भारतीयांसाठी मुंबई ही मायानगरी आहे. अगदी तशीच जगभरातल्या लोकांसाठी अमेरिका ही ‘ड्रीम कंट्री’ आहे. या ड्रीम कंट्रीमध्ये सगळ्यांनाच अधिकृत प्रवेश मिळत नाही. लोक जीवाची पर्वा न करता बेकायदेशीरपणे सीमा पार करुन प्रवेश करतात.
बेकायदेशीर सीमा ओलांडताना अनेकांचा जीव जातो. अनेकांवर लैंगिक अत्याचार होतात तर अनेकांना अनन्वित छळाला बळी पडावं लागतं. मानवी तस्करीसारख्या घटनाही घडत असतात. तरिही, एकदा का या सगळ्यातून सुटका झाली आणि अमेरिकेत स्थिरस्थावर राहायला मिळालं की हा सगळा अत्याचार जणू काही त्यांच्या मनातून पुसला जातो. बेकायदेशीररित्या अमेरिकेत स्थिरस्थावर होण्यासाठी ही किंमत मोजावीच लागेल, अशी मानसिक तयारीच जणू या लोकांनी केलेली असते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या अनधिकृत स्थलांतरितां विरोधात मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत भारतातल्या 104 अनधिकृत स्थलांतरितांना बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पंजाबमधल्या अमृतसर विमानतळावर आणण्यात आलं.
या स्थलांतरितांशी फर्स्टपोर्स्टने संवाद साधला आहे. या संवादातून त्यांनी अमेरिकेत सेटल होण्यासाठी कशाप्रकारे जीवाची बाजी लावून बेकायदेशीर प्रवास केला याच्या धक्कादायक कथा समोर आल्या आहेत.
लाखो अनधिकृत भारतीयांचं अमेरिका ‘ड्रीम कंट्री’!
अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाच्या माहितीनुसार, आवश्यक ती कागदपत्रे नसलेले जवळपास 7 लाख 25 हजार भारतीय नागरिक हे अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. तर याहून कितीतरी जास्त लोकं हे आजही अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी संधीची वाट पाहत बसलेले आहेत. ही आकडेवारी पाहून नक्कीच आपल्याला प्रश्न पडला असेल की का म्हणून इतकी लोकं अमेरिकेत स्थलांतर करायला बघतात? तर त्याची उत्तरं ही खूप साधी सोपी आहेत. पैसा आणि भारतापेक्षा जास्त चांगलं राहणीमान. कामाच्या असंख्य संधी आणि डॉलरच्या रुपात मिळाणारा त्याचा जास्त मोबदला हे मुख्य आकर्षण आहे. जगाच्या पाठिवर अमेरिकेतच या दोन्ही गोष्टी मिळतील असा अनेकांचा विश्वास आहे. भारतीय शीख समुदायातील काही लोक खलिस्तानी चळवळीत सक्रिय आहेत ते पकडले जाऊ नयेत म्हणून अमेरिकेत स्थलांतर करत आहेत.
अमेरिका स्टेटस सिम्बॉल
भारतातून इतक्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमध्ये अनधिकृत स्थलांतर का घडतं? या विषयावर चर्चा होत असताना नेहमी, तिकडच्या नोकरीच्या उत्तम संधी आणि त्याठिकाणी मिळणारा पगार हे मुख्य आकर्षण आहे असं उत्तर मिळतं. मात्र, वॉशिग्टंगमध्ये निष्कानन या थिंक टँक मध्ये कार्यरत असलेल्या स्नेहा पुरी यांनी सांगितलं की, नोकरी आणि पैसा या दोन्ही गोष्टी स्थलांतर करण्याचे प्राथमिक कारणं आहेत. या कारणांशिवाय अमेरिकेमध्ये सेटल होणं हा अलिकडे स्टेटस सिम्बॉल मानला जातो. केवळ या स्टेटस अपग्रेडेशनसाठी काहीजणं बेकायदेशीररित्या अमेरिकेत प्रवेश करतात.
अमेरिकेतील भारतीयांचं वाढतं प्रमाण
प्यू संशोधन केंद्राच्या माहितीनुसार, अमेरिकेमध्ये अनधिकृत स्थलांतरितांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांच्या प्रमाणामध्ये 70 टक्क्यांने वाढ झाली आहे. सन 2020 ते 2023 दरम्यान यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची माहिती अमेरिका कस्टम आणि सीमारक्षक विभागाने दिली आहे.
अमेरिकेत प्रवेश करण्याचा ‘डाँकी रूट्स’
अमेरिकेत अनधिकृत प्रवेश करणारे लोकं हे ‘डाँकी रूट्स’च्या मार्गातून अमेरिकेत प्रवेश करतात. अनधिकृतरीत्या प्रवेश करणाऱ्या भारतीयांमध्ये हा शब्द प्रचलित आहे. मूळ शब्द ‘डंकी रुट्स’ असा आहे. पंजाबी भाषेमधून हा शब्द प्रचलित झाला आहे. याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारत राहणं.
या शब्दाच्या शब्दश: अर्थानुसार, ही लोकं मध्य अमेरिकेतल्या पनामा, कोस्टा रिका, एल साल्वाडोर आणि ग्वाटेनमाला अशा वेगवेगळ्या देशातून प्रवास करत अमेरिकेची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी काही एजंट्स आणि मानवी तस्करी करणारी टोळी त्यांना मदत करते. यामध्ये काही जण यशस्वी होतात तर काही जण अयशस्वी.
अमेरिकेत अनधिकृत प्रवास करण्याची प्रक्रिया
अमेरिकेत अनधिकृत प्रवास करण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी विशेष एजंट्ससुद्धा असतात. या एजंट्सना प्रति व्यक्ती साधारण 44 ते 87 लाख रुपये मोजावे लागतात. एका एजंटने स्काय न्यूजला माहिती दिली की, अशा पद्धतीने अनधिकृत पाठविण्याचे वर्षाला तीन सीझन असतात. आणि प्रत्येक सीझनमध्ये ते जवळपास 500 लोकांना असं अनधिकृतपणे अमेरिकेत पाठवतात.
लॅटिन अमेरिकेमध्ये पोहोचण्यापूर्वी हे एजंट त्यांना खोटी कागदपत्रे तयार करुन आजूबाजुचे देश जसं की, इक्वाडोर, बोलिविया आणि गुयाना या देशांचा व्हिसा मिळवून देतात. तर काही एजंट हे दुबईवरुन थेट मेक्सिकोचा व्हिसा मिळवून देतात.
लॅटिन अमेरिकेतल्या कोणत्याही एका देशात पोहोचणे ही या प्रक्रियेतील पहिली पायरी असते. या देशातून मग ते मेक्सिको ते अमेरिका सीमेवरच्या जंगलातून धोकादायक प्रवासाला सुरुवात करतात. या प्रवासामध्येच जवळपास 10 ते 12 टक्के लोकांचा मृत्यू होतो. काही जणांवर लैगिंक अत्याचाराच्या घटना घडतात. तर तस्करी करणाऱ्यांनी वाढीव पैसे मागितले आणि ते नाही दिले तर अनेक जणांची हत्या केली जाते.
अनधिकृत प्रवेशाचा प्रवास जीवावर बेतला
अमेरिका या ड्रीम लॅंडमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करु इच्छिणाऱ्या माणसाची गोष्ट फर्स्टपोस्टने समोर आणली आहे. या व्यक्तीने अमेरिकेत जाण्यासाठी दुबईपासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. भारतातून दुबई आणि मग दुबईहून ही व्यक्ती कझागस्तान देशातल्या अल्माटी शहरात गेली. तिथून तो तुर्कस्थानात गेला. तिथे तो इस्तमबुलच्या विमानतळावर पूर्ण एक दिवस राहिला. तिथून तो पहिल्यांदा पनामा आणि मग सॅन साल्वाडोर इथे गेला. सॅन साल्वाडोर इथे तो एका स्मगलरला भेटला. त्याने पैसे दिले आणि आपला मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवला. तिथून त्याचा दक्षिण ग्वाटेमालाकडे जाणारा प्रवास सुरू झाला. मात्र, या इतक्या दमवणाऱ्या प्रवासामधून या तरुणाला काहीच मिळालं नाही. कारण, थोड्या दिवसांनी या तरुणाच्या कुटुंबियांना माहिती मिळाली की, एल साल्वाडोर आणि ग्वाटेनमाला सीमेवर असलेल्या नदी किनाऱ्यावर त्या तरुणाला हत्या केली आहे.
40 मृतदेहांना ओलांडून अमेरिकेत केला प्रवेश
जालंदर येथल्या हर्जिंदर सिंग या तरुणानेही अशाच प्रकारे प्रवास करुन अमेरिकेत प्रवेश मिळवला. तो या प्रवासात यशस्वी झाला आणि बेकायदेशीररित्या अमेरिकेत पोहोचला. हार्जिंदर यांनी त्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं. तो म्हणतो की, तो जून 2019 मध्ये दुबईला गेला. दुबईवरुन कोलंबिया. मग त्यांनी घोड्यावर बसून मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या देशाच्या सीमा ओलांडल्या.
कोलंबिया वरुन आठ तासाचा प्रवास करुन ते कोलंबियातल्याच कॅली शहरात पोहोचले. तिकडून ते टर्बो बंदरावर गेले. त्या बंदरावरुन ते बोटीने अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या पनामा देशाच्या जंगलामध्ये गेले. तिथे त्यांच्य़ा ग्रुपमध्ये आणखीन 15 आफ्रिकन स्थलांतरीत सहभागी झाले. इथून त्यांचा थरारक प्रवास सुरू झाला.
पनामा जंगलाचा 105 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना 10 दिवस लागले. या 10 दिवसामध्ये त्यांनी खूप भयानक गोष्टी अनुभवल्या. हर्जिंदर सांगतो की, “या 10 दिवसाच्या प्रवासात त्यांनी 40 मृतदेह पाहिले. यातले अर्धे मृतदेह हे अर्धवट खाल्लेले होते. तर काही मृतदेहाचे फक्त सांगाडे उरलेले होते. आज पाच वर्ष झाली. अजूनही ते दृश्य तो विसरला नाही. आजही त्याबद्दलची वाईट स्वप्ने येतात.
त्यानंतर थोड्या दिवसांनी जेव्हा अमेरिकन सीमेलगत सैनिकांना पाहिलं तेव्हा त्याला आनंद तर झाला, पण त्याला तेव्हा सैनिक आपल्याला पकडण्याची भितीही वाटू लागली. शेवटी तसंच झालं. अमेरिकन सैन्यांनी या संपूर्ण ग्रुपला ताब्यात घेऊन त्यांना एका कॅम्पमध्ये ठेवलं. हर्जिंदर सांगतो की, अनेक दिवसाच्या दगदगीच्या प्रवासानंतर तो या कॅम्पमध्ये झोपला.”
त्यानंतर या संपूर्ण ग्रुपला वेराक्रुझ कॅम्पमध्ये घेऊन गेले. तिथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमेरिका सीमा अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना वाटलं की त्यांना आता अमेरिकेत जायला प्रवेश मिळणार आहे. मात्र, त्यांना भारतामध्ये परत पाठवण्यात आलं.
ड्रीम कंट्रीसाठी कुटुंब उद्ध्वस्त
अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने प्रवास करताना अनेकांचा जीवही गेला आहे. सन 2022 मध्ये अमेरिका-कॅनडा सीमेदरम्यान जगदिश पटेल यांचा त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जगदिश पटेल हे मुळचे गुजरातमधले डिंगुचा या गावातले होते. ते कॅनडालगतच्या सीमेवरुन अमेरिकेत प्रवेश करणार होते. त्यासाठी एका मध्यरात्री ते सीमेजवळच्या ठिकाणी पूर्ण कुटुंबासह पोहोचले. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी एजंट त्यांना त्या ठिकाणाहून घेऊन जाणार होता. त्या रात्री बर्फाचं वादळ सुरू होतं. या वादळातच पटेल दाम्पत्यांचा आणि त्यांच्या मुलांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी अमेरिकन अधिकाऱ्यांनी तीन वर्षाच्या मुलाला लपेटलेल्या अवस्थेत असलेल्या जगदिश पटेल आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह बर्फातून बाहेर काढला. हे एकच असं कुटुंब नाही. एप्रिल 2022 मध्ये अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी कॅनडातून सेंट रेगिस नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा भारतीयांना वाचवण्यात आलं होतं.
अमेरिकेमध्ये बेकायदेशीर प्रवेश करण्याचा हा डाँकी रुट खूप धोकादायक आहे. याची अनेक उदाहरणे, घटना अनेकांना माहीत आहेत. तरिही, अनेकजण हा धोका पत्करत आहेत.