‘निसर्ग हा माणसाचा मित्र आहे’ हे घोषवाक्य सतत कानावर पडतं. पण माणूसच स्वत:ला या निसर्गापासून दूर करत आहे. त्याचे दुष्परिणाम आज आपण अनुभवत आहोत. पण निसर्ग आपली साथ सोडत नाही.
आपल्याला जेव्हा खूप तणाव येतो तेव्हा घरातील सदस्य किंवा आपला मित्र परिवार आपल्याला थोडं मोकळ्या हवेत फिरायला सांगतात. यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात असतो. तेव्हा आपला ताण कमी होतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासानुसार जेव्हा एखादा व्यक्ति खूप तणावात असेल आणि त्याने बागेमध्ये काही काम केलं तर त्याचा तणाव कमी होतो हे सिद्ध केलं आहे.
तुम्ही एखाद्या जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याऐवजी मोकळ्या जागेत, बागेत व्यायाम केला, बागेत झाडाचं रोप लावले, जमिन साफ केली की आपोआप मन प्रसन्न होऊ लागते. जाणून घेऊयात यामागचं शास्त्रीयं कारणे.
हॉर्टिकल्चरल थेरपी
कॅलिफोर्नियातील लाँग बीच इथल्या UCLA एक्सटेंशनमधल्या करेन हॅनी यांनी हॉर्टिकल्चरल थेरपी ही संकल्पना मांडली आहे. हॉर्टिकल्चरल थेरपीमध्ये रुग्णांना वा तणावग्रस्त लोकांना त्यांची गरज ओळखून वनस्पती आधारित किंवा बागायत कामाच्या सानिध्यात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात.
आठवड्यातून साधारण 20-30 मिनिटे बागकाम केल्यावर ताण कमी होतो आणि मूड सुधारतो. जर नियमितपणे बागकाम केलं तर त्यातून मिळणारे फायदे ही वाढतात असं संशोधनातून आढळून आलं आहे.
निसर्गाशी भावनिक बंध जपा
निसर्गात राहण्याची साधी कृती माणसाचा मूड सुधारू शकते आणि त्यांना नेमक्या गोष्टिवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करु शकते. पण या थेरपीपुरता निसर्गाशी नातं न जोडता “दीर्घकाळ बागेतल्या झाडांची काळजी घेणं, वृक्षारोपण करत राहणं अशा पद्धतीने सक्रिय सहभाग घेत राहिल्यावर समाधान मिळतं. आपल्या वेळेचाही सदुपयोग होतो”, असं मत अमेरिकेतील इडाहो राज्यातील बोईस इथल्या व्यावसायिक नोंदणीकृत बागायती थेरपिस्ट सारा थॉम्पसन यांनी मांडलं आहे. या बागायतीच्या कामामुळे चिंता, नैराश्य कमी होते. दैनंदिन आयुष्यात शांतता, समाधान आणि जगण्याचं उद्दिष्ट मिळतं.
सायटिंफिक अभ्यास
बागायतीमुळे माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या या बदलांना कोलोरॅडो-बोल्डर विद्यापीठात अनुमोदन मिळालेलं आहे. तिथल्या संशोधकांनी या विषयावर संशोधन करताना संशोधनात सहभागी झालेल्या नमुनाच्या एका गटाला बागकामाचे प्रशिक्षण,काही बियाणे, छोटी रोपे आणि थोडी जागा उपलब्ध करुन दिली. तर दुसऱ्या गटाला तब्बल दोन वर्ष थोडंही बागकाम करु दिलं नाही.
अभ्यासाअंती, बागकाम करणाऱ्या गटांनी मजबूत सामाजिक संबंध जोपासले, त्यांच्यात तणावाची पातळी कमी असल्याचं आढळलं, त्यांच्या आहारात फायबरयुक्त अन्नपदार्थांमध्ये ७ टक्के वाढ झाली. या बदलांमुळे त्यांच्यामध्ये नैराश्य, उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह आणि कर्करोग यासारख्या काही शारीरिक आणि मानसिक आजारांसाठी जोखीम घटक कमी झाल्याचं आढळलं. तसेच संपूर्ण आठवड्यात त्यांच्या एकूण शारीरिक हालचालींमध्ये 42 मिनिटांची वाढ झाल्याचं दिसून आलं. हे एवढे सकारात्मक बदल दुसऱ्या गटातील माणसांमध्ये पाहायला मिळाले नाहीत.
2020 मध्ये, एक्सेटर विद्यापीठ आणि यूकेमधील रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीकडून या विषयावर संशोधन केलं होतं. त्यात त्यांना असं आढळून आलं की, बागायत वा शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि सुदृढता हे गरीब भागात राहणाऱ्यांपेक्षा श्रीमंत समुदायातील रहिवाशांच्या आरोग्यासारखीच होती.
थॉम्पसन म्हणाले की, या गोष्टींची जनजागृती करणं आवश्यक आहे. लोकांनी मोबाईल वा अन्य गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा घराबाजुलच्या बागेत, शेतात काम करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्या शरिरात सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढते. आणि मातीशी संपर्कात आल्यावर आपला मूड सुधारण्याऱ्या संबंधित फायदेशीर सूक्ष्मजंतूंशी संपर्क होतो.
बागकाम ही सर्वसमावेशक अशी क्रिया आहे. त्यामुळे बागेत काम करण्यासाठी दिलेला वेळ सत्कर्णी लागतो. कारण बागेत काम करताना शरिरात वापर करतो तेव्हा एकप्रकारे व्यायाम होतो. शारीरिकदृष्ट्या मजबूत, लवचिक राहून संतुलन योग्य राहते. सामाजिकदृष्ट्या, आपण निसर्गाशी आणि या सगल्या गोष्टीत आवड असलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात येतो. यासोबतच बागेत काम करताना येणाऱ्या समस्या, प्रश्न सोडवण्याची सवय कायम राहून आपल्यातील सर्जनशीलता टिकून राहते. यापूर्वी निसर्ग हा माणसाचा मित्र आहे हे घोषवाक्य सहज म्हणलं जायचं. मात्र, आता या शास्त्रीय कारणही असल्याचं स्पष्ट झालं आहे.