या आपल्या मुलांना खायला द्यायचे. यामुळे नवीन चिंता निर्माण झाली आहे.
झोपेसाठी मेलाटोनिन हार्मोन अत्यावश्यक
झोपेसाठी मेलाटोनिन हे हार्मोन क्रियाशील होणं गरजेचं असतं. जेव्हा शरीरात या मेलाटोनिन हार्मोन कमी होतो. त्यावेळी इच्छा असूनही आपल्याला झोप येत नाही. स्लीप गमीज या चॉकलेट सारख्या असेल्या गोळ्यामध्ये मेलाटोनिन हाच घटक असतो. या मेलाटोनिनचं अतीप्रमाणामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम ही होतात.
हे मेलाटोनिन आपल्या मेंदूमध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असतं. मेंदूमध्ये हे हार्मोन तयार झालं की आपल्याला झोप येऊ लागते. मात्र, जर मेंदूमध्ये पुरेसं मेलाटोनिन निर्माण होत नसेल तर डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या दिल्या जातात. गेल्या काही वर्षामध्ये झोप येत नसलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात केवळ प्रौढ लोकांचाच समावेश नाही तर लहान लहान मुलांनाही झोपेसाठी मेलाटोनिन असलेल्या गोळ्या घ्याव्या लागत आहेत.
अनेक डॉक्टर हे अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांना उपचारासाठी या गोळ्या देतात. या गोळ्या प्रभावी आणि इतर औषधांच्या तुलनेच सुरक्षित मानलं जातं. न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर असलेल्या मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये निद्रानाशावर उपचार करण्यासाठी या गोळ्या आता सहजपणे दिल्या जातात.
अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर, ऑटिझम, न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर असलेल्या लहान मुलांना झोप येण्यासाठी किंवा मध्यरात्री झोपेतून जाग आल्यावर पुन्हा झोप लागावी यासाठी या गोळ्या दिल्या जातात.
लहान मुलांना जेव्हा या गोळ्या दिल्या जातात तेव्हा त्याची मात्रा कमी असली पाहिजे आणि जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंतच या गोळ्या द्याव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत. या गोळ्या नियमीत दीर्घकाळ घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या कालावधीपुरत्याच या गोळ्या घेणं गरजेचं आहे.
झोपेच्या गोळ्यांच्या वापरात वाढ
सध्या चारापैकी एका मुलाला निद्रानाशाचा त्रास होतो. यामध्ये न्यूरोडायव्हर्जंट असलेल्या किंवा त्यामार्गावर असलेल्या मुलांचाही समावेश आहे. न्यूरोडायव्हर्जंट म्हणजे आपला मेंदू सामान्य मेंदूपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो. अनेक पालक हे डॉक्टरांचा सल्ला न घेता आपल्या मुलांना सहज मेलाटोनिनच्या गोळ्या किंवा गमीज देतात. या गोळ्या किंवा गमीजमुळे न्यूरोडायव्हर्जंट हा आजार बरा होतो किंवा होत नाही अशा प्रकारचं कोणताच शास्त्रीय आधार नाही. या गोळ्यांवर ही औषधं किती प्रमाणात आणि किती कालावधीसाठी घेतली पाहिजेत याबाबत काहीच स्पष्टता नसते. त्यामुळे ज्या मुलांना न्यूरोडायव्हर्जंट आजार नाही अशा मुलांना ही औषधं डॉक्टर देत नाहीत.
मेलाटोनिन औषधाची उपलब्धता
ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये मेलाटोनिन हे औषध म्हणून ओळखलं जातं. ऑस्ट्रेलियामध्ये अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर, ऑटिझम, स्मीथ मॅगनीज सिंड्रोम असलेल्या लहान मुलांच्या उपचारासाठी वापरण्याची परवानगी औषध प्रशासनाने दिलेली आहे.
अमेरिकेमध्ये हे मेलाटोनिनला आहारातील पूरक घटक म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अन्य औषधांप्रमाणे मेलाटोनिनच्या वापरावर निर्बंध घातलेले नाहीत. त्यामळे अमेरिकेत ऑनलाइन साईट्सवर हे मेलाटोनिनच्या सप्लिमेंट्स उपलब्ध असतात. लोकं अन्य वस्तूप्रमाणे त्याची खरेदी करतात. ऑस्ट्रेलियामध्ये या सप्लिमेंट्सना औषधाचा दर्जा आहे. त्यामुळे तिथे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनशिवाय या गोळ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील अनेकजण ऑनलाइन पद्धतीने अमेरिकेतून या गोळ्या मागवतात.
मेलाटोनिन गमीज सुरक्षित आहेत का?
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या मेलाटोनिन गमीज मुलांना देणं ही अतिशय चिंताजनक आणि धोकादायक बाब आहे.
या गोळ्यांमध्ये किती प्रमाणात मेलाटोनिन असतं याची आपल्याला कल्पना नसते. प्रत्येक ब्रँडच्या गोळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात मेलाटोनिन हा घटक असतो. मेलाटोनिनची पातळी लेबलवर नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा जवळजवळ शून्य ते चार पट जास्त असते.
यापैकी काही गोळ्यांमध्ये सेरोटोनिन हा घटक असतो. सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हे एकमेकांना पूरक असले तरिही, मुलांच्या वर्तणुकीवर, मूडवर त्याचा परिणाम होतो. दीर्घकाळ मेलाटोनिनची औषधं घेण्याने काय परिणाम होतो, ते सुरक्षित आहेत का यावर काही संशोधकांनी अभ्यास केला आहे. यामध्ये मेलाटोनिन जास्त प्रमाणात घेतल्याने धोका निर्माण होतो हे उघड झालं आहे.
मुलांच्या वयानुसार या औषधाचा दुष्परिणाम दिसून येतो. अतिप्रमाणात हे औषध घेतल्यावर मळमळ होणे, अस्वस्थता, सतत झोप येणे, मायग्रेन अशा समस्या निर्माण होतात. दरम्यान, याचा हार्मोनवर आणि शरीरातील इतर अवयवावर काय परिणाम होतो हे अजून स्पष्ट झालं नाही.
अमेरिकेत या मेलाटोनिन गमीजमुळे मृत्यू होण्याचे आणि गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मेलाटोनिन गमीज घेणाऱ्या सात मुलांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला आहे. मात्र, या मृत्यूला हे गमीजचं कारणीभूत आहेत हे ठोसपणे सिद्ध झालं नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये आता या गमीजला विषाप्रमाणे गृहीत धरलं जातं. मेलाटोनिनची नेमकी किती मात्रा आणि किती काळ जास्त घेतल्यावर शरिरावर दुष्परिणाम होतो याबद्दल अभ्यास सुरू आहे. या गोळ्यावर त्यातील विविध घटकांची संपूर्ण माहिती दिली जात नाही. त्यामुळे मुलांमध्ये नेमके कोणते विषारी घटक किती प्रमाणात जातात याची स्पष्टता नाही.
हे मेलाटोनिन गमीज लॉलीपॉप चॉकलेटसारखे दिसतात. त्यामुळे प्रत्येक लहान मूल या गोळ्या आवडीने खात असतात. त्याचं प्रमाण पाळलं जात नाही. परिणामी त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
काय खबरदारी घ्यावी ?
झोपेचा त्रास हा मुलासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत त्रासदायक असू शकतो. पण या आजारावर विचारपूर्वक उपचार घेतले पाहिजेत. कृत्रिम मेलाटोनिन गोळ्या घेणं हा या आजारावरचा उपचार असू शकत नाही. जरी डॉक्टरांनी या गोळ्या औषधं म्हणून दिल्या असतील तर त्या ठरावीक काळापर्यंत घ्यावेत. पुन्हा जर घ्यायच्या असतील तर डॉक्टराचा सल्ला अवश्य घ्यावा.
शरिरात नैसर्गिकरित्या मेलोटोनिन कसं वाढवावं?
आपल्याला नैसर्गिकरित्या शरिरात हे मेलोटोनिन वाढवता येतं. यासाठी सकाळी कोवळं ऊन घ्यावं, झोपण्यापूर्वी मोबाईल, टिव्ही पाहायचा नाही. दिवसा ध्यानसाधना करावी. लिंबू, चेरी, अंडी, मासे, दूध, सुकामेवा, धान्य, मशरूम अशा मेलाटोनिनयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा.
सेरोटोनिनचं प्रमाण वाढवण्यासाठी भूईमुगाच्या शेंगा, केळी, चिकन आणि टर्की यांचा समावेश आहारात करावा. कारण सेरोटोनिन च्या मदतीने शरिरात मेलाटोनिन तयार होत असते. तसेच शरिरात जिंक, मॅग्नीशियम आणि विटामिन B6चं प्रमाण योग्य पद्धतीत असल्यावरही मेलाटोनिनच्या वाढीला मदत होते.